सध्या अनेक कलाकार विवाह बंधनात अडकत आहेत. काहींचे साखरपुडे होताहेत. या सगळ्यांमध्ये भर पडली आहे आपली लाडकी अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक हिची. तिचा मित्र परदीप खरेरा याच्यासोबत तिने साखरपुडा केला आहे. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यांत तिने आणि परदीप या दोघांनी मिळून त्यांच्या नात्याची बातमी चाहत्यांना दिली होती. मानसी एक उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे हे आपल्याला माहिती आहेच. तिने हु तू तू, मर्डर मेस्त्री, जस्ट कॅरी ऑन देशपांडे, द शाडो, भविष्याची ऐशी तैशी, ढोलकी अशा अनेक चित्रपटांमधून कामे केलेली आहेत. तिने नजीकच्या काळात चित्रपटांतून प्रामुख्याने भूमिका केल्या असल्या तरीही टेलीविजनच्या पडद्यावरही स्वतःचं असं वेगळ अस्तित्व निर्माण केलंय. चार दिवस सासूचे हि अतिशय गाजलेली मालिका. या मालिकेत तिने प्रियांका हि भूमिका केली होती. तसेच ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचाहि ती भाग होती.
अभिनयासोबतच तिने अप्सरा आली, ढोलकीच्या तालावर या नृत्यस्पर्धांमधून स्पर्धक आणि परीक्षक अशा दोन्ही भूमिकांतून वेगवेगळ्या वेळी सहभाग नोंदवला आहे. तसेच मिक्टा, फिल्मफेअर, संस्कृती कलादर्पण अशा विविध सोहळ्यांतून तिने स्वतःचे नृत्यकौशल्य दाखवलेले आहेच. तिच्या नृत्याविष्काराने प्रत्येक वेळी प्रेक्षकांनाहि थिरकायला लावलेले आहे. अशा या लोकप्रिय मानसीला संस्कृती कलादर्पण चा स्टाईल आयकॉन, बेस्ट एन्टरटेनर २०१३ असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. परदीप यालाही मानसीप्रमाणे अनेक पुरस्कार आणि किताब मिळालेले आहेत. तो एक खेळाडू असून, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धांमध्ये तो भारताचं प्रतिनिधित्व करतो. त्याने डब्ल्यू.बी.सी. एशियन टायटल चॅम्पियन हा किताब कमावला आहे आणि दीर्घ कालावधीत हा किताब स्वतःकडे ठेवण्यात त्याला यश आलेले आहे. तसच तो मॉडेल म्हणूनही काम करतो. अनेक प्रथितयश नाममुद्रांसाठी त्याने मॉडेलिंग केलेलं आहे. तसेच जाहिरातीतूनही तो झळकलेला आहे. बजाज डॉमिनर या बजाज च्या बाईकच्या जाहिरातीत तो होता. तसेच ओयो रूम्सच्या जाहिरातीतहि त्याने अभिनय केलेला आहे.
परदीपची मानसीशी भेट झाली ती एका सामायिक मित्रांमुळे. या भेटीत दोघांची एकमेकांशी ओळख झाली. हळूहळू ते एकमेकांचे मित्र झाले. यथावकाश मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनाही एकमेकांविषयी वाटणारे प्रेम प्रथमतः व्यक्त केले ते परदीप याने मानसीला प्रपोज करून. तिलाही तो आवडत होता, तेव्हा तिनेही त्याला होकार दिला. आधी सांगितल्याप्रमाणे या दोघांनीही मानसीच्या वाढदिवशी त्यांच्या नात्याची बातमी त्यांच्या चाहत्यांना सोशल मिडियाच्या माध्यमांतून दिली. तेव्हापासून दोघांचे अनेक गोड फोटोज त्यांच्या चाहत्यांनी पहिले आहेतच. त्यांनी १० नोव्हेंबर रोजी साखरपुडा केला आणि लगोलग त्याचे फोटोज शेअर केले. यासोबतच त्यांच्यावर शुभेच्छांचा सर्व बाजूंनी वर्षाव झाला आहे. त्यांचे मित्र, नातेवाईक, चाहते या सर्वांकडून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यांनी त्यांच्या नात्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या साखरपुड्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. आता त्यांच्या लग्नाची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. येत्या काळात हे गोड जोडपं लवकरच लग्नाच्या आणाभाका घेताना दिसेल अशी आशा करायला हरकत नाही. तत्पूर्वी मराठी गप्पाच्या टीमकडून या गोड जोडीचं, साखरपुडा झाला यानिमित्त अभिनंदन आणि येत्या काळातील वाटचालीसाठी तसेच दोघांच्या यशस्वी कारकिर्दीसाठीही खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)