बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतले दिग्गज अभिनेते विजू खोटे ह्यांचे आज ३० सप्टेंबर रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. चित्रपटसृष्टीतला हा हुरहुन्नरी कलाकार आज देवाघरी गेला. विजू खोटे अनेक दिवसांपासून आजारी होते. आज सकाळी त्यांनी मुंबईतील गायदेवी येथील आपल्या घरात शेवटचा श्वास घेतला. सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या काही अवयवांनी काम करणं बंद केले होते. सोशिअल मीडियावर अनेक सेलिब्रेटींनी विजू खोटे ह्यांना श्रद्धांजली वाहिली. विजू खोटे ह्यांच्या भाचीने सांगितले कि, “त्यांची इच्छा नव्हती कि त्यांचे निधन हॉस्पिटल मध्ये व्हावे. ह्याच कारणामुळे आम्ही त्यांना हॉस्पिटलमधून घरी आणले.” त्यांचे अंतिम संस्कार आज दुपारी करण्यात आले.
विजू खोटे ह्यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूड इंडस्ट्री तसेच मराठी इंडस्ट्री मध्ये शोक व्यक्त होत आहे. चित्रपटसृष्टीतले लोकं तसेच त्यांचे फॅन्स सुद्धा खूप दुखी आहेत. विजू खोटे ह्यांनी ‘शोले’ चित्रपटात ‘कालिया’ नावाचे आयकॉनिक कॅरॅक्टर निभावले होते. विजू खोटेंच्या कालियाच्या भूमिकेने लोकांच्या मनात इतकी छाप पाडली होती कि आजसुद्धा त्यांना कालियाच्या कॅरॅक्टर साठी ओळखलं जातं. विजू खोटे ह्यांना ह्या रोलसाठी त्याकाळी २५०० रुपये फी देण्यात आली होती. विजू खोटे ह्यांच्या भूमिका ज्याप्रकारे हिंदी चित्रपटात गाजल्या, त्याचप्रकारे मराठी चित्रपटात सुद्धा त्यांनी आपली एक वेगळीच छाप सोडली होती. ‘अशी हि बनवाबनवी’ मधील त्यांची व्हिलनची भूमिका अजूनही तितकीच लोकांच्या लक्षात आहे. तसेच ‘आयत्या बिळावर नागोबा’, ‘या मालक’ ह्या चित्रपटातल्या त्यांच्या भुमकाही खूप गाजल्या. विजू खोटे १९६४ पासून चित्रपटसृष्टीशी जोडले गेले. त्यांनी ‘या मालक’ ह्या मराठी चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. हा चित्रपट त्यांचे वडील नंदू खोटे ह्यांनी प्रोड्युस केला होता.
त्यांनी आपल्या चित्रपट करियर मध्ये अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले. ‘शोले’ चित्रपटाशिवाय त्यांना ‘अंदाज अपना अपना’ मधील भूमिकेसाठी सुद्धा ओळखले जाते. विजू खोटे हे विनोद भूमिकेत जास्त प्रभावशाली वाटायचे. ह्याच कारणामुळे त्यांनी नंतर स्वतःला व्हिलनच्या भूमिकेतून विनोदी भूमिकेत शिफ्ट केले. विजू खोटे ह्यांचा शेवटचा चित्रपट ‘जाने क्यों दे यारो’ हा होता. हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला होता. विजू खोटे ह्यांनी जवळजवळ तब्बल ३०० मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले होते. विजू खोटे ह्यांची बहीण शुभा खोटे ह्या लोकप्रिय चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री आहेत. त्या २०१७ मध्ये आलेल्या ‘टॉयलेट – एक प्रेमकथा’ चित्रपटात अक्षय कुमारच्या आजीच्या भूमिकेत दिसल्या होत्या.