मनोरंजन आणि क्रिकेट ही दोन्ही क्षेत्रे मराठी माणसांच्या आवडीची आहेत. या क्षेत्रांतील चालू घडामोडींवर या क्षेत्राच्या चाहत्यांची सदैव नजर असते. म्हणूनच मराठी गप्पाची टीम नवनवीन बातम्या आपल्या प्रेक्षकांसाठी सदैव आणत असते. सध्या या बातम्यांमध्ये सेलिब्रिटीजचं लग्न हा एक चर्चेचा विषय आहे. यात अजून एका सेलिब्रिटीच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. त्यात भर टाकणारी बाब म्हणजे ह्या जोडीतील एक जण क्रिकेटशी निगडित आहे तर दुसरी व्यक्ती ही मनोरंजन विश्वाशी.
होय. आपल्या, लक्षात आलं असेलंच ही जोडी आहे भारतीय क्रिकेट संघातील लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि युट्युबर धनश्री वर्मा यांची. या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात या दोघांनी साखरपुडा केला होता. त्याआधी दोघांची मैत्री खुलते आहे, असं वाटत असलं तरीही अचानक मिळालेल्या या बातमीने अनेक चाहते आश्चर्यचकित आणि आनंदी झाले होते. कारण लॉक डाऊन काळात युजवेंद्र याने धनश्रीची युट्युब वरील डान्स पाहून तिच्या ऑनलाइन क्लासेसमार्फत नृत्य शिकणं सुरू केलं होतं. धनश्री हिच्या युट्युब चॅनेलला आजतागायत २१ लाखांहून अधिक लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे, यावरून तिची लोकप्रियता लक्षात यावी. पुढे या दोघांनी एकत्र येऊन सोशल मीडिया लाईव्ह कार्यक्रम केला. या काळात त्यांच्यात मैत्री वाढत होतीच. पण इतक्या लवकर साखरपुड्याची बातमी येईल, असं फार कमी जणांना वाटलं असावं. पण एकदा साखरपुडा झाल्यानंतर मात्र त्यांचे अनेक फोटोज आणि गंमतीशीर व्हिडियोज युट्युब आणि इतर सोशल मीडियावर दिसायला लागले. अगदी आय.पी.एल. २०२० सुरू असताना दुबईत युजवेंद्र सोबत असलेली धनश्रीची उपस्थिती ही लक्षणीय होती.
या नवीन जोडीत वाढत असलेल्या प्रेमामुळे त्यांचे चाहते सुखावले होते आणि त्यात काल आलेल्या बातमीने या आनंदात भरच टाकली आहे. ज्याप्रमाणे साखरपुड्याची बातमी आल्यानंतर दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला होता, तसाच अभिनंदनाचा वर्षाव आताही या नवपरिणीत जोडीवर होतो आहे. क्रिकेटचा देव असं आपण ज्यांना मानतो त्या सचिन तेंडुलकर यांनी आपल्या सोशल मिडियाद्वारे युजवेंद्र आणि धनश्री यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकेट जगतातील इतर दिग्गज म्हणजे महेंद्र सिंग धोनी, वीरेंद्र सेहवाग, वेस्ट इंडिज चा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलं यांनीही युजवेंद्र यास पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सध्याच्या घडीला भारतीय टीम ऑस्ट्रेलियात टेस्ट मॅच सिरीज खेळण्यात व्यग्र आहे, त्यामुळे अनेक खेळाडू या लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत. पण भारताचा धडाकेबाज सलामीवीर आणि गब्बर फलंदाज शिखर धवन या लग्नाला उपस्थित होता. तसेच अनेक क्रिकेटपटूंनी ही युजवेंद्रला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. यात भारताचा अजून एक सलामीवीर ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा सहभाग आहे. त्याने युजवेंद्र यास गंमतीशीर शुभेच्छा देत म्हंटलं आहे, की युजवेंद्र तुझ्या गुगली टाकण्याच्या सवयीचा वापर तू प्रतिस्पर्ध्या विरुद्ध कर, तिच्या (धनश्री) मस्करीसाठी करू नकोस.
भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर यांनीही युजवेंद्र यास शुभेच्छा दिल्या आहेत. युजवेंद्र आय.पी.एल. स्पर्धा खेळत असलेल्या आर.सी.बी. संघानेही त्यास शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्या सोशल मीडिया अकाउंट द्वारे ही युजवेंद्र यास शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत. क्रिकेट जगतासोबतच मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटीजनी या नवपरिणीत जोडी चं अभिनंदन केलं आहे. रितेश देशमुख, अर्चना पुरणसिंग, करण वाही, प्रिन्स नरूला, किश्वर मर्चंट यांचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच चाहत्यांनीही दोघांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. या चाहत्यांमध्ये मराठी गप्पाची टिमही सामील आहे. युजवेंद्र आणि धनश्री या जोडप्याला मराठी गप्पाच्या टीमकडून त्यांच्या पुढील एकत्र वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !