आताच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीत अनेक लोकप्रिय कॉमेडी कलाकार आहेत. परंतु भाऊ कदम उर्फ भालचंद्र कदम हे नाव सर्वात आघाडीवर आहे. भाऊंची विनोदाची आपली एक वेगळीच शैली आहे. साधा सरळ स्वभाव आणि विनोदाचे अचूक टायमिंग ह्यामुळे भाऊंचा प्रचंड चाहता वर्ग आहे. सध्या भाऊ कदम ‘चला हवा येऊ द्या’ ह्या शो मधून महाराष्ट्रातील प्रत्येकाला घराघरांत हसवताना दिसत आहेत. परंतु भाऊंना खरी ओळख मिळवून दिली ती म्हणजे ‘फू बाई फू’ ह्या कार्यक्रमाने. आता भाऊ कदम इतके लोकप्रिय आहेत कि, सध्याचा घडीला मराठी चित्रपटसृष्टीतला विनोदाचा एक्का म्हणून भाऊ कदम ह्यांच्याकडे पाहिले जाते. परंतु भाऊंना हि प्रसिद्धी मिळवण्याअगोदर आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला आहे. भाऊ हे अतिशय सामान्य कुटुंबातून इथपर्यंत आलेले आहेत. इतकंच काय, एकेकाळी त्यांच्यावर पानटपरी टाकायची सुद्धा वेळ आली होती. भाऊ वडाळा येथील राहत असलेले घर सोडून त्यांना डोंबिवली मध्ये शिफ्ट व्हावे लागले होते. भाऊंवर का हि वेळ आली होती, चला तर जाणून घेऊया आजच्या लेखात.
मुंबईत कोकणी कुटुंबात भाऊंचा जन्म झाला. भाऊंचे खरे नाव भालचंद्र असले तरी बालपणापासूनच त्यांना घरचे सगळे भाऊ म्हणूनच हाक मारत असे. भाऊंनी वडाळ्यातील ज्ञानेश्वर विद्यालयातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. लहानपानापासूनच भाऊ शांत आणि लाजाळू स्वभावाचे आहेत. त्यांचे बालपण वडाळा येथील बीपीटी क्वाटर्समध्ये गेले. भाऊंचे वडील बीपीटी मध्ये नोकरीला होते. तर आई गृहिणी होत्या. वडिलांच्या अकाली निधनानंतर घरातील सर्व जबाबदारी भाऊंवर आली. वडिलांच्या निधनामुळे त्यांना बीपीटी क्वाटर्स सोडावी लागली. त्यामुळे मग ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवली येथे शिफ्ट झाले. भाऊंना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांचे गुरु विजय निकम ह्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या आईनी भाऊंना अभिनयक्षेत्रात काम करण्याची परवानगी दिली. भाऊंना वर्षभरात एखाददुसरे नाटक मिळत असे. त्याच बरोबर भाऊंनी कॉम्पुटर कोर्स सुद्धा केला होता. त्या आधारावर ते निवडणुकीच्या काळात मतदारांच्या नावांची नोंदणी करणे ह्यासारखे कामे करत. ह्याच कामावर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अवलंबून राहावे लागत. परंतु त्यांना उदरनिर्वाहासाठी दुसरा मार्ग शोधणे गरजेचे होते. त्यामुळे भाऊंनी आपल्या भावासोबत पानटपरी उघडण्याचा निर्णय घेतला. दोघांनी मिळून पानाची टपरी उघडली. भाऊ स्वतः अनेकवेळा पानटपरीवर काम करत असे.
