Breaking News
Home / मराठी तडका / मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारी शालिनी खऱ्या आयुष्यात कशी आहे बघा

मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारी शालिनी खऱ्या आयुष्यात कशी आहे बघा

कलाकार म्हणून काम करताना, विविध पातळ्यांवर काम करावं लागतं. त्यात आपल्याला मिळालेली भूमिका समजाऊन घेणं, इतरांच्या भूमिकेसोबत आपलं काम जुळतंय ना याची काळजी घेणं, विविध प्रोजेक्ट्स करताना भूमिकांच तारतम्य ठेवणं, सततचे प्रवास, स्वतःचं घर, कुटुंब सांभाळणं आणि कित्येक कामं. यात अनेक वेळा कलाकार मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकून जातात. पण यावर उपाय म्हणून काही कलाकार मात्र तंदरुस्त राहण्यासाठी, व्यायामाचा सतत अंतर्भाव असलेली जीवनशैली स्वीकारतात. हि समतोल जीवनशैली अंगिकारलेलं आजच्या घडीचं एक आघाडीचं नाव म्हणजे माधवी निमकर कुलकर्णी. माधवी यांना आपण अनेक मालिका, नाटके, सिनेमे, आत्ता तर जाहिराती या अशा विविध माध्यमातील कामांसाठी ओळखतो.

माधवी यांनी आपल्या करियरची सुरुवात केली ती, एका कार्यक्रमाची सूत्रसंचालिका म्हणून. त्यावेळेस त्या खोपोलीला राहत आणि तेथून सतत मुंबईला प्रवास करत. पुढे पुढे तर मनोरंजन क्षेत्रात काम करता करता, त्या एके ठिकाणी नोकरीहि करत असत. त्यामुळे त्यांची दमछाक होत असे. पण मनोरंजन क्षेत्रात काम करणार हा विचार पक्का असल्याने त्यांनी आपला प्रवास खडतर असूनही चालू ठेवला. पुढे त्यांना अभिनयाची विविध कामं मिळत गेली. आधीच सांगितल्याप्रमाणे त्यांनी विविध माध्यमांतून अभिनय केलेला आहे. त्यांच्या प्रसिद्ध मालिका म्हणजे ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘जावई विकत घेणे आहे’, ‘हम तो तेरे आशिक है’ आणि सध्याची आघाडीची मालिका म्हणजे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’. त्यातील शालिनी हि खलनायिका सध्या खूप गाजते आहे.

तसेच त्यांनी निवडक नाटकांमधून अभिनय केला आहे. त्यातील लोकप्रिय नाटके म्हणजे, विजय केंकरे दिग्दर्शित महारथी, स्वप्निल जोशी यांची मुख्य भूमिका असलेलं गेट वेल सून हि होय. सिनेमे करतानाही त्यांनी अनेक दिग्गजांबरोबर काम केलं आहे. त्यांनी अभिनय केलेल्या सिनेमांमध्ये नवरा माझा भवरा, सगळं करून भागले, बायकोच्या नकळत, संघर्ष या लोकप्रिय सिनेमांचा समावेश होतो. नुकतच त्यांनी एका जाहिरातीसाठी बॉलीवूडचे खिलाडी अक्षय कुमार यांच्यासोबत शुटींग पूर्ण केलं. तसेच मध्यंतरी एका प्रथितयश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांना वेबसिरीजमध्येही काम करायला आवडेल असंहि नमूद केलं होतं. यावरून अभिनेत्री म्हणून विविध भूमिका आणि नवनवीन माध्यमं त्यांना अनुभवायला आवडतात हे दिसून येतं.

पण याव्यतिरिक्तही माधवी यांची एक ओळख आहे ती म्हणजे योग गर्ल म्हणून. हि ओळख फक्त कोणत्याही विशिष्ट भूमिकेसाठी नाही, तर योग करणं हि त्यांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. योग करण्यामुळे शरीर निरोगी राहतं, सुडौल दिसत आणि आजूबाजूला परिस्थिती कितीही नकारात्मक असो आपली मनस्थिती सकारात्मक ठेवण्यास मदत होते असं त्या मानतात. अशी हि निरोगी जीवनशैली आत्मसात करणाऱ्या माधवीजी त्यांना असेलेली योग, आहार, आरोग्य याविषयीची माहिती वेळोवेळी चाहत्यांशी शेयर करत असतात. तसेच योग करतानाचे फोटोज आणि विडीयोज त्या वेळोवेळी त्यांच्या इंस्टाग्राम वर अपलोड करत असतात. लॉकडाऊनच्या काळातही त्यांचा योग करण्याचा दिनक्रम कधी चुकत नसे. योग करण्याबरोबरच त्यांना नृत्याचीही आवड आहे. त्यांनी तीन वर्षे कथकचे प्रशिक्षणहि घेतले आहे. पण कामाच्या या घाईगडबडीतही काही आवडीनिवडी मागे पडतात तसे काहीसे झाले आहे. तरीही या व्यस्त वातावरणातून त्या घरच्यांना वेळ देण्याचा पूर्ण प्रयत्न करतात.

माधवीचे लग्न २०१० मध्ये झाले असून त्यांना एक मुलगा आहे. त्यांच्या मुलासोबत म्हणजेच रुबेन सोबत वेळ व्यतीत करणं, त्याच्या बरोबर मजा मस्ती करणं त्यांना खूप आवडतं. तसचं सेटवरही त्या सहकलाकारांसोबत खूप धमाल करताना दिसतात. कलाकार म्हणून वैविध्यपूर्ण भूमिका वेगवेगळ्या माध्यमातून करता आल्या पाहिजे हे जसं त्या कटाक्षाने पाळतात, तसचं आहार कितीही वेगवेगळा असला तरीही त्यात ठराविक प्रमाण असावं याकडेही त्यांचा कटाक्ष असतो. अभिनय आणि वैयक्तिक आयुष्यात उत्तम समतोल रहावा यासाठी कटाक्षाने गोष्टी करणाऱ्या या अभिनेत्रीचा प्रवासही यामुळे उत्तम चालु आहे आणि यापुढेही तो असाच चालू राहील यात शंका नाही. येत्या काळात जंगजौहर हा ऐतिहासिक सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्या सिनेमासाठी आणि इतर प्रोजेक्टसाठीही, टीम मराठी गप्पाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *