माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील सौमित्र म्हणजे प्रेक्षकांचं आवडतं पात्र. त्याने राधिका या व्यक्तिरेखेस जो आधार दिला, त्यामुळे तिच्या आयुष्याला एक सकारात्मक कलाटणी मिळाली असं कथानक आहे. असा सौमित्र आपल्यालाही आयुष्यात असावं असं अनेकजणींना वाटतं. पण खऱ्या आयुष्यात सौमित्र कोणाचा आहे? सौमित्रहि भूमिका केली आहे, सध्याचा आघाडीचा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, सूत्रसंचालक अद्वैत दादरकर याने. अद्वैत याची खऱ्या आयुष्यातली राधिका आहे, सुप्रसिद्ध अभिनेत्री भक्ती देसाई. भक्ती हि उत्तम अभिनेत्री आणि सुत्रासंचालकही आहे. तिची अनेक नाटक, मालिका यांच्यामधील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. आपण याआधी अद्वैतच्या कलाप्रवासाचा आढावा घेतला होता, आज भक्तीच्या कलाप्रवासाचा आढावा घेऊ.
भक्ती हि मुळची मुंबईची. तिला अभिनयाची आवड आधीपासूनच. तिने कॉलेजपासून नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. नाटकांमधील भूमिका करता करता तिने मालिकांच्या ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे समांतर रेषेत या दोन्ही माध्यमांतून तिने काम केलं आहे. त्या काळात तिने काही काळ सूत्रसंचलनही केलं होतं. क्षितीज खुणावतंय या कार्यक्रमात ती सूत्रसंचालिका होती. पण पुढे, सूत्रसंचालन थोडं मागे पडलं असावं. पण नाटक आणि मालिकांमधील तिचं काम सुरूच राहिलं. तिच्या अनेक मालिका गाजल्या. त्यातील अरुंधती, अमरप्रेम, अंजली या सगळ्यात जास्त गाजल्या आणि लोकप्रिय झाल्या. अरुंधती आणि अमरप्रेम या काही वर्षांपूर्वीच्या. अंजली हि त्यामानाने नुकतीच दाखल झालेली. या मालिकेतील डॉ. रोहिणी हे तिचं पात्र खूप गाजलं. मालिकांप्रमाणेच, तिने फु बाई फु या गाजलेल्या मराठी रियालिटी शोमध्ये विनोदी प्रहसनं सादर केली होती. मंगेश देसाई यांच्या सोबतची त्यांची प्रहसनं, प्रेक्षक आणि परीक्षक अशा दोघांनीही उचलून धरली.
टेलीविजनच्या पडद्यावर, यश मिळत असताना, व्यावसायिक नाटकातही ती अभिनय करत होतीच. तिची अनेक व्यावसायिक नाटके प्रसिद्ध झाली. त्यातील नजीकच्या काळातील काही उदाराहणं म्हणजे, ‘संगीत कोणे एके काळी’, ‘तू म्हणशील तसं’, मोहन जोशी आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख भूमिका असलेलं ‘नटसम्राट’. तिने अद्वैत सोबत केलेल्या नाटकांपैकी नजीकच्या काळातलं नाटक म्हणजे, भरत जाधव यांची भूमिका असलेलं ‘मास्तर ब्लास्टर’. या नाटकात भक्ती हिने अभिनय केला होता, तर अद्वैत ने लेखन आणि सहदिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारलेली होती. तू म्हणशील तसं हे मागील वर्षी दाखल झालेलं नाटक. यात भक्ती आणि संकर्षण कऱ्हाडे मुख्य भूमिकेत असून, प्रसाद ओक यांनी नाट्य दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा सूत्र हाती घेतली आहेत. या नाटकाची निर्मिती, प्रशांत दामले यांच्या निर्मिती संस्थेने केलेली आहे.
मालिकांप्रमाणेच, नाटकातही भक्तीने स्वतःची छाप सोडली आहे. सध्या तिने अभिनयासोबतच, मॉडेलिंगहि केलं आहे. ‘पोशाक’ या साड्यांच्या ब्रँडसाठी तिने काही दिवसांपूर्वी फोटोशूट केलं होतं. ती गेले काही वर्ष, अभिनयाच्या क्षेत्रात मुक्तपणे विहार करते आहे. वैविध्यपूर्ण भूमिका साकार करते आहे. कधी मालिका, कधी नाटक, तर प्रहसनांमधून आपल्या भेटीस येत राहिली आहे. येत्या काळातहि ती हा विविध भूमिकांचा सिलसिला कायम ठेवेल, हे नक्की. तिच्या पुढील वाटचालीसाठी, मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)