स्टारप्रवाह वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हि मालिका सध्या प्रचंड गाजत आहे. टीआरपी मध्ये सध्या हि मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. ह्या मालिकेतील कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय आणि मालिकेत दाखवण्यात आलेले नवीन नवीन वळण ह्यामुळे प्रेक्षकांनासुद्धा हि मालिका खूप आवडत आहे. ह्या मालिकेतील सर्वच कलाकार लोकप्रिय होत आहेत. गौरी आणि जयदीपच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलेलंच आहे. त्याचप्रमाणे शालिनी आणि मल्हार हि जोडी देखील खूप गाजत आहे. आपल्या नकारात्मक पण उत्कृष्ट खलनायिकेच्या भूमिकेमुळे शालिनी तर गाजत आहेच परंतु आपल्या दमदार भूमिकेमुळे मल्हार शिर्के पाटील सुद्धा लोकप्रिय होत आहे. आजच्या लेखात आपण ह्याच मल्हार शिर्के पाटील ह्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत.
मालिकेत मल्हारची भूमिका साकारली आहे ती म्हणजे अभिनेता कपिल होनराव ह्याने. कपिलचा लातूरमधील एका छोट्याश्या खेडेगावात शेतकरी कुटुंबात जन्म झाला. वडील भरत होनराव हे व्यवसायाने शेतकरी आहेत. कपिलने त्याचे शालेय शिक्षण उद्गिर येथील लालबहाद्दूर शास्त्री शाळेतून पूर्ण केले. कपिलला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्यामुळे त्याला अभिनेता बनायचे होते. त्यामुळे आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर तो आपले अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला. मुंबईत आल्यावर त्याला सुरुवातील खूप संघर्ष करावा लागला. त्यानंतर त्याला नाटकामध्ये काम मिळाले. कपिलने आपल्या अभिनयाची सुरुवात नाटकांपासून केली होती. त्यानंतर त्याला मालिका मिळाल्या. सह्याद्री वाहिनीवरील त्याची ‘मर्म बंधातली ठेव ही’ हि मालिका खूप गाजली. ह्या मालिकेत त्याने महत्वाची भूमिका साकारली होती. कपिलने ‘लक्ष’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘ललित २०५’, ‘जय हो’ ह्यासारख्या मालिकेत काम केलेले आहे. त्याचप्रमाणे त्याने ‘कर्मचक्र’ मराठी चित्रपटात काम केले आहे. खऱ्या आयुष्यात कपिल खूपच मनमिळावू आणि सर्वांमध्ये मिसळून राहणारा आहे. तो सोशिअल मीडियावर त्याच्या कामाचे अपडेट्स आणि नवीन नवीन प्रोजेक्ट शेअर करत असतोच. त्याच प्रमाणे मालिकेदरम्यान घडणाऱ्या गमती जमती देखील शेअर करत असतो.
तो मालिकेच्या सेटवर सर्वांसोबत मिसळून असल्याचे त्याच्या शेअर केलेल्या फोटोज मधून कळते. त्याचप्रमाणे कपिलला डान्सची आवड असून त्याने शालिनी म्हणजे अभिनेत्री माधवी नेमकर सोबत केलेले डान्सचे व्हिडीओज त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पाहायला मिळतात. कपिलचे ७ मे २०१८ रोजी लग्न झाले. कपिलच्या पत्नीचे नाव रेणू (राजश्री) असे आहे. मध्यंतरी को रोनाच्या महामारीत सर्वच मालिकांचे शूटिंग थांबले होते. त्यामुळे कलाकारांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामध्ये अभिनेता कपिल हा हि एक होता. कपिलकडे कोणते काम नसल्यामुळे आता गावाकडे जाऊन काहीतरी उद्योगधंदा पाहावा लागेल, असा विचार करून तो पुन्हा गावी परतला. गावी आल्यानंतर त्याला काही दिवसांतच ‘कोठारे व्हिजन’ मधून कॉल आला. त्यामध्ये नवीन मालिका सुरु होणार असून, मालिकेत काम करणार का असे कपिलला विचारले गेले. त्यानंतर त्याची मोबाईलवरच ऑडिशन घेण्यात आली. त्यानंतर पुढच्याच दिवशी त्याला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ह्या मालिकेसाठी निवडण्यात आले. तर अश्या ह्या गुणी कलाकाराला त्याच्या पुढील यशासाठी आपल्या मराठी गप्पाकडून हार्दिक शुभेच्छा.