मराठी मनोरंजन विश्वातील विविध गोष्टींवर मराठी गप्पाची टीम सातत्याने लिहीत असते. मग त्या नवनवीन मालिका असोत, कलाकार असोत वा त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी. आपण गेल्या एका लेखात खऱ्या आयुष्यातील नवरा बायको असणाऱ्या जोड्यांनी काही कलाकृतींत भाऊ बहिणीची भूमिका साकार केली होती, हे वाचलं असेलंच. आज आपण खऱ्या आयुष्यातील बहिणी आणि पेशाने अभिनेत्री असणाऱ्या कलाकारांविषयी वाचणार आहोत.
वंदना गुप्ते, भारती आचरेकर आणि राणी वर्मा :
वर उल्लेख केलेल्या तिनही कलाकार या उत्तम अभिनेत्री आहेत तसेच उत्तम गायक सुद्धा. या तीनही अभिनेत्री दिवंगत गायिका माणिक वर्मा यांच्या कन्या आहेत. तिघींनी अनेक कलाकृतींतुन आपल्या घरातील अभिनय आणि संगीत कलेचं जतन केलेलं आहे. तसेच आजही त्या विविध माध्यमं आणि कलाकृतींतुन आणि विविध भूमिकांतून आपल्या समोर येत असतात. वंदना गुप्ते यांनी बकेट लिस्ट, व्हॅटसप लग्न, पछाडलेला, टाइम्प्लिज, डबल सीट, सुंदर मी होणार, चार चौघी अशा विविध कलाकृतींतुन अभिनय केलेला आहे. भारती आचरेकर यांनीही अनेक हिंदी मराठी कलाकृतींमधून विनोदी, गंभीर आशा वैविध्यपूर्ण भूमिका साकार केल्या आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या कुली नं.१ च्या रिमकेमध्येही त्यांनी काम केलेले आहे. राणी वर्मा या उत्तम गायिका असून त्यांनी सुखकर्ता दुःख्खहर्ता, गा गीत तू सतारी, पप्पा सांगा कोणाचे अश्या प्रसिद्ध गाण्यांमध्ये गायन केलेलं आहे.
पल्लवी जोशी आणि पद्मश्री जोशी :
सारेगमप लिटिल चॅम्प्स म्हंटल्यानंतर छोटी गायकमंडळी जशी आठवतात तसेच या कार्यक्रमाची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या पल्लवी जोशी यांचीही आठवण होतेच. पल्लवी यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं, तसेच अनेक मालिका, सिनेमे यांतूनही त्यांनी अभिनय केलेला आहे. त्यांची बहीण म्हणजे पद्मश्री जोशी यासुद्धा उत्तम अभिनेत्री आहेत. त्यांनीही अनेक मराठी चित्रपटांतून अभिनय केलेला आहे. नणंद भावजय, व्हेंटिलेटर हे त्यांचे गाजलेले चित्रपट. त्यांचं लग्न प्रसिद्ध अभिनेते विजय कदम यांच्याशी झालेलं आहे. या दोघांच्या जोडीचे अनेक सिनेप्रेमी आजही चाहते आहेत. पद्मश्री आणि पल्लवी यांना एक भाऊ असून मास्टर अलंकार असं त्यांचं नाव. बालकलाकार म्हणून मास्टर अलंकार हे फारच लोकप्रिय होते. सध्या ते परदेशी स्थायिक असून तिथे व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत.
पल्लवी वैद्य आणि पूर्णिमा तळवलकर :
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील पुतळाबाई राणीसाहेब यांची ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकार केली होती पल्लवी वैद्य यांनी. या मालिकेअगोदर पल्लवी यांनी विविध नाटकं, मालिका यांतून अभिनय केलेला आहे. चार दिवस सासूचे, विडंबन एकच प्याला, कुलवधू, अगं बाई अरेच्चा, उनपाऊस या त्यांनी अभिनित केलेल्या कलाकृतींपैकी काही कलाकृती. पल्लवी यांची मोठी बहीण म्हणजे पूर्णिमा तळवलकर. होणार सून मी ह्या घरची, अवंतिका, दोन घडीचा डाव, कळत नकळत, या त्यांच्या गाजलेल्या मालिका. होणार सून मी ह्या घरची मालिकेतील ‘बेबी आत्या’ हे पात्र तर लक्षणीयरीत्या प्रसिद्ध झालं होतं. तसेच नवा गडी नवं राज्य, वाह गुरू, ओळख ना पाळख ही नाटकेही त्यांनी केली आहेत. मराठी सोबतच त्यांनी हिंदीतील कलाकृतींमध्येही विपुल प्रमाणात अभिनय केलेला आहे.
भार्गवी चिरमुले आणि चैताली गुप्ते :
सध्या चालू असलेल्या स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत नीना कुळकर्णी यांनी जिजाऊ आईसाहेबांची भूमिका साकार केलेली आहे. त्यांच्या आधी भार्गवी चिरमुले यांनी ही भूमिका केली होती. भार्गवी या उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगना आहेत. एका पेक्षा एक या नृत्य कार्यक्रमाचे विजेतेपद त्यांनी काही काळापूर्वी पटकावले होते. त्यांची बहीण म्हणजे चैत्राली गुप्ते. भार्गवी यांच्याप्रमाणेच यासुद्धा उत्तम अभिनेत्री आहेत. भार्गवी यांच्याप्रमाणेच मराठी नाटक, सिनेमा, मालिका अशा विविध माध्यमातून आपण त्यांना अभिनय करताना पाहिलेलं आहे. ये रिशते हे प्यार के, पिया अलबेला, श्रीमंत दामोदर पंत, सत्ताधीश, आभाळमाया, अवंतिका ही त्यातली काही निवडक उदाहरणं. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक लोकेश गुप्ते हे चैत्राली यांचे पती आहेत.
मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे :
सध्या मालिकांच्या प्रेक्षकवर्गात माझा होशील ना या मालिकेचे प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर असलेले दिसून येतात. सई आणि आदित्य यांची प्रेमकहाणी प्रत्येकालाच भावते आहे. त्यांच्या या प्रेमकहाणीत आलेला लग्नाचं वळण येत्या काळात मालिकेला अजून उंचीवर नेऊन ठेवणार आहे, हे नक्की. यातील सई ची भूमिका ही गौतमी देशपांडे हिने अतिशय उत्तम रीतीने बजावली आहे. याआधीही तिने बॉक्सर असणाऱ्या एका नायिकेची भूमिका एका मालिकेत साकार केली होती. अभिनयासोबतच तिला गाण्याचंही अंग आहे हे तिच्या चाहत्यांना माहिती आहेच. अनेक वेळेस ती आपल्या सुरेल आवाजातील गाणी रेकॉर्ड करून सोशल मिडियावरती शेअर करत असते. यात काही वेळेस तिची मोठी बहीण मृण्मयी सुद्धा सामील असते. मृण्मयी ही उत्तम अभिनेत्री, सुत्रसंचालक, दिग्दर्शक आहे हे आपण ओळ्खतोच. कुंकू या प्रसिद्ध मालिकेपाऊन सुरू झालेला तिचा प्रवास आजतागायत यशाची वेगवेगळी शिखरे गाठत चालू आहे. या तिच्या प्रवासातील मन फकिरा, मिस यु मिस्टर, फर्जंद, फत्तेशिकस्त, क ट्यार काळजात घुसली, नटसम्राट ही काही महत्वाची वळणं ज्यांनी तिची कारकीर्द ही खुलवली आहे.
खुशबू आणि तितीक्षा तावडे :
सरस्वती या मालिकेचं नाव आठवलं की तितीक्षा तावडे हिचा गोड चेहरा चटकन आठवतो. इतकं उत्तम काम तिने या भूमिकेतून केलेलं आहे. तसेच ती कन्यादान, टोटल नादानिया या इतर मालिकांतूनही अभिनय करताना दिसलेली आहेच. तिच्याप्रमाणे तिची बहीण खुशबू तावडे हीसुद्धा उत्तम अभिनेत्री आहे. तिने अनेक मराठी आणि हिंदी मालिका यांतून अभिनय केलेला आहे. एक मोहोर अबोल, तू भेटशी नव्याने, तारक मेहता का उलटा चष्मा, पारिजात, तेरे बिन या तिच्या अभिनित केलेल्या काही कलाकृती. दोघी बहिणींनी काही काळापूर्वी स्वतःचा एक कॅफे सुरू केलेला आहे. तसेच त्यांचं स्वतःचं एक युट्युब चॅनेलही आहे ज्याबद्दल आपण मराठी गप्पावरील एका लेखातही या आधी वाचलं असेल.