Breaking News
Home / मराठी तडका / बघा खऱ्या आयुष्यात कशी आहे शेवंता, अभिनयाव्यतिरिक्त करते हा साईड बिझनेस

बघा खऱ्या आयुष्यात कशी आहे शेवंता, अभिनयाव्यतिरिक्त करते हा साईड बिझनेस

नुकताच एका नवीन मालिकेचा प्रोमो प्रसिद्ध झाला आणि प्रेक्षकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्यांची आवडती ‘शेवंता’ म्हणजे अपूर्वा नेमळेकर, ‘तुझं माझं जमतंय’ या नवीन मालिकेत पम्मी हि व्यक्तिरेखा घेऊन आपल्या भेटीस येते आहे. गेलं दीड एक वर्ष रात्रीस खेळ चाले २ (पूर्वार्ध) या मालिकेने प्रेक्षकांना अण्णा नाईक आणि शेवंता या पात्रांमुळे खिळवून ठेवलं होतं. पण काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि या मालिकेचे प्रेक्षक हळहळले. पण अपूर्वाच्या या नवीन मालिकेने त्यांच्यात आनंदाची लहर पसरली असणार हे नक्की. याच नवीन मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीच्या कलाप्रवासाचा घेतलेला आढावा.

अपूर्वा हि मुळची मुंबईची. तिचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झालं. तिचं कॉलेज म्हणजे डी.जी. रुपारेल कॉलेज. इथे अनेक आजचे आघाडीचे कलाकार घडले. अपुर्वाचंहि नाव त्यात सामील झालंय. अपूर्वाने कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढील शिक्षणासाठी परदेशात जायचं असं ठरत असताना तिला एक मालिकेत अभिनय करण्याची संधी मिळाली. ती मालिका म्हणजे ‘आभास हा’. हि मालिका दाखल झाली आणि झी मराठीच्या इतर यशस्वी मालिकांच्या पंक्तीत अगदी अलगद जाऊन बसली. या मालिकेतील अपूर्वाच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. पुढे तिने ‘आराधना’ या मालिकेतही काम केलं होतं. पण त्या नंतर मात्र मालिकांतील कामापेक्षा थोडं वेगळ माध्यमात आपण काम करावं असं तिच्या मनाने घेतलं. आणि अशा प्रकारे ती नाटकांकडे वळली. ‘आलाय मोठा शहाणा’ हे तिचं पहिलं नाटक. पुढे ‘चोरीचा मामला’ हे नाटकही तिने केलं. नजीकच्या काळातील ‘इब्लिस’ हे तिचं थरारनाट्य खूप गाजलं. वैभव मांगले आणि राहुल मेहेंदळे या अनुभवी कलाकारांनीही यात काम केलं होतं.

नाटकात रमली असताना एके दिवशी रात्रीस खेळ चाले या मालिकेसाठी विचारणा झाली. तिने एका मुलाखतीत सांगितलेल्या आठवणीनुसार तिच्या भावाने तिचा एक फोटो काढला होता. अपूर्वाने तो फोटो सोशल मिडीयावरती शेअरहि केला होता. हा फोटो बघून मालिकेच्या टीम ने तिला ‘रात्रीस खेळ चाले’ साठी विचारलं होतं. तिने होकार दिला. ऑडिशन, लुक टेस्ट वगैरे झाली. पण कोणती भूमिका ती करणार याची तिला कल्पना नव्हती. आणि जेव्हा तिला ‘शेवंता’ बद्दल कळलं तेव्हा तिला खूप आनंद झाला, कारण या मालिकेच्या पहिल्या पर्वापासून शेवंता कोण आहे हे गूढ होतं. तिची मालिकेतील एंट्री अगदी दणक्यात झाली आणि पुढे तर प्रेक्षक अण्णा आणि शेवंता या जोडीचे निस्सीम चाहते झाले. एवढे कि अनेक चाहते शुटींग चालू असलेल्या ठिकाणी या दोघांना भेटायला जात आणि सोबत त्यांच्या आवडीचे अनेक पदार्थही घेऊन जात. असा हा प्रवास चालू असताना अपूर्वाने ‘तूच माझा सांगाती’ या मालिकेतहि एक महत्वपूर्ण भूमिका निभावली होती.

