मराठी गप्पा आणि मराठी मालिकांबद्दलची माहिती हे एक अतूट नातं आहे. या नवीन वर्षातही यात खंड पडणार नाही, हे नक्की. यावर्षीही मराठी गप्पाची टीम ही नवीन जुन्या मालिका, त्यातील विविध कलाकार आणि या दोहोंविषयीच्या बातम्या सातत्याने आपल्या वाचनासाठी आणेल. आजच्या या लेखातून आपण अशाच एका सुप्रसिद्ध मालिकेतील लोकप्रिय होत चाललेल्या एका अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत. स्टार प्रवाह या वाहिनी वरील अनेक मालिका अगदी तुफान गाजताहेत. अगदी प्रेक्षकसंख्येच्या तुलनेत ही वाहिनी गेले काही आठवडे आघाडीवर आहे. या वाहिनीवरील मुलगी झाली हो ही या मालिकांमधील आघाडीची मालिका.
म्हणजे अगदी बार्क या संस्थेच्या १९-२५ डिसेंबर दरम्यानच्या सर्वेक्षणात ही मालिका मराठी मालिका क्षेत्रात जास्त पाहिली गेलेली मालिका आहे. या मालिकेतील माऊ आणि तिची आई उमा आणि अक्षरा या मुख्य व्यक्तिरेखा आहेत. त्यापैकी माऊ आणि उमा या व्यक्तिरेखा निभावणाऱ्या अनुक्रमे दिव्या पुगांवकर आणि शर्वाणी पिल्लई यांच्याविषयी आपण मराठी गप्पाच्या माध्यमातून वाचलं आहेच. या व्यक्तिरेखांच्या जवळ असणारी अजून एक व्यक्तिरेखा म्हणजे माऊची बहीण अक्षरा. ही भूमिका साकार केली आहे, अपूर्वा सपकाळ या नवोदित आणि गुणी अभिनेत्रीने. अपूर्वा मुळची पुण्यातली. अभिनयाची आवड तिला पहिल्यापासून. ही आवड केवळ आवड म्हणून न राहता, तिचं कारकिर्दीत रूपांतर व्हावं, असं तिला वाटलं. मग अभिनय कसा करावा, तसेच मनोरंजन या क्षेत्राविषयी माहिती घेणं तिने सुरू केलं. या काळात तिने प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाट्यप्रशिक्षण संस्थेत सहभाग नोंदवला. उपजत आवड आणि गुण यांच्या जोरावर तिने या संस्थेत दैदिप्यमान कामगिरी केली. बेस्ट स्टुडंट हा पुरस्कार तिने या संस्थेत पटकावला.
पण केवळ नाट्य प्रशिक्षण संस्थेत पहिलं येण्यावर तिने समाधान मानलं नाही. तिने शॉर्ट फिल्म्स, रंगमंच आणि आता मालिकांमधून काम करण्यास सुरुवात केली. ‘फोडणीची पोळी’ ही तिची गाजलेली शॉर्ट फिल्म. या शॉर्ट फिल्मसाठी उत्कृष्ठ अभिनेत्री साठी म्हणून तिला नामांकन होतं. सध्या ती ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत व्यस्त आहे. मालिकेत व्यस्त असली तरीही तिची भटकंतीची आवड ती अगदी आवर्जून जपते. तिची भटकंतीची आवड तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सहज लक्षात येते. ती नुकतीच, मुलगी झाली हो मधील कलाकारांसोबत पंचगणीला जाऊन आलेली दिसली. इतर वेळीही विविध ठिकाणी जाणं, मित्र मैत्रिणींच्या सोबत वेळ घालवणं तिला आवडतं. सध्या तिची मालिकेतील भूमिका प्रचंड गाजते आहे. माऊ सोबत तिच्या भूमिकेलाही प्रेक्षकपसंती मिळते आहे. त्यामुळे ऑफस्क्रीन उत्तम मैत्रिणी असणाऱ्या दोघीही अभिनेत्री लोकप्रिय होत आहेत.
या दोघींची मैत्री जशी एकदम घट्ट आहे, तशीच घट्ट मैत्री अपूर्वा आणि शर्वाणी पिल्लई यांच्यात आहे. अशा या मैत्रीपूर्ण, उमद्या आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या अभिनेत्रीला तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा ! आपण हा लेख वाचलात. त्यात आपण दिव्या पुगांवकर आणि शर्वाणी पिल्लई यांच्या नावांचे उल्लेख वाचले असतील. यांच्यासोबतच इतर कलाकार यांच्याविषयीही आमच्या टीमने लेखन केलेलं आहे. आपण वरील सर्च ऑप्शनचा वापर करून ते लेख वाचू शकता. त्यासाठी सर्च ऑप्शनमध्ये जाऊन ‘मुलगी झाली हो’ असं लिहून सर्च केल्यास आपल्याला सदर लेख मिळतील. मराठी गप्पाचे नियमित वाचक होण्यासाठी धन्यवाद !