आपण अनेक वेळेस कला प्रदर्शनांना जात असतो. त्यातील कलाकारांच्या कला पाहून आपल्याला थक्क व्हायला होतं. त्यांनी तासनतास खर्चून तयार केलेली कलाकृती, कलात्मकतेने वापरलेल्या वस्तू, त्यांची त्यामागची भूमिका हे सगळंच विलक्षण वाटतं. हल्ली सोशल मीडिया मुळे अशा विलक्षण कलाकृती आपल्याला अगदी कुठेही न जाता आणि अगदी चट्कन पाहता येतात. अशाच एका कलाकृतीचा वायरल व्हिडीओ आमच्या टीमच्या नजरेस पडला. ही कलाकृती साकार करणारा कलाकार उभा असतो एका भिंती समोर. त्यामुळे भिंतीवर एखादं सुबक चित्र काढेल असा आपला अंदाज असतो. जो खराही ठरतो. पण यावेळेस कुंचला म्हणून या कलाकाराने हातात घेतलेलं असतं ते जळतं लाकूड.
जळतं लाकूड घेऊन या चित्रकाराने प्रेरणादायी असं काही काढावं असं काहीसं सहज मनात चमकून जातो आणि ही बाबही चित्रकार पूर्ण करतात. त्यांचा ज्वलंत ‘कुंचला’ हातात घेऊन ते रेखाटन करण्यास सुरवात करतात. काहीच काळात लक्षात येतं की यांनी एक अश्व चितारण्यास सुरुवात केली आहे. वेळोवेळी हातातील जळतं लाकूड बदलत चित्र आकारास येत असतं. काहीच क्षणात लक्षात येतं, हे तर आपल्या परमपूज्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र आहे. आपण अधिक बारकाईने हा व्हिडियो पाहण्यात दंग होतो. चित्र आकारास येत असताना, जळत्या लाकडाचा काही भाग खाली पडत असतो, तर काही भाग विझत असतो. तेव्हा पुन्हा त्यांना प्रज्वलित केलं जातं. आता तो प्रज्वलित कुंचला चालू लागतो ते हे चित्र पूर्ण करण्याच्या उद्देशाने. याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नुकतीच ऐकलेली अथवा वाचलेली बाब आपल्याला पटकन आठवते. सदर माहिती शालेय वयात कळली असती तर इतिहास अजून खोल शिरून शिकता आला असता हेही वाटून जातं.
चार शतके उलटूनही ज्यांच्या कर्तृत्वाची मोहिनी मनात खोलवर रुजलेली आहे असे आपले महाराज. त्यांच्याविषयी जाणून घ्यावं तेवढं आपल्या ज्ञानात भर पडते आणि त्यांचं द्रष्टेपण आपल्या नकळत त्यांच्या समक्ष नतमस्तक करतं. आपण या विचारात गढले असताना म्हणता म्हणता त्यांचं अश्वारुढ चित्रही पूर्ण होतं. व्हिडियोत ते काही वेळ दिसतं. आपण तेवढ्या वेळेत छत्रपती शिवरायांना वंदन करतो. चित्र पूर्ण झाल्यावर चित्रकार कोण आहेत याची थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचं नाव कळतं.या कलाकाराचं नाव आहे राम देशमुख. राम हे प्रथितयश चित्रकार आहेत. त्यांनी आजतागायत असंख्य तैल चित्र, रेखाटनं केली आहेत. पण यात अजून काही वेगळं आणि कलात्मक करता येईल का हे त्यांनी पाहिलं आणि जळत्या लाकडाचा वापर कुंचला म्हणून करावा असं त्यांनी ठरवलं आणि आपल्या समोर जी कलाकृती उभी राहिली ती आता सर्वश्रुत झाली आहे. अनेक दिग्गज सेलिब्रिटीजनी राम यांच्या या पद्ध्तीचे आणि त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले आहे.
आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, नक्की पाहून घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. या पद्धतीचा वापर करून राम यांनी अन्यही काही चित्रे रेखाटली आहेत. यात रावणाचा व’ध करण्यास सरसावलेले श्रीराम हा प्रसंगही त्यांनी चितारलेला आहे. त्यांनी स्वतःचं असं यु’ट्युब चॅ’नेल सुरू केलं असून या चॅ’नेल वरून त्यांनी साकार केलेल्या अनेक कलाकृती आपल्याला पाहता येतात. ऐतिहासिक आणि सध्याच्या काळातील सन्माननीय व्यक्तींचे व्यक्तिचित्रण येथे केलेले आहे. या लेखाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मानाचा मुजरा आणि राम देशमुख यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
बघा व्हिडीओ :