महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाने आपल्याला गेले काही वर्षे खूप हसवलं आहे. लॉक डाउन मधील काळ तर आपण विसरच शकत नाही. अशा काळात या कार्यक्रमातील प्रहसनांनी आपल्यावरील ताण हलकं करण्यास मदत केली. येत्या काळात हा कार्यक्रम आपले ३०० भाग पूर्ण करेल. अनुभवी आणि उदयोन्मुख कलाकार यांचा उत्तम संगम ही या कार्यक्रमाची जमेची बाजू. आज या गुणी कलाकारांपैकी एका अभिनेत्रीच्या कारकीर्दीचा आढावा आपण आजच्या लेखातून घेणार आहोत. तिचं प्रहसनातील अवखळ वागणं बोलणं आपल्याला सहज हसवून जातं. प्रहसनातील भूमिका मुख्य असो वा नसो या उदयोन्मुख अभिनेत्रीची दखल ती तिच्या प्रत्येक व्यक्तिरेखेतून घ्यायला भाग पडते. होय. आज आपण जाणून घेणार आहोत शिवाली परब हिच्या बाबत.
शिवाली मूळची सावंतवाडीची. पण जन्मली आणि वाढली कल्याणमध्ये. कल्याण मध्ये तिचं शालेय शिक्षण आणि बालपण गेलं. या काळात तिला शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून भाग घेण्याची हौस होती. अनेक नृत्यस्पर्धांमधून ती भाग घेत असे. नृत्यासोबतच तिचा अभिनयायाकडेही कल होताच. महाविद्यालयात गेल्यावर अभिनय क्षेत्राकडे तिचा ओढा वाढला आणि ती एकांकिकांमधून अभिनय करू लागली. ग्वाही, ड्रायवर या तिच्या काही एकांकिका. अनेक महाविद्यालयीन स्पर्धांमधून तिने आणि तिच्या कलाकारांच्या चमूने आपल्या एकांकिका सादर करून पारितोषिकं पटकावली आहेत. पुढे तिने काही शॉर्ट फिल्म्स , वेब सिरीज केल्या. यातील Pie In The Sky ही शॉर्ट फिल्म अतिशय गाजली. या शॉर्ट फिल्मला अनेक फिल्म फेस्टिव्हल्स मधून गौरवलं गेलेलं आहे. एकांकिकांप्रमाणेच येथेही शिवलीच्या अभिनयाचं कौतुक झालं.
ही शॉर्ट फिल्म बनवली गेली होती टफेग्ज या संस्थेमार्फत. शिवाली आणि तिच्या कलाकार मित्रांची ही संस्था. अनेक शॉर्ट फिल्म्स बनावट असते. नुकताच एक म्युझिक व्हिडियो सुद्धा या संस्थेने तयार केला आहे. यात अर्थातच मुख्य कलाकार म्हणून शिवाली आहेच. ‘लग जा गले’ असं या म्युझिक व्हिडियो चं नाव. एकांकिका, शॉर्ट फिल्म्स मधून अभिनय करत असताना शिवाली हिला महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. तिने या संधीचं सोनं केलं. ज्या ज्या भूमिका वाट्यास आल्या त्या अगदी मन लाऊन केल्या. त्यामुळे त्यांच्यातील तिची मेहनत दिसून आली. हास्यजत्रेच्या या काळात शिवाली मध्ये अभिनेत्री म्हणून झालेली प्रगती आपण सगळ्यांनी पाहिली आहेच. नवोदित असूनसुद्धा ताकदीच्या अनुभवी कलाकारांसमोर ती प्रेक्षकांच्या लक्षात राहतील, अशा भूमिका साकार करते हे कौतुकास्पद. तसेच तिचा त्या प्रहसनांमधला वावर आपल्यात नकळत एक प्रकारची ऊर्जा भरून जातो.
अशी ही ऊर्जावान अभिनेत्री अभिनयासोबतच चित्रकलेतही रस घेत असते. पेबल पेंटिंग हे विशेषतः करताना दिसते. तसेच ती वृक्षप्रेमीही आहे. तिला वृक्षारोपण करायला आवडतं, हे तिच्या मुलाखतींतून कळतं. तसेच आरोग्य उत्तम रहावं यासाठी व्यायामाकडे ती कटाक्षाने लक्ष देत असते. सध्या ती तिच्या टफेग्झ या संस्थेत आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा यांमध्ये व्यस्त आहे. तसं तिने यापूर्वी प्रेम पॉ’यझन पंगा या मालिकेत भूमिकाही केली होती. तसेच आपण निरीक्षण केलं असेल तर तिने अल्पावधीत शॉर्ट फिल्म्स, एकांकिका, मालिका, कार्यक्रम, जाहिराती या माध्यमांतून अभिनय केलेला आहे. तसेच दिवसेंदिवस बहरत चाललेल्या तिच्या अभिनयासाठी तिची वाहवा ही होते आहे. येत्या काळातही शिवाली हिची ही घोडदौड अशीच सुरू राहावी, हि मराठी गप्पाच्या टीमची इच्छा आणि शिवाली हिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !