Breaking News
Home / मनोरंजन / भारतीय जवानांचा व्हिडीओ होत आहे वायरल, बघा हा सुंदर व्हिडीओ

भारतीय जवानांचा व्हिडीओ होत आहे वायरल, बघा हा सुंदर व्हिडीओ

म्हणता म्हणता मराठी नववर्ष म्हणजे गुढी पाडवा आला सुद्धा. एरवी गुढी पाडव्याचं असणारं वैशिष्ठ्य म्हणजे शोभा यात्रा. त्यात सहभागी होणारी तरुणाई, सादर होणारी प्रात्यक्षिकं ही मुख्य आकर्षणे. या प्रात्यक्षिकांमधला एक प्रकार तर हमखास असणार म्हणजे असणारच, तो म्हणजे लेझीम खेळांचा. या शोभा यात्रांमध्ये लेझीम दाखवणारं पथक हे असतच असतं. पण केवळ शोभा यात्राचं नव्हे तर अन्य शुभ प्रसंगी ही लेझीम खेळाचा वापर केला जातो. अशा या लेझीम खेळाचा सराव करतानाचा एक व्हिडियो आमच्या टीमच्या नजरेस पडला. त्याविषयी लिहावं असं ठरलं आणि हा लेख आज लिहिला जातो आहे. आता तुम्ही म्हणाल लेझीम खेळाच्या सरावाचा व्हिडियो आहे म्हणजे त्यात खास काय आहे. कोणी मस्ती करतंय, कोणी काही अतरंगीपणा करतंय, असं काही आहे का ? तर तसं काही नाही. पण तरीही हा व्हिडियो खास ठरतो.

कारण आपल्या सुरक्षा बलातील मराठा बटालियनची एक तुकडी लेझीम चा सराव करताना दिसते. हा सराव कोणत्या कारणासाठी चालू असतो हे काही कळत नाही. पण एरवी पेक्षा वेगळा विषय असल्याने आपली उत्सुकता वाढते. हा सराव करताना आपले जवान चार चार च्या रांगेने उभे असतात. तसेच त्यांच्या समोर एक मुख्य सादरकर्ता जवान हा असतो. अशी ही १७ जणांची टीम लेझीम चं प्रात्यक्षिक करताना आपल्याला दिसते. सोबत लेझीमच्या कोणत्या स्टेप्स कधी कराव्यात हे सांगणारे प्रशिक्षकही असतातच. व्हिडियो सुरू होतो तेव्हा सराव आधीच सुरू झालेला असतो. पार्श्वभूमी म्हणून आपल्याला आवडणारं एक गाणं वाजत असतं. ‘दैवत छत्रपती’ हे छत्रपती शिवाजी महाराज यांची महती सांगणारं हे गाणं. शरद कसबे यांचे शब्द असलेल्या या गीताला साजन-विशाल या जोडीने चाल लावली आहे, तर विशाल चव्हाण यांनी हे गीत गायलं आहे. सुमित म्युझिक या प्रथितयश कंपनीने या गाण्याची निर्मिती केली होती. या गाण्यावर आपले हे जवान लेझीम चा सराव करताना दिसतात.

त्यांना उपस्थितांकडून खूप उत्तम प्रतिसाद मिळत असतो. प्रोत्साहन मिळत असतं. एकूणच छान अनुभव आपल्याला या व्हिडियोतून घेता येतो. एरवी न दिसणारी जवानांची ही बाजूही या निमित्ताने बघता येते. तसेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गाणं असल्याने ही जवान मंडळीसुद्धा अगदी जोशात सादरीकरण करताना दिसतात. केवळ दोन मिनिटं आणि काही सेकंदांचा हा व्हिडियो. पण त्यानिमित्ताने आपल्या जवानांच्या आयुष्यात काही काळ का होईना डोकावता येतं याचा आपल्याला आनंद असतो. या व्हिडियोच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांना मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा. तसेच प्रत्येक क्षणी आपल्या रक्षणासाठी झटणाऱ्या, भारतीय सीमेचं जीवाची बाजी लावून संरक्षण करणाऱ्या भारतीय सुरक्षा बलांना ही मराठी गप्पाची टीम मानाचा मुजरा करते, तसेच त्यांनाही मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा देते.

मराठी गप्पाच्या टीमने लिहलेल्या प्रत्येक लेखाला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या तमाम वाचकांना मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गेल्या वर्षात अनेक मराठी जन हे उद्योग, व्यवसायात नव्याने सहभागी झालेले आपल्याला दिसून आले आहेत. येत्या वर्षभरात त्यांचे उद्योग अजून बळकट होऊ देत आणि त्यायोगे मराठी समाजात आर्थिक भरभराट होऊ दे हीच या नववर्षाच्या निमित्त देवा चरणी प्रार्थना. आणि हो, हा लेख आवडला असल्यास नक्की शेअर करा. तसेच मराठी गप्पावर दररोज प्रदर्शित होणारे, नवनवीन लेखही वाचत राहा, शेअर करत राहा. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *