Breaking News
Home / मराठी तडका / बाळुमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील सुंदरा बाई खऱ्या आयुष्यात कश्या आहेत, पती आहे अभिनेता

बाळुमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील सुंदरा बाई खऱ्या आयुष्यात कश्या आहेत, पती आहे अभिनेता

सध्या मालिकाविश्वात अनेक नवनवीन कलाकारांचे चेहरे गेल्या काही काळापासून पाहायला मिळताहेत. यांतील काही मुख्य तर काही सहाय्यक भूमिकेतून आपल्या समोर येत असतात. अशीच एक नवोदित अभिनेत्री सातत्याने आपल्याला गेल्या काही वर्षांत मालिकांमधून दिसते आहे. तिने नजीकच्या काळात केलेल्या दोन्ही मालिकांमधून ‘आई’ ही व्यक्तिरेखा निभावली आहे. यांतील एका मालिकेतील तिच्या ‘आई’च्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ठ आई हा सन्मानही मिळाला होता. तर दुसरी मालिका नव्यानेच सुरु झाली आहे. यातील कौतुकाचा भाग असा कि या अभिनेत्रीचं वय तसं लहान आहे, पण तिने भूमिका मात्र तिच्याहून मोठ्या वयाच्या आणि अनुभवी स्त्रियांच्या केलेल्या आहेत. तिच्या अभिनयातील समंजसपणामुळे या दोन्ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. अशा या गुणी अभिनेत्रीचं नाव आहे अंकिता पनवेलकर. आज या लेखाच्या निमित्ताने अंकिताच्या अभिनय प्रवासाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न.

अंकिता पनवेलकर अभिनय क्षेत्रात पुढे आली ती एकांकिकांच्या माध्यमांतून. रंगमंचाशी नाळ जोडलेली असताना तिने मालिका आणि सिनेक्षेत्रही व्यर्ज सोडलं नव्हतं. तिने काही वर्षांपूर्वी ‘चंद्रभागा’ हा सिनेमा केला होता. यांतील मध्यवर्ती भूमिका असलेली, शांत, सुशिक्षित ‘’चंद्रभागा” तिने साकारली होती. व्यावसायिक सिनेमासोबत तिने शॉर्ट फिल्महि केली आहे. या सरत्या लॉकडाऊनमध्ये तिने ‘कार्पेट एरिया ५४०’ हि शॉर्ट फिल्म केली. यात एका गृहिणीच्या भूमिकेत ती होती. या माध्यमांसोबत तिने जास्त वेळ काम केलंय ते मालिकाविश्वात. ‘अस्स सासर सुरेख बाई’ या मालिकेत तिची भूमिका होती. तर तिला आजतागायत सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळवून देणारी व्यक्तिरेखा हि एका मालिकेतील होती. ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत संत बाळू मामा यांच्या आईची म्हणजे सुंदराबाईंची व्यक्तिरेखा तिने साकारली.

या मालिकेच्या सुरुवातीच्या भागापासून ते गेल्या काही काळापर्यंत प्रत्येक भागात असलेली एक व्यक्तिरेखा म्हणजे सुंदराबाई. त्याचमुळे जेव्हा सुंदराबाई यांचे मालिकेत, देहावसान झाले असे दाखवण्यात आले तेव्हा अंकिता हिचा त्या मालिकेतील भाग संपला होता. तिला स्वतःला आणि या मालिकेच्या प्रेक्षकवर्गाला यांमुळे अतीव दुःख्ख झाले. ती आपल्या सहकलाकारांशी आणि प्रेक्षकांशी संवाद साधताना काहीशी भावूक झाली होती. तिने हि भूमिका निभावताना संपूर्णपणे झोकून देऊन केलेला अभिनय आणि त्याला साजेसा असा पकडलेला भाषेचा लहेजा, या दोहोंना साजेसा असा पेहराव यांच्यामुळे हि महत्वपूर्ण भूमिका जिवंत करण्यात यश आलं होतं. तिच्या या अभिनय कौशल्याचं प्रेक्षकांकडून कौतुकही झालं होतं. तिच्यावरील प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे महाराष्ट्र टाईम्स यांचा प्रथितयश असा ‘म.टा.सन्मान २०१९’ पुरस्कार तिला मिळाला. सर्वोत्कृष्ठ सहाय्यक भूमिकेसाठी हा पुरस्कार दिला गेला. तसेच कलर्स मराठीतर्फे मालिकेतील भूमिकांसाठी दिल्या जाणाऱ्या ‘सर्वोत्कृष्ठ आई’ या पुरस्कारासाठी तिची निवड झाली होती. कलर्स मराठी अवॉर्ड २०१९ या सोहळ्यात तो तिला प्रदान करण्यात आला.

या लोकप्रिय मालिकेनंतर लगेचच ती सध्या एक मालिका करते आहे. शुभमंगल ऑनलाईन हि ती मालिका. यात सुयश टिळक आणि सायली संजीव यांच्या मुख्य भूमिका आहेत. यातील सायलीच्या शर्वरी या व्यक्तिरेखेच्या आईची भूमिका ती करते आहे. तिच्या या भूमिकेचं आधीच्या भूमिकांसारखंच कौतुक होतं आहे. येत्या काळात ती स्वाध्याय स्टुडियोजच्या ‘देवीलोक’ या कालाकृतीतूनही आपल्या भेटीस येईल. तिच्या या कलाप्रवासात तिला भक्कम अशी साथ लाभली आहे तिच्या पतीची आणि कुटुंबियांची. अंकिता यांच्या पतीचं नाव आहे ओमकार पनवेलकर. ओमकार हे सुद्धा मनोरंजन क्षेत्राशी निगडीत आहेत. या दोघांनाही एक गोंडस मुलगी आहे. आत्ता पर्यंत अंकिताने ज्या ज्या भूमिका बजावल्या आहेत त्या अतिशय उत्तमरीतीने बजावल्या आहे. नेमक्याच पण उत्तम भूमिकांमुळे ती नेहमीच लक्षात राहते. येत्या काळातही तिचा हा यशस्वी अभिनय प्रवास असाच सुरु राहील यात शंका नाही. तिच्या पुढील कारकिर्दीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून तिला खूप खूप शुभेच्छा !

(Thanks : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.