Breaking News
Home / मराठी तडका / मराठी चित्रपटसृष्टीतले हे १० कलाकार आपल्या आईवडिलांचा वारसा पुढे नेत आहेत, बघा कोण आहेत हे कलाकार

मराठी चित्रपटसृष्टीतले हे १० कलाकार आपल्या आईवडिलांचा वारसा पुढे नेत आहेत, बघा कोण आहेत हे कलाकार

कलाक्षेत्रात जाऊन काम करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. यात कलाकारांच्या मुलांचाही समावेश झालाच. अनेकांचं नसतंही. या पूर्वी आपण मराठी गप्पावर काही कलाकारांच्या मुलांबद्दल वाचलं होतं, ज्यांनी कलाक्षेत्रात काम करण्याऐवजी त्यांना आवडणाऱ्या दुसऱ्या क्षेत्रात जाणं पसंत केलं. आजच्या लेखातून आपण कलाकारांच्या अशा मुलांविषयी वाचणार आहोत ज्यांनी कलाक्षेत्रात कारकीर्द करणं पसंत केलं. यातील अनेकांनी स्वतःची एक ओळख बनवण्यात यश मिळवलं आहे. तर काहींनी नुकतीच या प्रवासाला सुरुवात केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोण कोण आहेत ही नव्या पिढीची कलाकार मंडळी.

अमृता सुभाष :
ज्योती सुभाष या जेष्ठ लोकप्रिय अभिनेत्री. त्यांनी नाटक, चित्रपट, शॉर्ट फिल्म्स अशा विविध माध्यमांतून आपलं मनोरंजन केलेलं आहे. त्यांची मुलगी म्हणजे आजची आघाडीची कलाकार अमृता सुभाष. अमृता यांनीही त्यांच्या आईप्रमाणे वैविध्यपूर्ण भूमिका करण्याकडे कल दाखवला. तसेच विविध माध्यमांतून त्या कार्यरत असतात. मध्यंतरी लोकप्रिय झालेल्या व्हॉट्सअपच्या जाहिराती मुख्य व्यक्तिरेखा त्यांची होती. अर्थात हे अलीकडंच उदाहरण. त्यांनी अनेक गाजलेल्या कलाकृतींतुन अभिनय केलेला आहे. त्यांना साहित्याचीही आवड आहेच. लोकप्रिय कवी, संगीतकार गुलजार यांच्या कविता त्यांनी मराठीत भाषांतरित केलेल्या आहेत.

गश्मीर महाजनी :
रवींद्र महाजनी यांना आपण त्यांच्या दमदार व्यक्तिमत्व, तेवढाच उत्तम अभिनय यासाठी ओळखतो. त्यांचा मुलगा गश्मीर हा सुद्धा त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन कलाक्षेत्रात दाखल झाला होता. त्यानेही स्वतःची छाप प्रेक्षकांवर यशस्वीरित्या पाडली आहे. हिंदी सिनेमातून कारकिर्दीची सुरुवात करणारा गश्मीर पुढे नाटकांकडे वळला. पृथ्वी थिएटर मध्ये कार्यरत होता. दादाची गर्लफ्रेंड हे त्याचं गाजलेलं नाटक. पुढे सिनेमांकडे तो वळला आणि तेथे त्याने स्वतःचा उत्तम जम बसवला. देऊळ बंद सारखे उत्कृष्ठ चित्रपट त्याने केले. तसेच हिंदी मालिकांमध्येही तो रमला. नुकतीच त्याची इमली ही हिंदी मालिका प्रसारित होईल. तसेच त्याची नवीन वेब सिरीज ही आली आहे, ज्यात तो श्रीकांत म्हात्रे ही भूमिका साकारली आहे.