अश्याप्रकारे सुरु झाला अभिनयाचा प्रवास :
भाऊंना बालपणापासूनच अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी अनेक नाटकांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी एकांकिकेमध्येसुद्धा भाग घेतला होता. महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी आपल्या काही मित्रांसोबत ‘कोब्रा ३७’ नावाने एक ग्रुप बनवला होता. ह्याच ग्रुपमध्ये किशोर चौघुले, कमलाकर सातपुते ह्यासारखे लोकप्रिय अभिनेते सुद्धा होते. भाऊ कदम ह्यांचे गुरु विजय निकम ह्यांनी ‘एवढाच ना’ ह्या नाटकामधून भाऊंना कमर्शिअल ब्रेक दिला. ह्या नाटकामध्ये भाऊंनी विसरणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. भाऊंनी पंधरा वर्षांमध्ये जवळजवळ ५०० नाटकांमध्ये काम केले. इतकं काम करूनही करिअर करण्यासाठी कोणतीही मोठी संधी त्यांना मिळत नव्हती. ह्या कारणामुळे त्यांनी अभिनयक्षेत्र कायमचे सोडून द्यायचा विचार सुद्धा केला होता. परंतु त्याच दरम्यान त्यांना विजय निकम ह्यांनी ‘जाऊ तिथे खाऊ’ ह्या नाटकांत मुख्य भूमिका दिली. हेच नाटक त्यांच्या करिअरला कलाटणी देणारे ठरले. ह्या नाटकानंतर भाऊंनी पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. भाऊंचे ‘एक डाव भुताचा’, ‘बाजीराव मस्त मी’ ह्या नाटकांमधील अभिनयाचे खूप कौतुक झाले.
‘फु बाई फु’ ची ऑफर दोनवेळा नाकारली होती :
भाऊंचे नाटक लोकप्रिय होत असल्यामुळे अनेकजण त्यांना ओळखत होते. त्यातच त्यांची सहज विनोद करण्याची कला आणि भोळेपणातुन घडणारे विनोद ह्यामुळे अनेकांनी त्यांचे नाव ‘फु बाई फु’ ह्या शो साठी सुचवले होते. परंतु भाऊंचा लाजाळू स्वभाव असल्यामुळे आणि टीव्हीवर काम करण्याच्या भीतीमुळे त्यांनी हि ऑफर दोन वेळा नाकारली. मला इतकं मोठं काम जमणार नाही, असेच त्यांना वाटत होते. परंतु जेव्हा त्यांना तिसऱ्यांदा हि ऑफर आली, तेव्हा त्यांनी हि ऑफरच स्वीकारली नाही तर ‘फु बाई फु’ च्या सहाव्या पर्वाचे ते विजेते सुद्धा ठरले. महेश मांजरेकर ह्यांनी दुबई मध्ये मराठीतला पहिला ‘मिक्टा अवार्ड’ आयोजित केला होता. ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी भाऊंना सुद्धा आमंत्रित केले होते. तिकीट आणि खाण्याचा खर्च आयोजक करणार होते. परंतु दुबईत जायचे म्हणजे पासपोर्ट आले, तेथे गरज लागल्यास अतिरिक्त खर्च ह्यासाठी भाऊंना चिंता होती, कारण त्यावेळी त्यांच्याकडे काहीच पैसे नव्हते. अश्यावेळी भाऊ ह्यांच्या पत्नींनी स्वतःची अंगठी भाऊंना गहाण ठेवायला सांगितली. भाऊंनी स्वतःच्या बायकोची अंगठी गहाण ठेवून दुबईवारी केली. भाऊंच्या पत्नीचे नाव ममता असून दोघांनी प्रेमविवाह केला आहे. भाऊंना तीन मुली असून मृण्मयी, संचिती आणि समृद्धी अशी त्यांची नावे आहेत.
‘फु बाई फु’ चे विजेतेपद पटकावल्यानंतर भाऊंना ‘चला हवा येऊ द्या’ ची ऑफर आली. डॉ. निलेश साबळे निर्मित ह्या शो मध्ये भाऊ कदम ह्यांच्या सोबत कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे आणि भारत गणेशपुरे ह्या सर्वांनी मिळून विनोदाची एक नवीन जत्राच सुरु केली. हा शो तुफान गाजू लागला. ह्या शो मुळे भाऊ कदम महाराष्ट्रभर लोकप्रिय झाले. ह्या शो मुळे त्यांना केवळ मराठी चित्रपटांच्याच नाही तर हिंदी चित्रपटांच्या सुद्धा ऑफर्स येऊ लागल्या. भाऊंनी ‘फेरारी कि सवारी’ ह्या हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षातच त्यांनी अनेक मराठी चित्रपटांत काम केले. त्यांनी नशीबवान, टाईमपास, वाजलाच पाहिजे गेम कि शिनेमा, हाफ तिकीट, जाऊ द्या ना बाळासाहेब, जगावेगळी अंतयात्रा, सांगतो ऐका, बाळकडू ह्यासारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. आता भाऊंना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. भाऊंच्या करिअरचा आलेख हा असाच उंच उंच जात राहो, ह्याच मराठी गप्पा कडून शुभेच्छा.