महाराष्ट्राची हास्यजत्रा याकार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला गेले दोन वर्ष खदखदून हसवलंय. यातून अनेक दिग्गजांनी आपली कला सादर केली आहे. तसेच अनेक नवोदित कलाकारांनीही स्वतःचा नवीन अंदाज या कार्यक्रमातून मांडला आहे. यातील सगळ्यात जास्त लक्षात राहतो तो गौरव मोरे. या कार्यक्रमातील एका पर्वाचा विजेता. त्याचं विनोदाचं टायमिंग, स्कीट्स मध्ये काढलेल्या मोक्याच्या जागा आणि त्यात केलेल्या विलक्षण कोट्या यांमुळे तो आपल्या चांगलाच परिचयाचा झाला. त्याची हि कलंदर वृती आपल्या सगळ्यांच्या मनात घर करून गेली आहे. त्यामुळे पवई फिल्टर पाड्याचा गौरव मोरे, फिल्टर पाड्याचा बच्चन अशी अनेक नावं आपल्या डोळ्यासमोर आपसूक येतात जेव्हा त्याची या कार्यक्रमात एन्ट्री होते.
या कार्यक्रमाने त्याला महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवलं आहे. पण म्हणून त्याचा कलाप्रवास हा काही या कार्यक्रमापुरती सीमित नाही. त्याने याआधी अनेक माध्यमांतून अभिनय केलेला आहे. त्याची सुरुवात झाली ती महाविद्यालयीन एकांकिकांमधून. या प्रवासात तुषार पवार या त्याच्या मित्राची त्याला खूप मदत झाली असं गौरव नमूद करतो. तुषार यांनी गौरवला या क्षेत्रात कसं वावरावं, काम करावं याचं मार्गदर्शन केलेलं होतं. तसेच एका एकांकिकेमध्ये त्याने बदली कलाकार म्हणून काम केलेलं होतं. त्यादरम्यान प्रसाद खांडेकर याच्याशी त्याची ओळख झाली. गौरवमधील अभिनय क्षमता बघून प्रसादने त्याला स्वतःच्या एकांकिकांमधून अभिनय करण्यास संधी दिली. प्रत्येक संधी घ्यायची आणि त्यात शंभर टक्के झोकून देऊन काम करायचं अशी गौरवची वृत्ती. त्यामुळे एकांकीकांपासून कलाप्रवासास सुरुवात करून त्याने पुढे मालिका, शॉर्ट फिल्म्स, सिनेमे ह्या माध्यमांतून स्वतःची छाप पाडली. तुमचं आमचं Same असतं हि त्याची मराठी मालिका. तसेच क्या हाल मिस्टर पांचाल हि हिंदी मालिका. पुढे त्याने केलेली ‘भरोसा रख मुंबईपर’ हि शॉर्ट फिल्म केली.
या शॉर्ट फिल्मने आंतरराष्ट्रीय सिनेफेस्टिवल्स मधून स्वतःचं अस्तित्व दाखवून दिलं. प्रथितयश वृत्तपत्रांनी या यशाची दखल घेतली. हि दोन्ही माध्यमं गाजवत असताना ९०च्या दशकातील सिनेमांचा चाहता असणाऱ्या गौरवने तेवढेच भरीव काम सिनेसृष्टीत केलेले आहे. त्याचे गाजलेले सिनेमे म्हणजे ‘विक्की वेलिंगकर’, ‘झोया फॅक्टर’, ‘गावठी’, ‘सलमान सोसायटी’, ‘संजू’, ‘कामयाब’, ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’. या मराठी आणि हिंदी सिनेमांतील त्याच्या भूमिकांचं विशेष कौतुक झालं. कामयाब हा त्याचा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित आणि पुढे प्रसिद्ध झाला. विक्की वेलिंगकर मध्ये त्याने हस्यजत्रेत त्याची साथीदार असणाऱ्या वनिता खरात सोबत काम केलं होतं. या सिनेमात सोनाली कुलकर्णी यांची मुख्य भूमिका होती. तसेच संजू सिनेमातील त्याचा गणपत हा स्पॉट बॉय सुद्धा गाजला. भूमिका छोटी असो वा मोठी, काम हे काम आहे या निष्ठेने गौरव काम करतो असंच म्हणावं लागेल. कारण सिनेमा, शॉर्ट फिल्म, मालिका या सगळ्या माध्यामांसोबतच त्याने जाहिरातीतूनही आपली छाप पाडली आहे. मग ती गुगल समाचार ची जाहिरात असो वा नेस्टअवे ची जाहिरात असो.
पवई फिल्टर पाडा ते आजतागायतच्या त्याचा प्रवास हा दिसायला सरळ रेषेत वाटत असला तरीही तो तसा नाहीये. आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देत देत तो इथ पर्यंत आला आहे. त्याच्या या प्रवासातील एका टप्प्यावर त्याचे वडील हे जग सोडून गेले. पण तरीही त्याने स्वतःला सावरत, कुटुंबालाही सावरलं. अभिनयाच तांत्रिक शिक्षण न घेताही आलेल्या प्रत्येक अनुभवातून तो शिकत राहिला. संधी मिळेल अशी वाट बघत न बसता, संधी कुठे उपलब्ध आहेत तिथपर्यंत पोहोचत तो, सतत काम करत राहिला. म्हणून त्याच्या कारकिर्दीत एक प्रकारचं सातत्य दिसतं आणि कमी कालावधीत केलेलं बरंच काम. येत्या काळातही त्याचा ‘पिचकारी’ हा सिनेमा आपल्या भेटीस येईल. महाराष्ट्राची हास्यजत्रा तर चालू आहेच आणि प्रत्येक आठवड्यात गौरव आपल्याला विविध भूमिकांमधून हसवणार आहे हे नक्की. मग खरात काकूंना त्रास देणारा गौऱ्या असो, वा इतर कोणती व्यक्तिरेखा. मागील आठवड्यात सिद्धार्थ जाधव यांनी म्हंटल्याप्रमाणे गौरव मोरे आता काय करणार याची आता प्रेक्षकांना खरंच उत्सुकता लागून राहिलेली असते. अशा या सातत्यपूर्ण आणि प्रगतीशील कलाकाराला मराठी गप्पाच्या टीमकडून येत्या काळातील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)