Breaking News
Home / मराठी तडका / बघा सिंगिंग स्टार शो मधील यशोमनचं खरं आयुष्य, काका होते प्रसिद्ध अभिनेते

बघा सिंगिंग स्टार शो मधील यशोमनचं खरं आयुष्य, काका होते प्रसिद्ध अभिनेते

नुकताच ३० नोव्हेंबर रोजी यशोमान आपटे या गुणी कलाकाराचा वाढदिवस होऊन गेला. यानिमित्त त्याचे असंख्य चाहते, सहकलाकार यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. नुकत्याच संपन्न झालेल्या सिंगिंग स्टार या रियालिटी शो मध्ये त्याने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती आणि अंतिम तीन स्पर्धकांमध्ये तो दाखल झाला होता. तेव्हाही त्याच्यावर चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव झाला होता. या वर्षात नवनवीन मालिका, कार्यक्रम आणि त्यातील यश यांमुळे यशोमान हा पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. या निमित्ताने त्याच्या कला कारकीर्दीची ओळख मराठी गप्पाच्या वाचकांना करून द्यावी म्हणून मराठी गप्पाच्या टीमतर्फे हा लेखप्रपंच.

यशोमान मुळचा मुंबईचा. बालपण, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे सगळं मुंबईत झालं. त्याचे वडील विवेक आपटे हे उत्तम लेखक आणि गीतकार. तसेच विनय आपटे हे त्याचे काका. विनय आपटे ह्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट मालिकांमध्ये कामे केली आहेत. एक उत्कृष्ट कलाकार म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. त्यांच्यामुळे घरी कलेविषयी पोषक वातावरण होतंच. पण शालेय शिक्षण पूर्ण होई पर्यंत यशोमान कलाक्षेत्राशी थेट संबंधित नव्हता. महाविद्यालयीन शिक्षणासाठी एम. एल. डहाणूकर महाविद्यालयात दाखल झाल्यावर मात्र त्याने एकांकिकांमधून अभिनय करण्यास सुरवात केली. तोपर्यंत कधीही अभिनय न केलेल्या यशोमान याने पहिल्याच फटक्यात स्वतःसाठी आणि त्या एकांकिकेसाठी एका स्पर्धेत विजेतेपद पटकावलं. या यशामुळे, त्याचं लक्ष आता रंगमंचावर काम करण्यावर केंद्रित झालं होतं. महाविद्यालयीन जीवनात त्याने अनेक एकांकिका, प्रायोगिक नाटकं केली. लपाछपी ही त्याची पहिली एकांकिका. त्यांनतर त्याने केलेल्या नाट्यकृतींतील झोपाळा, बी.पी. या नाट्यकृती गाजल्या. मऊ ही एकांकिका सुद्धा प्रसिद्ध झाली. तसेच त्याने केलेल्या एकांकिकांसाठी त्याला मुंबई युनिव्हर्सिटीच्या युथ फेस्टिवल मध्ये अनेक पारितोषिकं मिळालेली आहेत.

रंगमंचावरचा हा प्रवास चालू असताना त्याने ‘३५% काठावर पास’ हा सिनेमा केला. यांमुळे तो प्रकाशझोतात आला. पण आजतागायत त्याला एका कलाकृतीने या सगळ्यांपेक्षा जास्त ओळख मिळवून दिली ती म्हणजे फुलपाखरू ही मालिका आणि त्यातील मानस ही व्यक्तीरेखा. मंदार देवस्थळी यांच्या या मालिकेतून यशोमान आणि हृता दुर्गुळे यांच्या जोडीला अमाप प्रेक्षक पसंती मिळाली. आजही अनेक मुलाखतीत त्याला मानस म्हणून हाक मारणारे प्रेक्षक अगदी सहज दिसतात एवढं त्या भूमिकेचं गारुड प्रेक्षकांवर आहे. या मालिकेच्या अभूतपूर्व यशानंतर त्याने अजूनही काही मालिका केल्या. आनंदी हे जग सारे ही त्यातलीच एक मालिका. या मालिकेत रुपल नंद हिची प्रमुख भूमिका होती. सध्या ही जोडी, एका नव्याकोऱ्या मालिकेतून एकत्र आले आहेत. श्रीमंताघरची सून असं या मालिकेचं नाव. या मालिकेत यशोमान हा अथर्व ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतो आहे. त्याच्या मानस या व्यक्तिरेखेप्रमाणेच अथर्व हा सुद्धा प्रेक्षक पसंतीस उतरतो आहे.

मालिकांमधून लोकप्रिय ठरण्याऱ्या व्यक्तिरेखा निभावताना यशोमानचं गाण्याचं अंग हे सुद्धा दुर्लक्ष न करता येण्याजोगं. खरं तर तो गाणं शिकला नाहीये पण तो उत्तम गातो हे फुलपाखरु मालिकेच्या प्रेक्षकांना महिती आहेच. त्याने या मालिकेत एक गाणं गायलं होतं. तसेच नुकत्याच संपन्न झालेल्या सिंगिंग स्टार या कार्यक्रमातही त्याने आपल्या उत्तम गायकीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून त्याचं गाणं हे चांगलं झालं होतं. परीक्षकांनीही वेळोवेळी त्याला सूचनाही केल्या आणि त्याचं कौतुकंही केलं. तो आणि त्याची सेलिब्रिटी मेंटर असलेल्या शरयू दाते यांनी या संपूर्ण काळात अगदी कंबर कसून मेहनत घेतली आणि या जोडीने थेट अंतिम फेरीत धडक मारली. त्याला या स्पर्धेचे तिसरे पारितोषिक मिळाले. गाण्याची कुठचीही पार्श्वभूमी नसताना मिळवलेले हे यश आणि प्रेक्षकांचं मिळत असलेलं प्रेम हे त्याच्या मेहनतीची दाद आहे, असंच म्हणू शकतो.

अगदी कमी काळात यशोमान याने मालिका, नाटक, रियालिटी शोज मधून स्वतःची छाप पाडली आहे. तसेच त्याने दोन म्युझिक व्हिडियो मध्येही सहभाग नोंदवला आहे. ‘शुक्रिया’ आणि ‘तुझ्या विना’ हे त्या दोन म्युझिक व्हिडियोजची नावे. यातील तुझ्या विना या व्हिडियोला तर जवळपास १९ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिलं आहे. एकूणच काय, तर सध्या नव्या दमाच्या कलाकारांमध्ये यशोमान आपटे हे नाव अग्रक्रमाने पुढे येतं आहे. गेल्या वर्षी केल्या गेलेल्या एका सर्वेत त्याची आकर्षक मराठी अभिनेता म्हणूनही निवड झाली होती. अभिनय आणि गाणं या दोन्ही कलांचा पुरेपूर वापर करत यशोमान हा स्वतःची वाटचाल करतो आहे. महाविद्यालयीन जीवनापासून सुरू झालेला हा प्रवास इथपर्यंत अगदी उत्तम झाला आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. तसेच तो येत्या काळातही हा प्रवास यशस्वी आणि उत्तम असेल हे नक्की. त्याच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून त्याला खूप खूप शुभेच्छा !

आपण हा लेख वाचलात त्याबद्दल धन्यवाद. वर रुपल नंद या गुणी अभिनेत्रीचा उल्लेख झाला. तिच्या कारकीर्दीविषयी आढावा घेणारा एक लेख मराठी गप्पाच्या टीमने प्रसिद्ध केला होता. त्यास असंख्य वाचक लाभले. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा लेख वाचायचा असल्यास वर दिलेल्या सर्च ऑप्शन मध्ये जाऊन तुम्ही रुपल नंद असं टाईप करून सर्च केल्यास आपल्याला तो लेख दिसेल. तसेच यशोमानच्या नाटकांमध्ये भाग्यश्री मिलिंद ही सहकलाकार होती. तिच्या कलाप्रवासाविषयी सुदधा एक लेख लवकरच मराठी गप्पावर प्रसिद्ध झालेला आहे. तो आणि इतरही अनेक उत्तम लेख वाचण्यासाठी मराठी गप्पाच्या वेबसाईटला नियमित भेट देत रहा. धन्यवाद !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *