Breaking News
Home / मराठी तडका / माझिया माहेरामधील पल्लवी आता कशी दिसते काय करते पहा, बघा तिची जीवनकहाणी

माझिया माहेरामधील पल्लवी आता कशी दिसते काय करते पहा, बघा तिची जीवनकहाणी

नक्षत्रा मेढेकर हे मनोरंजन विश्वातलं अभिनय क्षेत्रातलं उदयोन्मुख नाव. नावाप्रमाणेच नक्षत्राइतकंच सुंदर व्यक्तिमत्व. या सुंदर व्यक्तिमत्वाला साजेसं असा तिचा सुंदर अभिनय. पण गेल्या काही काळापासून तिची कोणतीही नवीन कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस आलेली नाही. परंतु नजीकच्या काळात तिचे नवनवीन फोटोशूट्स तिच्या चाहत्यांना तिच्या सोशल मिडिया पेजवरती पहायला मिळताहेत. यानिमित्ताने तिच्या अभिनय प्रवासाचा थोडक्यात घेतलेला धांडोळा. नक्षत्रा मुळची ठाण्याची. तिचं शालेय शिक्षण ठाण्यातच झालं. पुढे कॉलेजचं शिक्षण सुरु असताना तिला तिच्या पहिल्या वहिल्या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. तिनेही त्या संधीचं सोनं केलं. त्या मालिकेचं नाव, माझिया माहेरा.

या मालिकेत तिने पल्लवी देशमाने हि भूमिका साकारली होती. या मालिकेत तिचे आई वडील वयात आलेल्या या मुलीचं लग्न करून देण्यास उत्सुक असतात तर तिला मात्र कलेक्टर होण्याची महत्वाकांक्षा असते, हे साधारणतः कथानक होतं. हि भूमिका नक्षत्राने अगदी मन लाऊन केली आणि त्याचमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पुढे तिने ‘लेक माझी लाडकी या घरची’ हि मालिका केली. आधीच्या मालिकेतील पल्लवी हि नायिका होती तर या मालिकेतील ‘सानिका’ या भूमिकेला थोडी नकारात्मक बाजू होती. या मालिकेनंतर तिने ‘सूर राहू दे’ हि मालिका केली. या मालिकेत ती पुन्हा एकदा सकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली होती. या मालिकेत तिने सुप्रसिद्ध अभिनेता संग्राम साळवी याच्या सोबत काम केलं होतं. एकंदरच कॉलेज आयुष्य चालू असताना आलेले हे प्रोजेक्ट्स अल्पावधीत तिला घराघरात प्रसिद्धी देऊन गेले.

पण मागील वर्षी एक संधी तिच्या आयुष्यात चालून आली जिच्यामुळे अभिनेत्री म्हणून तिला मालिकांच्या कक्षेपुढे जाऊन भूमिकेला मांडता आलं. हि संधी होती ‘फत्तेशिकस्त’ या दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित चित्रपटात काम करण्याची. छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट आणि दिग्पाल सोबत आधी केलेलं काम यांमुळे तिने चटकन होकार दिला. तिने या चित्रपटात बहु बेगम म्हणजे शाहिस्ते खानाची सून हि भूमिका वठवली आहे. या भूमिकेसाठी हिंदी शिकावं लागणार होतं. तिनेही तयारी सुरु केली. भाषेसोबतच, त्याकाळातील स्त्रियांची देहबोली कशी असेल, याचा तिने अभ्यास केला. तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं कि ती स्वतः टॉम बॉय व्यक्तिमत्वाची आहे त्यामुळे त्याकाळातील स्त्रियांची देहबोली शिकणं महत्वाचं होतं. तिचं वय लहान असलं तरीही भूमिकेसाठी मेहनत घेण्याची तिची हि तयारी वाखाणण्याजोगी अशीच आहे. मालिका, ऐतिहासिक चित्रपट करता करता तिने एका म्युझिक विडीयोमध्येही काम केलं. टी सिरीज या लोकप्रिय संस्थेने तेरी हाझरी हा तो म्युझिक विडीयो प्रस्तुत केला होता. या विडीयोला आत्तापर्यंत २१ लाखांहून अधिक व्युज मिळालेले आहेत. हा तर झालं तिच्या अभिनय क्षेत्रातल्या प्रवास.

अभिनयाव्यतिरिक्त नक्षत्राला फिरण्याची प्रचंड आवड आहे. आपल्या मित्र मैत्रिणींसोबत ती विविध ठिकाणांना भेटी देत असते. तसेच भटकंती करणाऱ्यांसारखीच ती फुडी सुद्धा आहे. या व्यतिरिक्त तिला सगळ्यात जास्त आवड आहे ती पाळीव प्राण्यांची. तिच्या घरी असू दे, सेट वर असू दे वा इतर कुठे आजूबाजूला असणाऱ्या पाळीव प्राण्यांचा तिला चटकन लळा लागतो. तिच्या सोशल मिडिया पेजवरूनही अनेकवेळा ती त्यांच्या संदर्भातील प्रश्नांवर आवाज उठवत आलेली आहे. नक्षत्राची अभिनय क्षेत्रातील मुशाफिरी काही वर्षांपूर्वी सुरु झाली असली तरीही या कमी काळातही ज्या भुमिका केल्या त्या आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या लक्षात राहतील अशाच वठवल्या. तिने आत्तापर्यंत मालिका, चित्रपट, म्युझिक विडीयो या वेगवेगळ्या माध्यमांतून आपला अभिनय दाखवला आहे. येत्या काळातहि तिची हि अभिनयातील घोडदौड अशीच सुरु राहील यात शंका नाही. तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *