काही कलाकार असे असतात, कि त्यांच्या विविध भूमिकांमध्ये बघण्याची आपल्याला सवय असते. कधी नायक किंवा नायिका तर कधी खलनायक किंवा खलनायिका. कधी अभिनेता किंवा अभिनेत्री तर कधी कलेच्या इतर प्रांतात मुशाफिरी करणारी व्यक्ती. पण असे कलाकार सतत त्यांच्या प्रेक्षकांच्या भेटीस येताना काही तरी नवीन घेऊन येतात. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे शाल्मली टोळ्ये. शाल्मली यांना आपण ओळखतो ते सध्या चालू असलेल्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेसाठी. त्यातील लावण्या या लोकप्रिय भूमिकेसाठी. त्याआधी त्यांनी काम केलेली आणि नुकताच जिने प्रेक्षकांचा निरोप घेतला ती मालिका म्हणजे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’. त्यात त्यांनी औरंगजेबाच्या मुलीची भूमिका केली होती. स्वतःच्या भावासाठी तळमळणारी, औरंगजेबाला मदत करणारी अशी नकारात्मक व्यक्तिरेखा. जवळपासच्या काळात चाललेल्या या मालिका पण भूमिका मात्र वेगवेगळ्या. शाल्मली यांची हीच खासियत म्हणावी लागेल. त्यांनी विविध पद्धतीच्या भूमिका आणि विविध क्षेत्रातही कामे केली आहेत.
या नुकत्याच झालेल्या भूमिकांप्रमाणेच आपण त्यांना ओळखतो ते दुर्वा मधील भूमिकेसाठी. तसेच देवा शप्पथ, लज्जा, मधु इथे आणि चंद्र तिथे या मराठी मालिकाही गाजल्या. लज्जा मध्ये त्यांनी नीना कुळकर्णी आणि राजन ताम्हाणे यांच्यासोबत काम केलं होतं. पुढे राजन ताम्हाणे आणि शेखर ताम्हाणे निर्मित आणि संपदा जोगळेकर कुलकर्णी दिग्दर्शित ‘तिन्हीसांज’ या नृत्य संगीत नाटकात काम केलं. तसेच हा कोर्टरूम ड्रामा होता हे याचे वैशिष्ठ्य. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग केला गेला होता. त्यात त्यांनी अगंद म्हसकर यांच्या समवेत मुख्य भूमिका केली होती. त्यांनी मराठी सोबतच हिंदी मध्येही कामे केली आहेत. मरिम खान रिपोर्टिंग लाईव, चुपके चुपके, श्री यांसारख्या हिंदी मालिकाही केल्या. सोबत मै हु ना, खत आय है असे हिंदी सिनेमेही केले. ‘मै हू ना’ चित्रपटात शाहरुख जेव्हा कॉलेजमध्ये शिकायला जातो, तेव्हा बोमन इराणी विचारतात कि तुला कोणाच्या बाजूला बसायला आवडेल, तेव्हा शाहरुख अमृता राव कडे बोट दाखवतो असे एक दृश्य आहे. त्या दृश्यामध्ये अमृताच्या बाजूला शाल्मली सुद्धा आहे. SHE हि २०१६ साली प्रदर्शित झालेली एक शॉर्ट फिल्मसुद्धा त्यांच्या नावावर आहे. पण हे तर झालं त्यांच्या अभिनयाबाबत. अभिनयासोबतच त्यांना आवड आहे ती नृत्याची.
नुकताच त्यांनी एक विडीयो आपल्या बहिणीबरोबर त्यांच्या चाह्त्यांसोबत शेयर केला होता. त्यात त्या दोघींनीही उत्तम नृत्य केलं होतं. या दोघींमधलं साम्य म्हणजे, दोघींनीही सुप्रसिद्ध डान्स रियालिटी शोज केलेले आहेत. त्यांच्या बहिणीने, डी.आय.डी. सुपर मॉम्स या सिजनमध्ये भाग घेतला होता. तर शाल्मली यांनी एका पेक्षा एक मध्ये पुष्कर जोग यांच्या समवेत सहभाग नोंदवून प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. याव्यतिरिक्त त्यांनी अनेक सुप्रसिद्ध गायाकांसोबत स्टेज शोज केलेले आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी खूप भ्रमंती केलेली आहे. भ्रमंतीची हीच आवड त्यांना आजही असल्याचे दिसून येते. तसचं भ्रमंती आवडणारे प्रवासी हे खवय्ये हि असतात आणि त्यांना विविध ठिकाणचे वेगवेगळे पदार्थ चाखायला आवडतात. शाल्मली यासुद्धा अशाच मस्त खवय्या आहेत. तसेच भ्रमंती करणाऱ्यांना माणसांत रमण्याची, तसेच आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण करण्याची सवय असते.
याच निरीक्षणाच्या सवयीचा त्यांना स्टायलिस्ट म्हणून उपयोग होतो. कारण उत्तम स्टायलिस्ट वेळ, स्थळ, काळ आणि निमित्त यांचा विचार करून लुक्स डिझाईन करत असतात. आजपर्यंत शाल्मली यांनी अनेक सेलिब्रिटीजसाठी लुक्स डिझाईन केलेले आहेत. मृणाल कुलकर्णी, स्पृहा जोशी, आस्ताद काळे, वैभव तत्ववादी, पूजा सावंत, प्रार्थना बेहरे, माधव देवचके हि यातील काही नावं. त्यांच्या याच कलेचा वापर ‘तुला पाहते रे’ मालिकेतील कलाकारांच्या लुक साठी केला गेला होता. खासकरून या मालिकेतील प्रसिद्ध ठरलेल्या लग्नसमारभांसाठी. अभिनय, नृत्य, स्टायलिस्ट अशा विविध क्षेत्रांत शाल्मली यांनी मुशाफिरी केली आहे. तसेच विविध माध्यमांतून आणि विविध भाषांमधून त्यांनी कामे केली आहेत. यापुढेही त्यांचा कामाचा आलेख असाच चढता राहील आणि वेळोवेळी त्या त्यांच्या चाहत्यांसाठी विविध भूमिका आणि त्यांची कामे घेऊन येतील यात शंका नाही. त्यांच्या पुढील वाटचालीत त्यांना सतत यश मिळत राहो या टीम मराठी गप्पाकडून शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)