Breaking News
Home / मराठी तडका / मालिकांमध्ये अश्याप्रकारे शूट केला जातो डबल रोलचा सिन, बघा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचा हा व्हिडीओ

मालिकांमध्ये अश्याप्रकारे शूट केला जातो डबल रोलचा सिन, बघा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचा हा व्हिडीओ

मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजन विश्वातील महत्वाचा भाग. त्यामुळे या मालिकांतील कलाकार आपल्या भावविश्वाचा एक भाग कधी बनून जातात ते कळतही नाही. त्यामुळे मालिका आणि त्यातील कलाकारांविषयी जास्तीत जास्त माहिती जाणून घ्यावी असं चाहत्यांना वाटतं. यात महत्वाचा वाटा उचलला जातो तो शूटिंगच्या वेळेस चालणाऱ्या गंमती जंमती आपण बघतो तेव्हा. हे बिहाइंड द सीन्स आपल्याला शूटिंग कसं चालतं याची झलक दाखवतात. सोबतच कलाकारांच्या मजा मस्ती, ते करत असलेली मेहनत आणि एखाद्या सीन साठीही दाखवत असलेला संयम हे देखील बघायला मिळतात. आज या सगळ्या बाबींची आठवण झाली कारण आपल्या टीमने एक व्हिडियो बघितला. हा व्हिडियो आहे एका लोकप्रिय मराठी मालिकेचा बिहाइंड द सिन. चला तर मग याविषयी अजून जास्त जाणून घेऊयात.

ही मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असतं. स्टार प्रवाह वाहिनीने गेल्या काही काळात एवढ्या लोकप्रिय मालिका दिल्या आहेत की टी.आर.पी. च्या तक्त्यात ही वाहिनी आणि हिच्या मालिकांचा दबदबा दिसून आला आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही यातील आघाडीची मालिका. या मालिकेत गिरीजा प्रभू ही मध्यवर्ती भूमिकेतून आपल्या भेटीस येते. लहान वय असलं तरी तिने ज्या समंजसपणे ही भूमिका वठवली आहे त्यास तोड नाही. त्यात हा व्हिडियो बघून तर तिच्या विषयी असलेलं कौतुक अजून वाढतं.

हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा लक्षात येतं की यात गिरीजाला दुहेरी भूमिका साकार करायची आहे. त्यात तिला सुरुवातीला एके ठिकाणी कपाट उघडायचं असतं आणि तेवढ्यात तिला एक आवाज ऐकू येतं. मग आपसूक तिचं लक्ष दुसरीकडे जातं. त्यावेळी तिला तिच्या विचारांचं मूर्त स्वरूप बघायला मिळतं. म्हणजे तीच तिच्याशी बोलते आहे असा भास होतो. हा सिन करण्यासाठी तिने प्रथमतः कपाट उघडायचं. मग कॅमेरा दुसरीकडे जाणार. या कालावधीत तिने धावत पळत जाऊन दिलेल्या मार्क वर बसायचं. तसेच हातात एक सफरचंद असलं पाहिजे. यांमुळे प्रेक्षकांना दोहोंमधला फरक कळून येण्यास मदत होते. वाचायला सिन सोप्पा वाटतो. पण हा व्हिडिओ बघताना जाणवतं की केवळ या सीनसाठी किती रिटेक्स झाले असतील. यात कधी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना मध्ये एखादा अडथळा येतो. कधी शूटिंग युनिट मधलं कोणी मध्ये येतं. तर कधी वेळेत जाऊनही घाईघाईत डायलॉग चुकल्याने रिटेक घ्यावा लागतो. एक ना अनेक अशा शक्यतांमुळे सतत रिटेक होतात.

पण या सगळ्या काळात गिरीजा मात्र कायम हसरी असलेली दिसून येते. हा सिन उत्तम करण्यासाठी तिला सहकलाकार आणि तंत्रज्ञ यांची मदत होतेच. या मालिकेचे सिनेमॅटोग्राफर असलेले मोहित जाधव हे सुद्धा तिला मदत करत असतात. त्यांचंच युट्युब चॅनेल अडलेल्या ‘BTS MARATHI’ चॅनेल वरून हा व्हिडिओ बघता येतो. त्यांच्यामुळे पडद्यामागे कलाकार किती मेहनत घेतात, किती संयम ठेऊन काम करतात आणि शूटिंग करणं हे एक टीमवर्क कसं आहे हे कळून येतं. खरं सांगायचं तर कलाक्षेत्राच्या या चमचमत्या दुनियेची ही कष्टाची बाजू कमीच दिसते आपल्याला. पण जेव्हा ही दिसते तेव्हा कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, निर्माते यांच्या सगळ्यांविषयी असलेला आदरभाव वाढतो. आपल्या टिमकडून या सगळ्यांना मानाचा मुजरा.

आपल्याला हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपण आपल्या टीमचे लेख मोठ्या प्रमाणावर वाचता, शेअर करता आणि प्रोत्साहनपर कमेंट्स ही देता त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपलं हे प्रेम आणि पाठिंबा यापुढील काळातही आपल्या टीमच्या पाठिशी कायम राहू दे ही सदिच्छा. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.