‘माझा होशील ना’ हि मालिका प्रेक्षकांच्या मनावर सध्या अधिराज्य करतेय. मालिकेतील विविध स्वभावाची पात्र, हलकं फुलकं तरीही उत्कंठावर्धक कथानक, कलाकारांचा अभिनय यांमुळे अल्पावधीत हि मालिका अगदी घराघरात पोहोचली आहे. त्यातही अगदी लॉकडाऊनमध्ये या मालिकेचे झालेले वेबिसोड्स, यामुळेदेखील या मालिकेचा चाहता वर्ग या मालिकेशी जोडलेला राहिला आहे. या मालिकेत आदित्य, सई, नयना हि पात्र प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरत आहेत. यातील नयना हि व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मुग्धा पुराणिक हिच्या कलाप्रवासाविषयीचा लेख आपण मराठी गप्पावर वाचला असेलच. या लेखाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आमच्या टीमकडून धन्यवाद !
आजच्या लेखात आपण, या मालिकेतील नायिका म्हणजे सई बिराजदार हि भूमिका निभावणाऱ्या गौतमी देशपांडेविषयी जाणून घेणार आहोत. गौतमीचा जन्म झाला पुण्यात. या पुण्यनगरीतच तिचं शिक्षणही झालं. तिने इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तिला लहानपणापासून गायनाची आणि अभिनयाची आवड होती. पण या आवडींना स्वतःचं करियर बनवण्याआधी तिने कॉर्पोरेटमध्ये काम केलं. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव मिळवला. अनेक उत्तम प्रोजेक्ट्सचा ती भाग होती. या प्रोजेक्ट्सदरम्यान तिला आणि ती भाग असलेल्या टीम्सना उत्तम कामगिरीसाठी पुरस्कारही मिळाले आहेत. पुढे तिने अभिनयात काम करण्याचा निर्णय घेतला आणि कॉर्पोरेट क्षेत्र मागे पडलं. पण त्या क्षेत्रातील मित्र तिचे अजूनही मित्र आहेत. अभिनय क्षेत्रात तिने मालिकांच्या माध्यमांतून काम करायला सुरुवात केली. तिची पहिली मालिका म्हणजे ‘सारे तुझ्याचसाठी’.
या मालिकेत तिने श्रुती ह्या पेशाने बॉक्सर असणाऱ्या नायिकेची भूमिका बजावली होती. यासाठी काही काळ बॉक्सिंगचं प्रशिक्षणही तिने घेतलं होतं. तिच्या या मेहनतीचं पुढे चीज झालं. ‘श्रुती’ च्या भूमिकेसाठी तिला सर्वोकृष्ठ अभिनेत्री हा पुरस्कार म. टा. सन्मान या मानाच्या पुरस्कार सोहळ्यात मिळाला. मालिकेत काम करता करता गौतमीचं गायनही चालू होतं. ‘मन फकीरा’ या सिनेमात तिने गाणं गायलं आहे. एकदा ती आणि मालिकेतील नायकाची भूमिका बजावणारा हर्षद अतकरी मालिकेचं शीर्षकगीत गात होते. ते इतके उत्तमरीतीने गायले कि तो विडियो पुढे सोशल मिडीयावरती खूप वायरल झाला होता. गौतमी आणि गायन हे एक अतूट नातं आहे. केवळ या विडीयोमुळे किंवा सिनेमातल्या गाण्यामुळे नाही, तर तिला खरंच गाण्याची मनापासून आवड आहे.
मालिकेच्या शूट्सदरम्यान, बहिण मृण्मयी सोबत, कधी आईसोबत, तर कधी कोणत्या मैफिलीत ती सतत गाताना दिसते. त्यातून तिची गाण्याप्रती असलेली ओढ दिसून येते. याचमुळे असेल कि काय, पण तिच्या जवळपास प्रत्येक मुलाखतीत तिचं एक तरी गाणं ऐकण्याचा मोह खुद्द त्या त्या मुलखातकर्त्यांना होतोच होतो. याच तिच्या आवडीमुळे आणि उत्तम आवाजामुळे असेल कदाचित पण ‘आम्ही दुनियेचे राजे’, ‘शतजन्म शोधिताना’ या सांगीतिक मैफिलीत तिचा हमखास सहभाग असतो. शतजन्म शोधिताना या वेबसिरीजच्या अगदी पहिल्या भागाचं सूत्रसंचालन तिने सुबोध भावे यांच्यासोबत केलं होतं. आम्ही दुनियेचे राजे या मराठी संगीताकारांवरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिने, लोकप्रिय अभिनेता अभिजित खांडकेकर याच्या सोबत केलेलं आहे. तसेच ‘सफर’चंद पु.ल. या पु.ल. देशपांडे यांच्या प्रवासवर्णनांवर आधारित कार्यक्रमाची ती एक सादरकर्ती होती.
अभिनय, गायन, सूत्रसंचालन करता करता लॉकडाऊनच्या काळात तिच्यातील अजून एक सुप्त कला प्रेक्षकांना कळली. ती उत्तम कविता सुद्धा करते हे या दरम्यान कळलं. प्रेक्षकांमध्ये या कविता एवढ्या लोकप्रिय झाल्या कि, काही मनोरंजन क्षेत्रातील वार्ताहारांनीसुद्धा याची नोंद आपल्या वृत्तपत्रातून घेतली. गौतमीने मालिका, वेबसिरीज यांच्यासोबतच जाहिरात, सिनेमा आणि युट्युब चॅनेल या माध्यमांतूनही काम करायला सुरुवात केली आहे. नुकतच अमॅझॉनच्या एका जाहिरातीत काम केलं आहे. तसेच मनाचे श्लोक या तिच्या नवीन सिनेमाचं शुटींग काही काळापूर्वी सुरु झालं होतं. तिच्या चाहत्यांना तिच्या आवाजातील गाणी नेहमीच भावतात. याच तिच्या आवाजातील गाण्यांची मेजवानी तिच्या युट्युब चॅनेलवर नक्की अनुभवायला मिळते. फार कमी काळात काही कलाकार अगदी दर्जेदार काम प्रेक्षकांसमोर पेश करतात आणि त्यांच्या मनात घर करतात. गौतमी हि त्यातलीच एक कलाकार आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. तिच्या याच कामगिरीमुळे, तिच्या पुढील वाटचालीतही तिच्या दर्जेदार कलाकृती आपल्या भेटीस येतील हे नक्की. तिच्या या पुढील यशस्वी वाटचालीसाठी तिला मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)