मराठी गप्पा आणि कलाकारांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासावरील लेख हे एक समीकरणचं बनून गेलेलं आहे. या लेखांच्या निमित्ताने अनेक नवनवीन, तसेच अनुभवी कलाकारांच्या अभिनय प्रवासाची ओळख, वाचकांना करून द्यावी असा टीम मराठी गप्पाच्या टीमचा नेहमीच हेतू राहिला आहे. आपलाही त्यास उत्तम प्रतिसाद मिळतो त्याबद्दल धन्यवाद ! आज या लेखाच्या निमित्ताने आपण अशाच एका उत्तम अभिनेत्रीच्या कलाप्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या लेखात आपण बालकपालक चित्रपटातील अश्या एका गुणी बालकलाकाराविषयी जाणून घेणार आहोत जिने आपल्या निरागस अभिनयाने सर्वांचे मन जिंकले. भाग्यश्री मिलिंद हे या अभिनेत्रीचं नाव. आज पर्यंत तिने काही निवडक सिनेमे केले आहेत. पण ते सर्वच प्रेक्षक पसंतीस उतरले आहेत हे विशेष. तिच्या या सिने प्रवासाची सुरुवात झाली ती बालक पालक या रवी जाधव यांच्या सिनेमातून.
यांतील गंमतीची गोष्ट अशी की हा सिनेमा ज्या नाटकावर बेतलेला होता, त्या नाटकातही भाग्यश्री हिने अभिनय केलेला होता. या नाटकात तिच्या सोबत सध्याचा आघाडीचा नायक, यशोमान आपटे हाही होता. दोघेही एम.एल. डहाणूकर महाविद्यालयात शिकले. त्यामुळे या नाटकांप्रमाणेच त्यांनी काही एकांकिकही एकत्रपणे केल्या आहेत. झोपाळा ही त्यातलीच एक. या काळात भाग्यश्री हिने एकांकिकांमधून भाग घेत स्वतःतील अभिनेत्रीला पैलू पडण्याचं काम सुरू केलं होतं. पुढे तिने जे जे सिनेमे केले त्यातून तिच्यातील प्रगल्भ अभिनेत्री दिसून आली ती याच अनुभवाच्या जोरावर. बालक पालक यांच्यासोबतच तिने उबुंटू आणि आनंदी गोपाळ हे दोन महत्वाकांक्षी सिनेमे केले. याचं कारण हे की, उबुंटू ची कथा ही थोडी वेगळी होती. एका गावातील शाळा, जेव्हा शाळेवर प्रेम करणारे विद्यार्थी स्वतःच चालवायला घेतात तेव्हा काय काय घडतं अशी ह्या सिनेमाची कथा. त्या कथेतील मुलांतील सर्वात मोठी मुलगी गौरी असते. अर्थातच त्यामुळे ही जबाबदारीची भुमिका होती. भाग्यश्री हिने अगदी उत्तमरीतीने ही भूमिका पार पडली. पण या दोन्ही सिनेमांतून तिने शालेय मुलीच्या व्यक्तिरेखा रेखाटल्या होत्या.
एक साचेबद्ध भूमिकांचा शिक्का बसतो की काय असं वाटत असताना, भाग्यश्री हिने एक नवीन सिनेमा केला आणि या गोष्टीला छेद दिला. आनंदी गोपाळ असं या सिनेमाचं नाव. भारतातील पहिल्या स्त्री डॉक्टर असलेल्या डॉ. आनंदी गोपाळ जोशी यांच्या आयुष्यावरचा हा सिनेमा. त्यातील प्रमुख व्यक्तिरेखेसाठी तिची निवड झाली. तब्बल दीड वर्षे या सिनेमाची तयारी आणि शूटिंग चाललं. या काळात संपूर्ण टीमने सर्वस्व झोकून देऊन काम केलं. त्यात भाग्यश्री हिचं विशेष कौतुक. कारण एका मुलाखतीत तिने म्हंटल्याप्रमाणे, आनंदीबाईंच्या जीवनावर आधारित जेवढे सिनेमे, डॉक्युमेंट्रीज तिला मिळाल्या त्या तिने पाहिल्या. आनंदीबाई आणि गोपाळराव यांच्यामधील पत्रव्यवहारही तिने या काळात डोळ्याखालून घातला. त्यामुळे एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा तिने तेवढ्याच ताकदीने उभी केली. तसेच परदेशातही शूटिंग असताना, तिने प्रतिकूल परिस्थितीतही अभिनयात कुठे कमीपणा येऊ दिला नाही. पुढे या सिनेमाला मिळालेल्या अनेक नामांकनं आणि मानांकनं यांतून प्रेक्षकांनीही तिच्या या मेहनतीला दाद दिल्याचं दिसून आलं. आजतागायतच्या तिच्या प्रवासात तिने साकारलेली सर्वोत्तम भूमिका म्हणून ह्या भूमिकेचा उल्लेख केला तर वावगं ठरू नये. अगदी युट्युब वरही तिच्या नावाने सर्च केलं असता, या सिनेमाचे व्हिडियोज प्रथमतः समोर येतात, यावरून या सिनेमाची, तिच्या भूमिकेची लोकप्रियता कळून येते.
सिनेमांतून लोकप्रियता मिळत असताना, भाग्यश्री ही आजही रंगमंचाशी तितकीच निगडित आहे. काही काळापूर्वी तिने बेबे की शादी ह्या नाट्यकृतींतून अभिनय केलेला होता. अभिनयासोबतच तिला चित्रकलेची आवड आहे. ती वेळोवेळी, तिच्या चाहत्यांसाठी तिची रेखाटने, सोशल मीडियाच्या माध्यमांतून शेअर करत असते. तसेच तिचं फिटनेसकडेही ती विशेष लक्ष देत असते. काही दिवसांपूर्वी तिने एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यात ती मल्लखांब करताना दिसत होती. या व्यक्तिरिक्त तिला, फिरण्याचीही आवड आहे. विविध ठिकाणी भेट देणं तिला आवडतं. तसेच ती उत्तम नृत्यांगनाही आहे. तर अशी ही गुणी अभिनेत्री, नृत्यांगना सध्या काही नाट्यकृतींतून आणि सिनेमांतूनही आपल्या समोर आली आहे. या सगळ्यांमध्ये तिने उत्तम काम केलं आहे. तसेच येत्या काळातही ती उत्तम अभिनय करत, अनेक व्यक्तिरेखा, तिच्या इतर भुमिकांप्रमाणेच लोकप्रिय करेल यात शंका नाही. तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)