मालिका आणि नाटक या माध्यमांसोबत तिने वेबसिरीज या नवं माध्यमातूनही काम केलं आहे. सोबत तिने काही चित्रपटातही भूमिका केल्या आहेत. मराठीत ‘इश्क वाला Love’ या चित्रपटातही तिने अभिनय केला होता. या चित्रपटात आदिनाथ कोठारे याची मुख्य भूमिका होती. भाकारखाडी ७ कि.मी. हा तिचा अजून एक मराठी चित्रपट. मराठीसोबतच तिने हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. ‘द ऍक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. या चित्रपटात अनुपम खेर, अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका होत्या. या गंभीर चित्रपटानंतर तिने अजून एक चित्रपट केला, पण त्यात मात्र विनोदाची फोडणी होती. सब कुशल मंगल हा तो चित्रपट. अभिनयासह तिने नृत्यातही स्वतःचे कौशल्य दाखवून दिले आहे. एका पेक्षा एक या गाजलेल्या डान्स रियालिटी शोच्या जोडीचा मामला या पर्वात तिने चैतन्य चंद्रात्रे बरोबर नृत्यं सादर केली होती.

सध्या तिने आपला अभिनय चाहत्यांसमोर पोहोचवण्यासाठी बदलत्या काळानुसार नवीन माध्यम अवलंबलं आहे. तिने युट्युबवर स्वतःचं चॅनेल सुरु केलं आहे. या चॅनेलचं पहिलं वैशिष्ठ्य म्हणजे याचं नाव. ‘द फिनिक्स अपूर्वा नेमळेकर’ असं भारदस्त आणि तिच्या प्रवासाला शोभेल असं नाव तिने या चॅनेलला दिलं आहे. दुसरं वैशिष्ठ्य म्हणजे या चॅनेलच्या विडीयोमध्ये अपूर्वा सादर करत असलेल्या भूमिका. या भूमिका तिला आजूबाजूला वावरताना, निरीक्षण करताना सापडल्या आहेत. त्यामुळे त्यातील वेगळेपण प्रेक्षकांना नक्कीच भावतं. याच प्रमाणे इतर मराठी कलाकारांनीही युट्युबवर स्वतःचे चॅनेल्स सुरु केले आहेत. त्याविषयी दोन लेख आमच्या टीमने प्रसिद्ध केले होते. हा लेख वाचून झाल्यावर त्यांनाही भेट द्यायला विसरू नका. अपूर्वा हिचा अभिनय प्रवास आपण पाहिला. अभिनया व्यतिरिक्त ती एक उत्तम चित्रकार आहे. तिने वेळोवेळी आपली चित्रे, चाहत्यांसाठी सोशल मिडीयावरती शेअर केली आहेत.

अभिनयाव्यतिरिक्त ती उत्तम ज्वेलरी डिझायनर आहे. तिच्या ह्या आवडीचे रूपांतर तिने साईड बिझनेस मध्ये केले आहे. तिचा स्वतःचा ‘अपूर्वा कलेक्शन’ नावाचा एक ब्रँड आहे. ह्या ब्रँड अंतर्गत वेगवेगळे स्त्री अलंकार बनवले जातात. आणि ते सुद्धा कमी किं मतीत. तिने ‘अपूर्वा कलेक्शन्स’ नावाचे इंस्टाग्रामवर पेज सुद्धा आहे. ह्या पेजवर ती तिचे वेगवेगळे डिझाइन्स ज्वेलरीचे फोटोज शेअर करत असते. या व्यतिरिक्त तिला फिरायची आणि सोबत खवय्येगिरी करायची प्रचंड आवड आहे. एका मुलाखतीत तिला उकडीचे मोदक आवडतात असं तिने नमूद केलं होतं. तर अशी हि अपूर्वा. ‘आभास हा’ पासून तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली आणि आज तीने एक आघाडीची अभिनेत्री असण्यापर्यंत प्रवास केला आहे. या प्रवासात तिने मालिका, चित्रपट, नाटक, रियालिटी शो, वेबसिरीज, युट्युब अशा विविध माध्यमातून अभिनय केला आहे. तिची नवीन येणारी मालिका, तिचा आघाडीची अभिनेत्री म्हणून हा प्रवास अजून पुढे नेईल आणि यशस्वी करेल हे नक्की. मराठी गप्पाच्या टीमकडून द फिनिक्स अपूर्वाला तिच्या नवीन मालिकेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.