आपल्याकडे मनोरंजन क्षेत्रात दर्जेदार अभिनय करणाऱ्या अनेक गुणी अभिनेत्रींची मांदियाळी आहे. त्यातल्या अनेकींनी विविधांगी भूमिकेतून स्वतःची अभिनय कला सातत्याने रसिकांसमोर मांडली आहे. मग ती भूमिका सकारात्मक असो वा नकारात्मक. मुख्य भूमिका असो वा सहाय्यक कलाकार म्हणून. गंभीर असो वा विनोदी. आज या लेखात आपण अशाच एका गुणी अभिनेत्रीच्या कलाप्रवासाची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत ज्यांनी नाटक, सिनेमा, मालिका अशा विविध माध्यमांतून विविधांगी भुमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे सुलेखा तळवलकर. सुलेखाजींना आपण अनेक दर्जेदार कलाकृतींसाठी ओळखतो. सुलेखाजींचा कलाप्रवास हा त्यांच्या लहानपणीच सुरू झाला होता.
त्यांचे आई वडिल दोघेही उत्तम चित्रकार. त्यामुळे कलेचा वारसा होताच. उत्तम चित्रकार असण्यासोबतच त्यांचा कल हा अभिनय क्षेत्राकडे होता. त्यांच्या या आवडीमुळे रुईया महाविद्यालयात असताना त्या नाट्यक्षेत्राकडे आपसूक ओढल्या गेल्या. या काळात त्यांनी एकांकिका आणि नाटके यांच्यातून सातत्याने रंगमंचावर आपला वावर कायम राहील हे पाहिलं. त्यामुळे अभिनेत्री म्हणून ही त्या सतत प्रगल्भ होत गेल्या. या काळात त्यांनी सातच्या आत घरात हे नाटक केलं होतं. तसेच रंगमंचावरील त्यांचा नैसर्गिक अभिनय आणि सहज वावर पाहून त्यांना त्यांच्या कारकीर्दीतली पहिली मालिका ऑफर करण्यात आली. त्यांनीही ती केली. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असं या मालिकेचं नाव. पुढे नाटक आणि मालिका यांतील प्रवास चालू असताना त्यांच्या आयुष्यात काही महत्वाच्या घटनाही घडत होत्या. त्यांनी आवड म्हणून इंटिरियर डेकोरेटर म्हणून आपला अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि त्या क्षेत्रात कामही करत होत्या. पुढे अंबर तळवलकर यांच्याशी लग्न झालं. अंबर तळवलकर हे सुप्रसिद्ध निर्मात्या, अभिनेत्री, दिग्दर्शिका स्मिता तळवलकर यांचे सुपुत्र. माहेरप्रमाणेच सासरीही कालाक्षेत्राचे संस्कार. त्यामुळे पुढील काही काळात त्यांनी मालिकांमधून अभिनय करणे सुरू केलं. त्यात अवंतिका, असंभव सारखे मोठे प्रोजेक्ट्स समाविष्ठ होते. या त्यांच्या वाटचालीत त्यांच्या सासूबाईंचा म्हणजे स्मिता तळवलकर यांचा खंबीर पाठिंबा होता.
मालिकांमधून काम करत असताना सुलेखाजींनी सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तिरेखा साकार केल्या. तसेच विनोदी भूमिकाही साकारल्या. त्यांची शेजारी शेजारी पक्के शेजारी मधली, मोरया ची कनवाळू आई ही भूमिका, न विसरता येण्यासारखी. मालिकांमधून अभिनय करत असताना एखाद्या सच्चा रंगकर्मीप्रमाणे त्यांनी रंगमंचाशी असलेलं नातंही अबाधित ठेवलं. त्यांनी आजतागायत असंख्य नाटकांतून अभिनय केलेला आहे. महासागर, नऊ कोटी सत्तावन्न लाख, सातच्या आत घरात अशा अनेक नाट्यकृतींतून त्यांनी रंगमंचावर स्वतःचा वावर कायम ठेवला आहे. नाटकांप्रमाणेच त्यांनी सिनेमातही अभिनय केलेला आहे. त्यांनी अभिनित केलेल्या सिनेमांपैकी काही सिनेमे म्हणजे आई, कदाचित, श्यामचे वडील, तुझ्या माझ्यात. नाटक, मालिका आणि सिनेमा यांत अभिनय करताना त्यांनी स्वतःच्या गाठीशी अमाप अनुभव जमवला. त्यात त्यांच्या असं लक्षात आलं की अनेकांना मनोरंजन क्षेत्रात येण्याची उत्सुकता असते पण यातील प्रशिक्षण आणि या क्षेत्रांत कसे यावे हे अनेकांना माहिती नसते. तसेच त्यांचा स्वतःच्या कलाप्रवासात त्यांनाही असंख्य अडथळ्यांना तोंड द्यावं लागलं होतंच. यावर उपाय म्हणून त्यांनी अस्मिता चित्र अकादमी ची स्थापना केली.
या संस्थेमार्फत त्या मनोरंजन क्षेत्रांत येऊ इच्छिणाऱ्या नवोदित आणि होतकरू कलाकारांना मार्गदर्शन करतात. मुंबई, पुणे येथून मुख्यत्वे या अकादमीचे काम चालते. अभिनय, अकादमीचे काम यासोबतच त्या उत्तम लिहितात सुदधा. त्यांनी सध्या एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत त्यांनी स्वतःच्या क्वीन बी प्रॉडक्शन अंतर्गत स्वतःच्या नावाने एक युट्युब चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलच्या माध्यमांतून अनेक नवीन तसेच, अनुभवी कलाकारांशी त्या मनसोक्त गप्पा मारत त्यांना बोलतं करतात. या मुलाखती या इतर मुलाखतींपेक्षा वेगळ्या ठरतात कारण इथे कलाकार मनसोक्तपणे व्यक्त होतात. आज पर्यंत निवेदिता सराफ, प्रतिमा कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, आनंद इंगळे, शुभांगी गोखले, अमर ओक, रुपाली भोसले, खुशबू आणि तीतीक्षा तावडे यांनी या मुलाखतींना हजेरी लावली आहे. तसेच नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या भागात, सदाबहार अभिनेते अशोकजी शिंदे यांची मुलाखत प्रेक्षकांना पाहता येते आहे.
(फोटोत सुलेखा तळवलकर मुलगा आर्या आणि मुलगी तिया सोबत)
सुलेखाजी यांचा कलाप्रवास उलगडताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्या सतत कार्यरत असतात. अभिनय आणि अभिनयासंलग्न कार्यात सतत कार्यरत असल्याने त्यांच्या अभिनयात एक सहजपणा आलेला जाणवतो. त्यात कुठेही मुद्दामहून, ओढून ताणून केलेला अभिनय नसतो. तसेच त्यांनी अभिनेत्री म्हणून केलेल्या भूमिका असोत, वा त्यांच्या अकादमी आणि आता युट्युबच्या माध्यमांतून केलेलं काम असो, त्यांची नाविन्याची आवड अधोरेखित होते. त्याचमुळे असेल कदाचित, पण अनेक वर्षे अभिनेत्री म्हणून कार्यरत असूनही त्या सतत प्रसन्न असतात. अशा या प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या सुलेखाजींचा आजवरचा प्रवास हा उत्तम राहीला आहे. यापुढेही हा प्रवास उत्तम आणि आनंददायी असो या मराठी गप्पाच्या टीमकडून सुलेखाजींना मनापासून शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)