सध्या युट्युब वर एका नावाची चर्चा आहे ती म्हणजे आगरी कोळी किंग म्हणवला जाणारा अभिनेता विनायक माळी याची. एक युट्युबर ते सेलिब्रिटी हा त्याच्या प्रवास केवळ काही वर्षांचा आहे. पण त्यात त्याने साधलेली प्रगती ही अफलातून आहे. या त्याच्या प्रगतीत त्याने तयार केलेल्या व्यक्तिरेखांचं फार महत्त्वाचं योगदान आहे. या प्रसिद्ध व्यक्तिरेखांमधली एक प्रसिद्ध व्यक्तिरेखा म्हणजे ‘माझी बायको’ या सिरिज मधली त्रस्त झालेल्या दादूसची निरागस, काहीशी गोंधळ घालणारी पण बोलायला लागली की तेवढंच तिखट बोलणारी बायको. ही बायकोची व्यक्तिरेखा साकारली आहे पायल पाटील हिने. मराठी गप्पाने उभरत्या कलाकारांच्या कलाप्रवासावर नेहमीच प्रकाशझोत टाकलेला आहे आणि आपल्या परीने त्यांचं कौतुक करण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या या लेखातून जाणून घेऊयात या नवतारकेबद्दल.
पायलला ‘माझी बायको’ या सिरीज मुळे प्रसिद्धी मिळाली आहेच. पण सोबतच तिचे स्वतःचे म्युझिक व्हिडियोज हे खूप लोकप्रिय ठरले आहेत. हा लेख लिहीत असताना तिचा नुकताच एक नवीन म्युझिक व्हिडिओ लोकप्रिय होतोय. उरण तालुक्यातील ‘आई रतनेश्वरी’ यांच्या स्तुतीपर रचलेलं हे गीत आहे. हे गीत हितेश कडू यांनी गायलं आहे आणि पायल हिच्यासोबत ते या व्हिडियो मध्ये देखील आहेत. या भक्तीपर गीतासोबतच पायल हिने ‘सिंगल सिंगल’, ‘दिल आशिक झयलय गो’ या प्रसिद्ध म्युझिक व्हिडियोज ही केलेले आहेत. या दोन्ही व्हिडियोज ना लाखलाखांनी प्रेक्षकसंख्या लाभली आहे. यावरून पायल हिच्या वाढत्या चाहत्यांची संख्या लक्षात यावी. नुकतेच तिने इन्स्टाग्राम अकाउंट वर १ लाख सबसक्रायबर्स पार केले आहेत. यानिमित्ताने तिने कुटुंब आणि मित्रपरिवारांसोबत हा आनंद साजरा केला. त्यानिमित्त सजवलेल्या केकवर तिने अभिनित केलेल्या कलाकृतींची नावं लिहिली होती. पायल ही नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी विविध मनोरंजपर व्हिडियोज, तिचे नवीन फोटोशूट्स घेऊन येत असते. या गेल्या नवरात्री निमित्त तिने एक खास फोटोशूट केलं होतं.
त्यात तिने नऊ दिवस स्त्रियांची विविध रुपे दाखवून स्त्रियांचं कार्य अधोरेखित केलं होतं आणि त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला होता. पायल हिने तिच्या अभिनय आणि नृत्यकौशल्यासाठी पुरस्कारही जिंकले आहेत. तिच्या सोबत तिची छोटी बहीण निधी हीसुद्धा तिच्यासोबत कार्यरत असते. ती एक उत्तम मेकअप आर्टिस्ट आहे. सध्या पायल हिने युट्युबवरून सिरीज आणि म्युझिक व्हिडियोज यांच्या माध्यमातून आपली अभिनय कला प्रेक्षकांसमोर आणली आहे. तिचं वय लहान असूनही, तिच्या व्यक्तिरेखा साकारताना दाखवलेली समज ही वाखाणण्याजोगी आहे. येत्या काळात ती युट्युबसकट इतर माध्यमांतूनही आपल्याला भेटीस अनेक कलाकृतींमधून अशी आशा करूया. पायलच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून तिला खूप खूप शुभेच्छा !
( फोटोमध्ये पायल पाटील आणि तिच्यासोबत म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलेले सहकलाकार )
(Author : Vighnesh Khale)