आदिनाथ कोठारे :
धडाकेबाज अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता म्हणजे महेशजी कोठारे. त्यांचे चित्रपट, त्यातील किस्से यांविषयी मराठी गप्पाच्या टीमने सातत्याने लिखाण केलेलं आहे. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन त्यांचा मुलगा आदिनाथ हा ही निर्मिती क्षेत्रात उतरला आहे. सध्या चालू असलेल्या दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेत त्याचा सिंहाचा वाटा आहे. त्याने बालकलाकार म्हणूनही काम केलेलं आहे. महेशजींनी दिग्दर्शित केलेला माझा छकुला हा त्याचा बाल कलाकार म्हणून प्रसिद्ध झालेला चित्रपट.

सखी गोखले :
शुभांगी गोखले आणि मोहन गोखले यांनी कन्या म्हणजे सखी. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून तिने मालिका क्षेत्रात पदार्पण केले. तसेच नाटकांतूनही तिने अभिनय केलेला आहे. लॉक डाऊन चालत असताना तिने आठशे खिडक्या नऊशे दारं या मालिकेत थेट परदेशातून सहभाग नोंदवला होता. तिचं लग्न सुव्रत जोशी या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झालेलं आहे.

अभिनय सावंत :
निर्मिती सावंत म्हणजे मराठी मनोरंजन क्षेत्रातलं अग्रगण्य नाव. असंख्य चित्रपट, मालिका, नाटकं यांतून त्यांनी प्रेक्षकांचं सदैव मनोरंजन केलं. गंगुबाई ही त्यांनी लोकप्रिय केलेली व्यक्तिरेखा. या व्यक्तिरेखेने, प्रत्येक वेळी प्रेक्षकांना हसवलं, अनेक वेळेस अंतर्मुख ही केलं. अभिनय सावंत हा निर्मितीताईंचा मुलगा. त्याने ही निर्मितीताईंप्रमाणे अनेक मालिका आणि चित्रपटातुन काम केलेलं आहे. श्रीमंत दामोदर पंत, अकल्पित या सुप्रसिद्ध चित्रपटांत त्याने अभिनय केलेला आहे.

मृण्मयी गोडबोले :
रंगा गोडबोले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीरंग गोडबोले यांची मृण्मयी ही कन्या. श्रीरंग यांनी अनेक उत्तमोत्तम मालिका, नाटके आपल्याला दिली आहेत. अनेक मालिकांच्या जिंगल्स ही त्यांनी केल्या आहेत. त्यांचे हे कलागुण मृण्मयी मध्ये पुरेपूर उतरले आहेत. तिला रंगमंचावर काम करायला आवडतंच. पती गेले गं काठेवाडी हे तिचं गाजलेलं नाटक. सोबत तिने अनेक चित्रपटांमधून, वेब सिरीज मधूनही अभिनय केलेला आहे. येरे येरे पैसा २, चि व चिं.सौ.का हे तिने अभिनित केलेले लोकप्रिय चित्रपट. येत्या काळात तिचे झिम्मा आणि गोदाकाठ हे दोन चित्रपट प्रदर्शित होतील.

विराजस कुलकर्णी :
मृणाल कुलकर्णी म्हणजे प्रथितयश अभिनेत्रींपैकी एक. त्यांना आपण अनेक विविध भूमिकांमधून पाहिलं आहे आणि त्यांनीही प्रत्येक भूमिका अगदी जिवंत केली आहे. मग स्वामी मधली रमा असो, अवंतिका मधली मध्यवर्ती भूमिका किंवा लहानमुलांची आवडती सोनपरी. अभिनयासोबत त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही उत्तम काम केलेलं आहे. त्यांचा मुलगा विराजस हा सुद्धा कलाक्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवतो आहे. गेले जवळपास दशकभराहून अधिक काळ, तो रंगभूमी, मालिका, सिनेमा क्षेत्राशी निगडित आहे. या क्षेत्रात त्याने अभिनय, दिग्दर्शन यामधून खूप चांगला अनुभव कमावला आहे. सध्या त्याची झी मराठी वरील माझा होशील ना ही मालिका खूप लोकप्रिय ठरत आहे. सोबतच त्याची आदित्य ही व्यक्तिरेखा खूपच प्रसिद्ध होत आहे.

शुभंकर तावडे :
सुनील तावडे म्हणजे विनोदाची हमखास मेजवानी. त्यांनी कलाक्षेत्रात अनेक माध्यमांतून अभिनय केलेला आहे. पण त्यांनी प्रहसनं सादर करताना साकार केलेल्या व्यक्तिरेखा मनात घर करून राहतात. त्यांनी साकारलेले राजकुमार तर अप्रतिम. पण केवळ विनोदी भूमिकाच नाही तर इतर भूमिकाही त्यांनी केल्या आहेत. आज त्यांचा मुलगा शुभंकर हासुद्धा कलाक्षेत्रात स्वतःचा जम बसवतो आहे. फ्रेशर्स मालिकेतून त्याने टीव्ही वर आगमन केले. पुढे कागर सारख्या चित्रपटात तो होता. मालिका, चित्रपट करताना त्याने स्वतःचं रंगभूमीवरचं प्रेम कमी होऊन दिलेलं नाही. विविध नाट्यकृतींतुन तो अभिनय करतो आहे. नुकतंच त्याने एका म्युझिक व्हिडीओतही काम केलं आहे. प्रेमाची आरती असं त्याचं नाव. तसेच ‘८ दोन ७५’ हा त्याची भूमिका असलेली नवीन कलाकृती येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अभिनय बेर्डे :
मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. लक्ष्मीकांतजी बेर्डे यांच्या वर चित्रित झालेलं हे गाणं. खऱ्या अर्थाने त्यांना लागू होणारं. नाटक, चित्रपट या माध्यमांतून प्रेक्षक मनावर हयात असताना आणि नसतानाही राज्य करणारा कलाकार. त्यांचं विनोदाचं टायमिंग अफलातून. संवादातील शब्दखेळ लाजवाब. म्हणूनच महाराष्ट्राचे ते खरे सुपरस्टार. त्यांच्या प्रमाणेच प्रिया बेर्डे यासुद्धा उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना. त्यांनीही लक्ष्मीकांतजी यांच्या प्रमाणे अनेक उत्तमोत्तम व्यक्तिरेखा साकारल्या आणि अनेक गाजलेल्या कलाकृतींचा त्या भाग होत्या. अभिनय बेर्डे हा त्यांचा आणि प्रिया बेर्डे यांचा मुलगा. काही काळापूर्वी तोही चित्रपट क्षेत्रात दाखल झाला. पण तत्पूर्वी महाविद्यालयीन एकांकिकांमधून त्याने कलाक्षेत्रात प्रवेश केलेला होता. पुढे चित्रपटांतून मुशाफिरी सुरू झाल्यावर त्याने ‘ती सध्या काय करते’, ‘रंपाट’ हे लोकप्रिय चित्रपट केले. रंपाट या चित्रपटात तो प्रियाजींसोबत प्रथमतः चित्रपटात एकत्र दिसला होता.

स्वानंदी टिकेकर :
उदय टिकेकर आणि आरती अंकलीकर टिकेकर ही कलाकार जोडी महाराष्ट्राला सुपरिचित आहे. दोघांनीही अभिनय आणि संगीत क्षेत्रात उत्तम काम करून ठेवलेलं आहे. त्यांची मुलगी म्हणजे स्वानंदी टिकेकर. स्वानंदी हिने अभिनेत्री म्हणून दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतून पदार्पण केलं. तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. तिचा उत्तम अभिनेत्री होण्याकडे प्रवास चालू असताना सिंगिंग स्टार या नुकत्याच संपन्न झालेल्या रियालिटी शो साठी तिल विचारणा झाली. तिने होकार दिला आणि शो सुरू झाला. पहिल्या भागापासून ते अंतिम फेरीत विजेती होईपर्यंत तिने नेहमीच उत्तम रीतीने गायन केलं. या रियालिटी शो ची विजेती ठरल्यानंतर तिच्यावर चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतो आहे. तसेच अभिनेत्री आणि आता गायिका म्हणून ती आपल्या आई वडिलांचा कलाक्षेत्रातील वारसा समर्थपणे पुढे चालवते आहे.

ह्या सर्व कलाकारांना मराठी गप्पातर्फे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *