मराठी गप्पाच्या वाचकांपर्यंत आमची टीम मनोरंजन विश्वातील नवनवीन बातम्या, मालिकांमधील किस्से आणि कलाकारांचे अभिनय क्षेत्रातील प्रवास आमच्या लेखांतून आपल्या भेटीस आणत असते. अगदी ताजं उदाहरण घ्यायचं म्हणजे, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील राधिका साकारणाऱ्या अनिता दाते यांच्यावरील लेखाचं. त्या लेखास, इतर लेखांप्रमाणे, मोठ्या संख्येने वाचक लाभले. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. लोभ असावा. या मालिकेतील अन्य मुख्य पात्र म्हणजे गुरुनाथ आणि शनाया या व्यक्तिरेखा गाजवणारे अभिजित खांडकेकर आणि रसिका सुनील यांच्याविषयी आपण याआधी वाचलं आहेच. याच मालिकेतील अजून एक व्यक्तिरेखा सध्या चर्चेचा विषय बनली आहे. हि मालिकेत सगळ्यात नव्याने दाखल झालेली, पण भाव खाऊन जाणारी व्यक्तिरेखा आहे. होय, ती व्यक्तिरेखा म्हणजे माया. हि भूमिका बजावली आहे रुचिरा जाधव हिने. रुचिरा ने याधीही मालिका, जाहिराती, नाटक, वेबसिरीज या माध्यमांतून आपलं मनोरंजन केलं आहेच. या लेखाच्या निमित्ताने, तिच्या याच वाटचालीचा आढावा घेण्याचा प्रयत्न.
रुचिरा मुळची मुंबईची. तिचं बालपण, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे मुंबईत झालं. तिला लहानपणापासून अभिनयाची आवड. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात ती अगदी आवडीने भाग घेत असे. हीच आवड पुढे कॉलेजमध्येही टिकली. किंबहुना वाढली. कारण इथे तिने एकांकिका, सूत्रसंचालन या माध्यमांतून स्वतःला व्यक्त केलं. अभिनयासोबत लेखन आणि चित्रकला हि तिची व्यक्त होण्याची अन्य दोन माध्यमं. तिला स्वतःचे विचार, ‘कोट्स’ च्या माध्यमांतून व्यक्त करायला आवडतात, तसेच कुंचल्याच्या माध्यमातून ती उत्तम चित्र सकारात असते. तिचं अभिनयातून व्यक्त होणं, हे कॉलेज संपल्यावरही सुरु राहिलं. फक्त माध्यम बदललं. नाटकाच्या जागी मालिका आली. ‘तुझ्यावाचून करमेना’ हि तिची पहिली मालिका. यात तिने नुपूर हि व्यक्तिरेखा साकारली होती. पुढे प्रीती परी तुजवरी मालिकेत तिची मिथाली हि भूमिका वाखाणली गेली. या मालिकेच्या निमित्ताने तिला, प्रिया बेर्डे यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळाली. यां व्यतिरिक्त, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘प्रेम हे’ या मालिकांतून तिने टेलीविजनच्या पडद्यावरील काम सुरु ठेवलं ते आजच्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेपर्यंत.
मालिकांमधून घराघरात पोहोचत असताना, तिने इतर माध्यमांतूनहि मुशाफिरी केली आहे. मालिकांच्या दरम्यान, ‘सोबत’ हा तिचा पहिला सिनेमा प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘Love लफडे’ हा अजून एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. सिनेमांसोबत ‘माझ्या मित्राची गर्लफ्रेंड’ या अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या वेबसिरीजमध्ये ती होती. तसेच, झी मराठी ऍपच्या जाहिरातीत ती झळकली होती. विविध माध्यमांतून मुशाफिरी करणाऱ्या रुचिकाने ‘तू मिला’ या म्युझिक विडीयोमधूनही अभिनय केला आहे. या सगळ्या माध्यमांतून काम करताना नाटक पाठी राहत कि काय असं वाटत असताना तिने एक नाटकही केलंय. ओंकार राउत लिखित ‘बेनिफिट ऑफ डाउट’ नाटकामध्ये तिने अभिनय केलाय. या नाटकाचं दिग्दर्शन अभिजित मोहिते यांनी केलंय.
नाटक, मालिका, सिनेमा, वेबसिरीज, जाहिराती अशा जवळपास प्रत्येक उपलब्ध माध्यमांतून रुचिरा ने आपला प्रवास चालू ठेवला आहे. अभिनयाव्यतिरिक्त जसं चित्र काढणं, लेखन करणं तिला आवडतं तसेच ति तिच्या फिटनेसकडेही लक्ष देते. फिटनेस जपण्यासाठी योग्य ते खावं आणि योगाभ्यास नियमित करावा हे ती कटाक्षाने पाळते. तसेच, कोणत्याही कलाकारासाठी आवश्यक अशी वाचनाची मुलभूत आवड तिला आहे. तिने अनेक मराठी, इंग्लीश पुस्तके वाचली आहेत. या तिच्या वाचनांचं प्रतिबिंब तिच्या सुंदर चित्रांमध्ये आणि अर्थपूर्ण कवितांमध्ये दिसून येतं. सध्या ती मालिकेत व्यस्त आहे. पण येत्या काळात मालिकेसोबातच ती इतर भूमिका आणि माध्यमांतून आपल्या भेटीस येईल हे नक्की. तसेच तिची चित्रे आणि कविताही तिच्या अभिनयासोबत आपल्याला आनंद देत राहतील यात शंका नाही. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पा टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)