अनलॉकच्या काळात, अनेक मालिकांची आणि कार्यक्रमांची बदललेली रूपे आपण बघितली. कुठे कथानकाने काही वर्ष पुढे उडी घेतली होती तर काही मालिकांमधले कलाकार बदलले. त्यात आपल्या सगळ्यांचा आवडता ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रमही होता. या लोकप्रिय कार्यक्रमाने अनलॉकच्या काळात एका नवीन पर्वाची सुरुवात केली. ‘लेडीज झिंदाबाद’ म्हणत झी मराठीवरील नायिकांना या निमित्ताने एकत्र आणलं गेलंय. यातील एक आघाडीचं नाव म्हणजे सरिता मेहेंदळे-जोशी. सरिताला आपण ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकेतील मधुवंती या भूमिकेसाठी ओळखतो. मधुवंती म्हणजे एक हडळ असते आणि तिच्या गंमती जंमतींनी या मालिकेत धमाल उडवली होती. या आधी आपण मराठी गप्पावर याच मालिकेत ‘गोडबोले मॅडम’ हि एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या, दीप्ती केतकर यांच्यावरील लेख वाचला आहेच. त्या लेखाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल, मराठी गप्पाच्या टीमकडून वाचकांना धन्यवाद. याच मालिकेतील, मधुवंती विषयी म्हणजे सरिता मेहेंदळे-जोशी हिच्या अभिनय कारकिर्दीचा आज आपण थोडक्यात आढावा घेऊ.
सरिता मुळची सांगलीची. तिथेच तिचं लहानपण गेलं. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही तिथेच झालं. लहानपणापासून अभिनयाची आवड आणि हीच आवड जोपासण्यासाठी तिने रंगभूमीवरून एकांकिका आणि नाटके करण्यास सुरुवात केली. पुढे मालिकाविश्व तिला खुणावू लागलं. तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. असे हे कन्यादान, सरस्वती, नकुशी, दुहेरी, एका लग्नाची दुसरी गोष्ट, सारे तुझ्याचसाठी या तिची भूमिका असलेल्या मालिकांची नावे. यापैकी काही मालिकांमध्ये ती नायिका होती, तर काहींमध्ये खलनायिका. पण सगळ्याच भूमिकांमध्ये तिने समरसून काम केलं. तिच्या अनेक भूमिकांना प्रेक्षक पसंती मिळाली. असे हे कन्यादान, सरस्वती या दोन्ही मालिकांतील तिच्या भूमिका गाजल्या. नकुशी मधील तिची तन्वी हि व्यक्तिरेखासुद्धा गाजली.
एकीकडे मालिका आणि ती करत असलेल्या भूमिकांना प्रेक्षक पसंती मिळत होती. पण त्याचबरोबर नाटक हे पहिलं प्रेम असल्याने ते करावं असंही वाटत होतं. याचवेळी तिला एका नाटकात काम करायची संधी मिळाली. ‘अर्धसत्य’ हे ते नाटक. लोकप्रिय अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची यात प्रमुख भूमिका होती. हे नाटक यातील कलाकारांचा अभिनय आणि कथानक यांच्यामुळे गाजलं. या नाटकासोबतच ‘ए चल असं नसतं रे’, ‘सपने अपने अपने’, ‘साडे सहा रुपयांचं काय केलंस ?’ हि तिची काही गाजलेली नाटके आणि एकांकिका. याव्यतिरिक्तही तिने अनेक एकांकिका आणि नाटकांमधून काम केलं आहे. तिच्या याच कामाची दखल, अखिल भारतीय नाट्य परिषदेने आपल्या कलारजनी या कार्यक्रमात घेतली. तिला या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री म्हणून, ‘रंगप्रतिभा’ हा पुरस्कार देण्यात आला. तसेच, झी मराठी अवॉर्ड २०१९ या मानाच्या सोहळ्यातही तिला भागो मोहन प्यारे मधील भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला होता. नाटक, मालिका या क्षेत्रांसोबत तिने जाहिरातीतही काम केलं आहे. एका ज्वेलर्सच्या जाहिरातीत तिने अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत काम केलं होतं. हा अनुभव भन्नाट होता आणि खूप काही शिकवून जाणारा होता असं तिने एका मुलाखतीत नमूद केलं होतं.
भागो मोहन प्यारे सीरिअलमध्ये मोहन सोबत लग्नासाठी मागे लागणारी मधुवंती खऱ्या आयुष्यात विवाहित आहे. सरिताचे लग्न सौरभ जोशी ह्यांच्यासोबत झालेले आहे. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. दोघेही सोशिअल मीडियावर अनेकदा एकमेकांचे फोटोज शेअर करत असतात. सरिताच्या आईस्क्रीम खूप आवडतं. सरिताने एकदा दोघांचा फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये ‘आईस्क्रीम पेक्षा पण जास्त आवडणारी गोष्ट’ असं म्हणत सौरभबद्दल प्रेम व्यक्त केले होते. तिच्या अभिनयासोबतच चर्चा होते ते तिच्या सुंदर व्यक्तिमत्वाची. हे छाप पाडणारं व्यक्तिमत्व जपण्यासाठी उत्तम पण मर्यादित जेवण आणि व्यायाम करण्याकडे तिचा कल असतो. या सोबतच व्यस्त दिनचर्येतून वेळ मिळाला कुटुंबाला वेळ द्यायला आणि भटकंती करायला आवडतं. अशी हि गुणी अभिनेत्री मालिका, नाटक, जाहिरात यांच्या मधून आपल्या भेटीस आलीच आहे. आता तर ‘चला हवा येऊ द्या’ सारखा गेले कित्येक वर्ष महाराष्ट गाजवणाऱ्या कार्यक्रमाची ती भाग आहे. यापुढेही ती अनेक दर्जेदार कार्यक्रम, मालिका, नाटके आणि इतर माध्यमांद्वारे, विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीस येत राहील, हे नक्की. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी, मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)