मराठी प्रेक्षक मालिका अगदी मन लाऊन पाहतात. त्याचमुळे त्यातील व्यक्तिरेखांशी ते एकरूप होतात. बरं फक्त मध्यवर्ती भूमिकाच नव्हे तर इतर भूमिका पण तेवढ्याच समरसतेने प्रेक्षक पाहतात आणि त्यांच्यावर प्रेम करतात. नजीकच्या काळातली अशीच एक भूमिका म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील महाजनी काकू. या सुप्रसिद्ध मालिकेतील महाजनी काकू म्हणजे राधिका या व्यक्तिरेखेचा आधार. आधीच एवढे व्याप असणाऱ्या राधिकेला आधार देणाऱ्या काही व्यक्तिरेखांमधली हि एक. हि भूमिका वठवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे कांचन गुप्ते या होय. मराठी मनोरंजन क्षेत्राशी त्या गेली अनेक वर्षे निगडीत आहेत.
केवळ त्याच नाही, तर त्यांची एक मुलगी सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहे हे माहितीय का तुम्हाला. त्यांच्या मुलीने अनेक मराठी, हिंदी कलाकृतींमध्ये काम केलंय. अगदी एकेकाळची सुप्रसिद्ध मालिका ‘क्युंकी सास भी कभी बहु थी’ मध्ये सुद्धा तिने काम होतं. तसेच नुकत्याच संपन्न झालेल्या आणि आजही लोकप्रिय असलेल्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेचा ती भाग होती. काही एपिसोडसाठी का होईना तिने महाराणी सईबाई ह्यांची भूमिका उत्कृष्टरित्या निभावली होती. तुम्ही म्हणाल कोण आहे ती अभिनेत्री? या अभिनेत्रीचं नाव आहे पूर्वा गोखले. पूर्वाश्रमीच्या पूर्वा गुप्ते. गेली २ वर्षे जोमात चालू असलेल्या ‘तुझसे हे राबता’ या प्रसिद्ध हिंदी मालिकेत त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. या मालिकेतील आईच्या भूमिकेसाठी त्यांना झी रिश्ते अवॉर्ड पण मिळाला आहे.
फेब्रुवारी मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘भयभीत’ या भयपटात त्यांनी सुबोध भावे, मृणाल जाधव यांच्या बरोबर काम केले आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या सेल्फी या मराठी नाटकासाठीही आपण त्यांना ओळखतो. त्यात त्यांनी शिल्पा नवलकर, सोनाली नाईक, ऋतुजा देशमुख आणि सुकन्या मोने यांच्यासोबत रंगमंच गाजवला होता. पुर्वाजी आणि कांचनजी आपापल्या भूमिकांमधून आपलं मनोरंजन सतत करत असतात. यापुढेही त्यांनी आपले असेच मनोरंजन करत राहतीलच. या कलाकार माय लेकीच्या जोडीला मराठी गप्पा टीम कडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ! (Author : Vighnesh Khale)