Breaking News
Home / मनोरंजन / मालवणी आजींचा हा नवीन व्हिडीओ वायरल, आता चीनवाल्यांची काही खैर नाही

मालवणी आजींचा हा नवीन व्हिडीओ वायरल, आता चीनवाल्यांची काही खैर नाही

बऱ्याच महिन्यांपूर्वी एक व्हिडियो वायरल झाला होता. त्यात एक मालवणी आजीबाई एका मराठी मालिकेतील एका व्यक्तिरेखेला चांगल्याच शेफारून काढताना दिसत होत्या. ही मालिका म्हणजे ‘अग्गं बाई सासूबाई’ आणि या आजींचा रोष ओढवून घेणारं ते पात्र म्हणजे बबड्या. तसं तर या व्यक्तिरेखेने सगळ्यांचाच रोष ओढवून घेतला होता. या रोषाला आजीबाईंच्या व्हिडियो ने वाट करून दिली. आपणही तेव्हा व्हिडियो पाहिला होता. व्हिडियो ही आवडला होता, पण वायरल व्हिडियोज विषयी लेखात हा विषय घेणं राहून गेलं होतं. पण गेल्या २९ एप्रिल ला या आजीबाईंचा अजून एक व्हिडियो प्रसिद्ध झाला आणि म्हणता म्हणता वायरल ही झाला. या वेळी मात्र या मालवणी आजींच्या व्हिडियो विषयी लिहायलाच हवं हे ठरलं आणि आजचा हा लेख लिहिला जातो आहे.

तर, मागच्या वेळी आजींनी बबड्या हा विषय हाती घेतला होता आणि धमाल आली होती. यावेळी आजींच्या रडारवर आहे चीन आणि क’रोना. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आजी नेहमीप्रमाणे सकाळी उठून पेपर वाचत असतात. आपल्या आजूबाजूस काय चाललंय याचं भान आणि ज्ञान असावं ही त्यामागची भावना. त्याचवेळी जवळच बसलेली त्यांची नात ‘चीनवाल्यांनी क’रोना आणला ना आजी’ असं म्हणत त्यांना बोलतं करते. त्यावर चीनवर रागावलेल्या आजी होकारार्थी उत्तर देतात. वरून असंही म्हणतात की बॉ’म्ब गोळे टाकून अद्दल घडवायला हवी. त्यांचं हे उत्तर ऐकून त्यांची नात आणि आपण हसत सुटतो. आजी चिनविषयी बोलत राहतात. माझ्या हातात बॉ’म्ब असता तर टाकलाच असता एव्हाना असंही म्हणतात. त्यांच्या या उत्तराने आपल्या चेहऱ्यावर हसू कायम असतं, कारण त्या हे सगळं मस्करीत म्हणत असतात. पण मनात कुठे तरी राग ही असतो. लवकरच हा राग कशामुळे आहे हे सुद्धा कळतं. त्यांचं हे कारण सद्य स्थितीला संयुक्तिक ही वाटतं.

या क’रोना काळात मुलांच्या शिक्षणाचे हाल झालेले आपण सगळ्यांनीच पाहिले आहेत. या कारणामुळे आजींना राग आलेला असतो. पुढे त्यांची नात त्यांना विचारते, की आजी त्या चिन्यांनी मुद्दाम थोडी केलं असेल. पण त्यावरही आजींचं उत्तर तयार असतं. चीन भारतावर कुरघोडी करून पूढे जाऊ इच्छितो हे ते नमूद करतात आणि आपली मान ही होकारार्थी डुलते. पण पुढची काही सेकंदात आजी चिन्यांना कसा धडा शिकवला पाहिजे हे सांगतात आणि त्यांची नात हसत सुटते. आजी नातीचं हे खुसखुशीत संभाषण अजून पुढे चालत राहतं आणि पाकि’स्तानचा विषय निघतो. पण यावेळी मात्र आजी कानावर हात ठेवतात. मग विषय पुन्हा क’रोना वर येतो. आजी तुला सगळं माहिती आहे ना, मग क’रोना वर औषध आहे का काही असं गंमतीने विचारते. आजीही त्यावर मिश्कीलपणे कारल्याची भाजी खाण्याचा सल्ला देतात आणि हा धमाल व्हिडियो संपतो. आजींनी व्यक्त केलेल्या भावना या कुठे तरी आपल्या सगळ्यांच्या मनात खोलवर असलेल्या भावना आहेत हे ही जाणवतं. चीन आणि क’रोना यांच्यातलं नातं काय हे ठोसपणे सांगता येत नाही पण झालेली वाताहतही नजरेआड करता येत नाही. असो.

आपल्या मनातील भावनांना कळत नकळतपणे वाट करून देणाऱ्या आजींविषयी थोडं जाणून घेऊयात असं वाटलं. थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की या व्हिडियोज ची सूत्रधार आहे आजींची नात, जी कॅमेऱ्यामागून आजींना बोलतं करते. ऐश्वर्या प्रभूखानोलकर असं या नातीचं नाव. पेशाने सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट असलेली ऐश्वर्या मूळची कोकणातली. गेल्या वर्षी सुरू झालेल्या लॉक आणि अनलॉक काळात तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एखाद दोन व्हिडियोज मधून आजींची आणि आपली भेट होते. पण बबड्याविषयीचा तो वायरल व्हिडियो आजींना अगदी लोकप्रिय बनवून गेला हे ही लक्षात येतं. यात आजींना बोलतं करण्याची ऐश्वर्या हिची हातोटी आहेच सोबतच आजींची मुद्दे मांडण्याची पद्धत आणि त्याला लाभलेला मालवणी भाषेचा गोडवा ही कारणे सुद्धा आहेतच. आता तर आजींच्या नावाने एक इन्स्टाग्राम चॅनेल ही सुरू करण्यात आलंय. मालवणी आजीबाई असं या चॅनेलचं नाव. त्यात आजींची ओळख करून देताना ८२ वर्षांच्या खमक्या आजी अशीच करून दिलेली आहे.

ही ओळख अगदी सुयोग्य आहे. सध्या तरी दोन ते तीन पोस्टचं आपल्याला दिसताहेत. पण येत्या काळात आजींची अशीच दणदणीत फटकेबाजी पाहायला मिळो हीच इच्छा. सर्वसामान्यांच्या मनातील भावनांना हसत खेळत आणि वेळप्रसंगी तिरकसपणेसुद्धा वाट करून देणाऱ्या खमक्या आजींना मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा. तसेच त्यांच्या पुढील व्हिडियोज साठी मनःपूर्वक शुभेच्छा !!! आणि ऐश्वर्या, आजींना या मनोरंजक व्हिडियोज च्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणलंस त्याबद्दल तुझे धन्यवाद.

आम्ही आजींचा व्हिडीओ खाली देतो आहेत, तुम्ही नक्की पाहून घ्या. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आपल्याला हा लेख आवडला असेलच. अहो तुम्हाला आवडतील असेच विषय घेऊन आपली टीम दररोज लेख लिहीत असते आणि प्रसिद्ध करत असते. त्यामुळे अजून नवनवीन लेखही आहेतच मराठी गप्पावर. त्यांचाही आनंद घ्या आणि इतरांनाही द्या. आपला स्नेह आमच्या टीम सोबत असाच वृद्धिंगत होत राहू दे.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *