प्रत्येक संस्कृतीचं दर्शन हे त्या त्या संस्कृतीतील विविध घटकांनी होत असतं. पारंपरिक खेळ हे या घटकांतील महत्वाचा पैलू. आपल्या महाराष्ट्रास किती उज्वल संस्कृती लाभली आहे हे वेगळे सांगावयास नको. आपल्या विविध पारंपारिक खेळांतून आपली रांगडी पण तेवढीच लवचिकता असलेली, सर्वसमावेशक संस्कृती दृष्टीस पडते. आता मल्लखांब या खेळाचंच घ्या ना. अंगात रग, ताकद आणि तेवढाच लवचिकपणा हवा असलेला, आपला हा पारंपरिक खेळ. आपल्याकडील अनेक दिग्गज मंडळी या खेळाशी संबंधित. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळास नेले. तसेच अनेक युवकही या खेळात रस घेतात हे विशेष. या नवीन फळीतील तीन शिलेदारांनी आपली ही आवड काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली ती एका रियालिटी शो द्वारे. या शोमध्ये आपले मल्लखांब खेळातील कौशल्य त्यांनी जगासमोर आणले आणि वाहवा मिळवली. आमच्या टीमच्या हाती या तीन तरुणांचा वायरल व्हिडियो लागला आणि आम्ही ठरवलं की आज यावर लिहायचं.
हा रियालिटी शो म्हणजे जॉर्जियाज गॉट टॅलेंट. आपल्या कडे असणाऱ्या इंडियाज गॉट टॅलेंटचं जॉर्जिया देशातील प्रारूप. तिथे २०१५-१६ च्या आसपास झालेल्या या रियालिटी शो मध्ये महाराष्ट्रातील तीन तरुण समाविष्ट झाले होते. तानाजी मांडवकर, सूरज तुरटे, अनुप ठाकूर ही या मंडळींची नावं. मुंबईतच मोठी झालेली ही मुलं. त्यांची या रियालिटी शो मधील पहिली ऑडिशन म्हणजे हा वायरल व्हिडियो. हा व्हिडीओ सुरू होतो आणि आपल्याला बॅकस्टेजला आपले हे तीन शिलेदार दाखल होताना दिसतात. त्यांच्या हातात काही हा’र असतात. तिथे उपस्थित असलेल्या दोन सूत्रसंचालकांच्या गळ्यात ते हे हा’र घालतात, त्यांना टिळा लावतात आणि मंचावर दाखल होतात. रंगमंचावर आल्यावर समोरील परिक्षाकांना ही ते हा’र घालतात. त्यामागची आदराची भावनाही समजावून सांगतात. परदेशातही जेवढं जमेल तेवढं महाराष्ट्रीयत्व ते जपतात याचं आपल्याला कौतुक वाटत राहतं. सगळ्यांना बरं वाटतं आणि मग त्यांना त्यांचं कौशल्य दाखवण्याची परवानगी मिळते.
दंड थोपटत तिघेही तयार होतात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं गौरव गीत आपल्या कानी पडतं. एका प्रसिद्ध मालिकेचे हे शीर्षक गीत. परदेशात एका कार्यक्रमात याचे शब्द घुमताहेत हे पाहून आपल्याला आनंद होतो. या आनंदात ही मुलं भर घालत असतात. या मुलांची सुरुवात परिक्षकांना मनोरंजक वाटत असते. पण काही क्षणातच जेव्हा मल्लखांबांवरून स्वतःला पूर्णपणे झो’कून देत पण अजिबात खाली न पडता प्रात्यक्षिक दाखवायला सुरुवात करतात तेव्हा परीक्षकांच्या डोळ्याचं पारणं फिटतं. पण त्याचसोबत त्यांच्या चेहऱ्यावर भी’तीही दिसून येते. सहभागी मुलांना दु’खापत होत असेल किंवा अजून काही दु’खापत होउ नये असं त्यांना वाटत असतं. त्यांच्या बोलण्यातून ते कळूनही येतं. इथे मात्र हे मल्लखांबपटू अतिशय सहजतेने आपलं कौशल्य दाखवत असतात. यातील अनुप ठाकूर हा शिव छत्रपती क्रीडा पुरस्काराचा मानकरी असल्याचं त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइल वरून कळतं.
सुरज आणि तानाजी हे सुद्धा असेच कसलेले खेळाडू. यावरून ते किती सहजतेने आणि सुंदरतेने हा खेळ सादर करत असतील याची कल्पना यावी. या संपूर्ण व्हिडियोत जवळपास अडीच मिनिटे या मुलांचं प्रात्यक्षिक चालतं आणि जेव्हा ते संपतं तेव्हा परीक्षक आणि सहभागी प्रेक्षक हे उठून उभे राहिलेले असतात. स्टँडिंग ओवेशन मिळणं हे जगभरात मानाचं समजलं जातं. त्यामुळे आपल्या पहिल्याच प्रत्यक्षिकात या मुलांनी या रियालिटी शो मध्ये आपली छाप पडल्याचं कळतं. परीक्षकांनी केलेल्या कमेंट्स मधूनही ते जाणवतं. परीक्षक त्यांना थेट गोल्डन बजर देतात म्हणजे पुढील स्पर्धेत त्यांची थेट निवड. हा सगळा व्हिडियो आपल्या अंगावर वेळोवेळी शहारे आणतो. तसेच आपल्या या मराठमोळ्या मुलांचं कौतुकही वाटत राहतं. त्यांच्या दुरदृष्टसी आणि त्यांनी सादर केलेल्या अफलातून प्रात्यक्षिकांना आमच्या मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा. तसेच या तिघांच्याही पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
बघा व्हिडीओ :