मराठी गप्पा आणि मराठी कलाकार यांच्याविषयीचे लेख हे एक अतूट समीकरण बनत चाललं आहे. आपल्या पैकी अनेक वाचकांना आमचे हे लेख आवडतात हे समजल्यावर आमच्या टीमच्या मेहनतीचं चीज झालं, असं जाणवतं. आपला हा लोभ नेहमीच आमच्यावर राहू दे. आज या लेखांच्या मांदियाळीतील अजून एक पुष्प आपल्या समोर आणत आहोत. यातून आपण एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या कारकिर्दीचा आढावा घेणार आहोत. ही अभिनेत्री आपल्याला अनेक सिनेमांमधून भेटली आहे, तसेच ती उत्तम नृत्यांगना/ नृत्य दिग्दर्शिका आहे आणि सध्या एका नृत्यविषयक कार्यक्रमात परीक्षक म्हणून दर आठवड्यास आपल्या भेटीस येते आहे.
होय, तुम्ही बरोबर ओळखलंत. आज आपण आपल्या सगळ्यांच्या आवडत्या पूजा सावंत हिच्या विषयी जाणून घेणार आहोत. पूजा ही मूळची मुंबईची. तिचे वडील एके ठिकाणी काम करत होते, पण त्यांचा पिंड कलाकाराचा. त्यामुळे ते रंगमंचावरून सातत्याने कार्यरत राहिले. तसेच पूजाच्या आई या गृहिणी आणि त्यांनाही कालाक्षेत्राची आवड. किंबहुना पूजा मनोरंजन क्षेत्रात येण्यास या दोघांचा खूप मोलाचा वाटा आहे. कारण एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे पूजाला शाळेत नृत्य आणि अभिनयाची आवड होती पण यात कारकीर्द करायची नव्हती. पण तिच्या आई वडिलांना तिच्यातील अंगभूत गुणांची जाणीव होती. म्हणून पूजाच्या आईंनी तिला श्रावण क्वीन या लोकप्रिय स्पर्धेत भाग घ्यायला लावलं. त्या स्पर्धेची ती विजेती ठरली. तसेच तिचं त्या स्पर्धेतील पहिलं नृत्य तिने कोणतंही गाणं वाजत नसताना अगदी उत्तम रीतीने सादर केलं. तिथे परीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या संचित पाटील यांना ही बाब भावली. पुढे पूजा या स्पर्धेची विजेती झालीच आणि सोबत तिला क्षणभर विश्रांती हा चित्रपटही मिळाला. या चित्रपटापासून सुरू झालेला पूजाचा प्रवास हा आजतागायत अखंड चालू आहे. तिने केलेले अनेक चित्रपट हे लोकप्रिय ठरले आहेत.
त्यांच्यात क्षणभर विश्रांती, बसस्टॉप, दगडी चाळ, जंगली, लपाछपी, भेटली तू पुन्हा, निळकंठ मास्तर यांचा समावेश आहे. मराठी सोबतच तिने हिंदी चित्रपटातही काम केलेलं आहे. वर उल्लेख केलेल्या जंगली या चित्रपटातून तिने विदुयत जामवाल याच्यासोबत काम केलेलं आहे. तसेच तिने निळकंठ मास्तर या चित्रपटातील एका गाण्यासाठीचं नृत्यदिग्दर्शन स्वतः केलेलं होतं. ती एका पेक्षा एक या नृत्यस्पर्धेत ही स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तिने अनेक पुरस्कार सोहळ्यांतून नृत्याविष्कार सादर केलेले आहेत. तिची शाळेपासून असलेली नृत्याची आवड तिने आजही मनापासून जोपासलेली आहे. ही आवड आपल्याला ती जेव्हा महाराष्ट्राज बेस्ट डान्सर मध्ये परीक्षक म्हणून काम करते तेव्हा दिसून येते. कारण त्यातले बारकावे ती अगदी सहजपणे समजावून सांगते. त्यामुळे तिचे सहपरिक्षक असणाऱ्या धर्मेश सर आणि ती स्वतः ही परीक्षक जोडी लोकप्रिय ठरते आहे. एक उत्तम कलाकार असण्यासोबतच पूजा ही उत्तम व्यक्ती म्हणून सुपरिचित आहे. पूजा हिला प्राणिमात्रांविषयी प्रचंड आवड. पण ही केवळ सोशल मीडियावर दाखवायची आवड नव्हे.
(फोटोत पूजा सावंत आपल्या आई आणि बहीण रुचिरा सावंत सोबत)
तिला खरं तर त्यांची सेवा करण्यासाठी डॉक्टर बनायचं होतं. पण कलाक्षेत्रात मुशाफिरी सुरू झाली आणि तिचं हे स्वप्न अधुरे राहिले. पण स्वप्न केवळ डॉक्टर बनण्याचं अधुरं राहिलं. त्यांची सेवा करणं हे तिचं नित्यनेमाने चालू असतं. यात तिला तिच्या कुटुंबियांची आणि खासकरून बहीण भावाची उत्तम साथ मिळते. तसेच या मुक्या जनावरांसाठी कायमस्वरूपी शेल्टर उभारावे असं तिच्या मनात आहे. एक उत्तम अभिनेत्री, उत्तम नृत्य अदाकारा, उत्तम नृत्य दिग्दर्शिका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तम माणूस असलेल्या पूजाने कमी कालावधीत स्वतःचं पक्कं असं स्थान निर्माण केलंय ते तिच्या अखंड मेहनतीच्या जोरावर. तिने सातत्याने उत्तम कलाकृतींमधून स्वतःला पेश केलं आहे. यापुढेही ती वैविध्यपूर्ण भूमिका, माध्यमं यातून तिच्या चाहत्यांना आनंद देत राहील हे नक्की. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीम कडून तिला मनःपूर्वक शुभेच्छा !
(फोटोत पूजा सावंत आपली बहीण रुचिरा आणि लहान भाऊ श्रेयस सोबत)