मनोरंजन क्षेत्र हे गेल्या काही वर्षांत खूप विस्तारलं आहे. आधीही भारतातल्या बॉलिवूडमध्ये जगात सगळ्यात जास्त सिनेमे बनत. त्यात हिंदीसोबत इतर भाषांतील सिनेमांची आकडेवारी धरली तर लक्षणीय होते. त्यामुळे या क्षेत्रात स्पर्धा प्रचंड आहे, तसेच स्वतःची छाप प्रेक्षकांवर पाडणे आणि लक्षात राहणे हे कठीण वाटणारं काम. पण काही कलाकार मात्र स्वतःच्या कामामुळे प्रेक्षकांच्या सदैव लक्षात राहतात. त्यातही बालकलाकार तर विशेष. या बालकलाकारांमधील एक प्रसिध्द नाव म्हणजे हर्षाली मल्होत्रा. बजरंगी भाईजान सिनेमातील छोटी मुलगी, म्हणजे मुन्नी ही व्यक्तिरेखा साकारली ती हर्षाली मल्होत्रा हिने. २०१५ साली आलेल्या या सिनेमाने, हर्षाली देशातल्या घराघरात लोकप्रिय झाली. त्यावेळी अवघ्या सात ते आठ वर्षांची ती असेल. तिचा अभिनय सगळ्यांना आवडला. कारण या व्यक्तिरेखेस साकारताना, तिला एकही शब्द उच्चारण्याची परवानगी नव्हती.
शूटिंग सुरू असताना केवळ सहा ते सात वर्षांची असेल ती. या काळात अशी अवघड भूमिका निभावणं कठीण. पण अनेक वेळेस ही लहान मुलं अगदी नैसर्गिकपणे अभिनय करतात. हर्षाली त्याचं उत्तम उदाहरण. म्हणूनच तिची निवड तब्बल ५००० मुलींच्या ऑडिशनमधून झाली. सिनेमा पूर्ण झाल्यावर एका मुलाखतीत सलमान खान यांनी तिचा उल्लेख सिनेमातील ट्रम्प कार्ड असा केला होता. तो खराही ठरला. सिनेमाच्या यशात हर्षालीच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. अनेक प्रथितयश वाहिन्यांवरून तिच्या मुलाखती झाल्या. प्रेक्षकांची पसंतीही तिला मिळाली. तिच्या बजरंगी भाईजान मधील भूमिकेसाठी बेस्ट डेब्यु ऍक्ट्रेस या फिल्मफेअरच्या पुरस्कारासाठी तिला नामांकन मिळालं. तिला अन्य प्रथितयश पुरस्कारांची नामांकनं आणि मानांकनं यांनी सन्मानित करण्यात आलंय. सिनेमासोबतच हर्षाली हिने मालिकांतही अभिनय केलेला आहे. तसेच अनेक प्रथितयश नाममुद्रांच्या जाहिरातीत ती झळकली आहे. मग ते पियर्स साबण असो वा हिरो ही प्रथितयश वाहन कंपनी. तिने अनेक जाहिरातीत उत्तम काम केलेलं आहे.
तसेच टिक टॉक बंद होण्याआधी ती टिक टॉक व्हिडियोज बनवत असे. यात तिचा सख्खा भाऊ हार्दिक आणि अन्य कुटुंबियही तिच्यासोबत सामील असत. तिच्या कुटुंबात तिचा भाऊ हार्दिक, दोघांचे आई वडील, काजोल आणि विपुल मल्होत्रा यांचा समावेश होतो. अभिनयासोबतच तिला दोन गोष्टींची आवड आहे. एक म्हणजे योगा करणं आणि दुसरं म्हणजे नृत्य करणं. एका वृत्तवाहिनीला योगा दिनी दिलेल्या मुलाखतीत तिने योगा दिनाचं महत्व विशद केलेलं होतं. तसेच तिचं स्वतःचं असं युट्युब चॅनेल सुद्धा आहे. यावर तिने नृत्य केलेल्या व्हिडियोज ना पाहता येतं. तिच्या या अभिनय प्रवासात तिने आंतरराष्ट्रीय कलाकार साद यांच्यासोबत एका गाण्यातही काम केलेलं आहे. जवळपास १.४ करोड लोकांनी या व्हिडियोला पाहिलेलं आहे. अशी ही हरहुन्नरी आणि गुणी बालकलाकार आपलं बालपण आनंदात जगते आहे. तसेच मोजक्याच पण उत्तम कलाकृतीतून आपल्या समोर येतं राहिली आहे. येत्या काळातही ती अशाच उत्तमोत्तम कालाकृतींमधून आपल्या भेटीस येईल हे नक्की. तिच्या पुढील यशस्वी प्रवासासाठी मराठी गप्पा टीमच्यातर्फे तिला खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)