अनेक चित्रपट येतात आणि जातात. पण काही असे चित्रपट असतात जे आपल्या मनात घर करून राहतात. आणि जर तुम्ही नीट पाहिलं तर कळेल कि, हे सगळे लक्षात राहणारे चित्रपट आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडीत असतात. यात काम करणारे कलाकार सुद्धा त्यांच्या अभिनय आणि कथेमुळे लक्षात राहतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘फॅंड्री’. समाजामध्ये लपलेल्या जात वर्ण व्यवस्थेवर भाष्य करणारा हा चित्रपट. सैराट सारखा दर्जेदार चित्रपट देणारे नागराज मंजुळे याचे दिग्दर्शक.२ या चित्रपटातून पुढे आलेली अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात.
नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात नेहमी भूमिकेला शोभेल असे नट आणि नट्या दिसतात. आणि त्यांची हि कास्टिंग टेक्निक यशस्वी सुद्धा ठरते. राजेश्वरी त्याचं उत्तम उदाहरण. फॅंड्री मधील ‘शालू’ या व्यक्तिरेखेची माहिती नागराज यांनी आपल्या टीम ला दिली होती. त्यानुसार दिसणारी राजेश्वरी त्यांच्या एका मित्राला रस्त्यात दिसली. त्यांनी नागराज मंजुळे यांना कळवलं. दुसऱ्या दिवशी ते दोघे त्याच ठिकाणी उभे राहिले जिथे ती काल दिसली होती.
राजेश्वरी तिथून जात असताना ते तिच्याशी थोडं बोलले आणि तिच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांची परवानगी घेतली. फक्त तिच्या लुक्स वरून तिला निवडलं खरं पण तिनेही आपली निवड सार्थ असल्याचं दाखवून दिलं. अक्ख्या चित्रपटात आपल्या देहबोलीवरून तिने अभिनय केला आणि प्रेक्षकांनी त्यास पोचपावती दिली. खरं तर अभिनयाची पार्श्वभूमी नसताना अशा प्रकारची भूमिका कठीणच. पण राजेश्वरीने ती उत्तम रीतीने पेलली.
खास कौतुकाची बाब म्हणजे ती तेव्हा केवळ ९वी यत्तेत शिकत होती. तर अशी हि गुणी अभिनेत्री मुळची पुण्याची. तिचा जन्म ८ एप्रिल १९९८ ला झाला. तिचं शालेय शिक्षण जोग हायस्कूल मधून शिकली आणि तिचं कॉलेज शिक्षण सुद्धा पुण्यातीलच आहे. फॅंड्रीच्या अभूतपूर्व यशानंतर तिने थोडा वेळ घेतला आणि मग तिचा ‘आयटमगिरी’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला. पण फॅंड्री एवढं यश त्याला मिळालं नाही. पण म्हणून राजेश्वरी थांबलेली नाही. दरम्यानच्या काळात तिने काही जाहिरातीसुद्धा केल्या.
‘मन उनाड झालया’ या १४ फेब्रुवारीला रिलीज झालेल्या म्युजिकअल्बममध्ये ती झळकली आहे, ज्याला १ कोटीहून अधिक लोकांनी पाहिलं आहे आणि ८५००० पेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे. तिच्या कामाची दखल आजही घेतली जातेच आहे. त्याचमुळे विविध कार्यक्रमांना, शिबिरांना ती प्रमुख पाहुणी म्हणून दिसते. बदलत्या काळानुसार तिने स्वतःच्या पेहरावात बदल केले. ते खास लक्षात येतात. एका साध्या दिसणाऱ्या मुलीपासून ते ग्लॅमरस हिरोईन असा तो बदल आहे. तिच्या सोशल मिडिया पेज ला भेट दिलीत तर तुम्हाला याची खात्री पटेल. तर अशा या देखण्या आणि हुशार अभिनेत्रीच्या विविध कलाकृती आपल्याला लवकरच पाहायला मिळोत. तिच्या प्रयत्नांना यश मिळो. राजेश्वरीला तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठीगप्पा कडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)