Breaking News
Home / मराठी तडका / माझा होशील ना मालिकेतील सईची मैत्रीण नयना खऱ्या आयुष्यात क शी आहे बघा

माझा होशील ना मालिकेतील सईची मैत्रीण नयना खऱ्या आयुष्यात क शी आहे बघा

आपल्या ओळखीच्यांमध्ये एक अशी मुलगी नक्की असते जी स्वभावाने वेंधळी, कुठेही पटकन खरं बोलुन मित्र मैत्रिणींना काहीशी अडचणीत आणेल अशी, चुलबुली पण मनाने तेवढीच निरागस. अशाच एका मुलीची व्यक्तिरेखा प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्या व्यक्तिरेखेचं नाव आहे नयना. बरोबर ओळखलंत, ‘माझा होशील ना’ मालिकेतील सई आणि आदित्य यांच्यामधली नयना. चुलबुली. आदित्यवर प्रेम करणारी, पटकन खरं बोलून स्वतःला आणि सईला अडचणीत आणणारी. पण तिच्या नटखट अदांमुळे प्रेक्षकांची पसंती तिला मिळाली आहे. या नयनाची भूमिका साकारली आहे ती मुग्धा पुराणिक हिने. अतिशय कमी काळात तिच्या या लोकप्रिय भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली आहे, त्यानिमित्त तिच्या अभिनयाच्या वाटचालीचा घेतलेला आढावा.

मुग्धाला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. या क्षेत्रात आपण काम करायचं असं तिचं ठरलं होतं. पण तिचं शिक्षणावरचं लक्ष उडून जाऊ नये म्हणून तिच्या घरच्यांनी ती शाळेत असताना, आधी तिला बालनाट्यात काम करू दिलं. पण व्यावसायिकरित्या अभिनय करण्याची परवानगी तिचं कॉलेज सुरु झाल्यानंतर देण्यात आली. पण, असं असलं तरीही जे काम करायचं ते मनापासून हा मुग्धाचा स्वभाव. त्यात अभिनयाची मूलतः आवड. त्यामुळे बालनाट्यातहि तिने उत्तम अभिनय करून सर्वांचीच वाहवा मिळवली आहे. तिने अभिनय केलेल्या एका नाटकाला याच काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर पारितोषिक मिळालं होतं. मदर्स डे असं त्या नाटकाचं नाव. तिची एकंदर प्रगती आणि आवड पाहून, तिच्या आईवडिलांनी तिला व्यावसायिक नाटकं, मालिकांत काम करण्याची परवानगी दिली.

तेव्हा तिने नुकताच रुपारेल कॉलेज मध्ये प्रवेश घेतला होता. अभिनयाची आवड त्यामुळे पटकन तिथल्या नाटकाच्या ग्रुपचा ती हिस्सा झाली. याचाच फायदा तिला ‘माझा होशील ना’ मालिकेत काम मिळताना झाला. तिच्या एका मित्राने तिला सुचवलं कि कॉलेज जवळच एका नवीन मालिकेची ऑडिशन चालू आहे. मुग्धा काहीही तयारी नसताना गेली आणि अवघ्या दोन दिवसात तिची निवड झाल्याची बातमी आली. आज तिची हीच भूमिका तिला घराघरात ओळख मिळवून देत आहे. तसं तिने आधी ‘ओवी’ या नाटकांत काम केलं आहे. तसेच ‘विठूमाउली’ या मालिकेतहही तिची महत्वपूर्ण भूमिका होती. पुढे फुलपाखरू, हे मन बावरे या मालिकांतूनही तिने भूमिका केल्या आहेत आणि या प्रत्येक भूमिकांतून तिचा अभिनय बहरत चाललेला दिसतो. पण हा तर तिचा अभिनय प्रवास झाला.

अभिनयाव्यतिरिक्त तिला फिरायला, नवनवीन डिशेस खायला आणि पुस्तकं वाचायलाही आवडतं. हे तिच्या युट्युब चॅनेलवरून तुम्ही पाहू शकता. तिच्या चॅनेलचं नाव “EnLIVEn” असं आहे. किंवा तिच्या नावाने जरी सर्च केलंत तरी हे चॅनेल तुम्हाला भेटू शकेल. यात ती नवनवीन ठिकाणी भेट देताना दिसते. तसेच सेटवरची सफर सुद्धा तिच्या प्रेक्षकांना करावताना दिसते. तिच्या या मनमिळावू आणि समंजस स्वभावाचं प्रतिबिंब तिच्या भूमिकेतही दिसून येतं. वयाने लहान असूनही तिच्या मुलाखती ऐकताना त्यातील समंजसपणा जाणवतो. येत्या काळात तिची नयना हि भूमिका कसं वळण घेईल कल्पना नाही परंतु मुग्धा मात्र आपल्या अभिनयाने सगळ्यांना आनंद देईल यात शंका नाही. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.