सध्या माझ्या नवऱ्याची बायको हि मालिका अशा वळणावर येऊन ठेपली आहे जिथे प्रत्येक नवीन एपिसोड नवनवीन वळणं घेऊन येतो आहे. यात राधिकाच्या बाजूने आलेली शनाया आता पुन्हा तिच्या बाबतीत थोडी गोंधळलेली दिसते आहे. पण एकंदरच या मालिकेचा प्रवास बघता धक्क्यावर धक्के प्रेक्षकांना वारंवार मिळत आले आहेतच. यातील एक धक्का तर शनाया या व्यक्तिरेखेचा मिळाला होता, जेव्हा रसिका सुनील हिने पुन्हा एकदा शनायाची भूमिका करायला घेतली होती. ईशा केसकरला दुखऱ्या दाढेमुळे मालिकेतून निरोप घ्यावा लागला होता आणि रसिका पुन्हा एकदा आपल्या जुन्या अवतारात पण नवीन अंदाजात आली होती. मधल्या काळात तिने अभिनयाचं प्रशिक्षणही परदेशात जाऊन घेतलं आहे. तसचं तिने गेल्या काही काळात फिटनेस कडे जास्त लक्ष दिलं आहे. तिच्या या सगळ्या प्रवासानिमित्ताने आज तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाविषयी थोडक्यात.
रसिकाला आपण शनाया या भूमिकेसाठी ओळखतो. तिने सुद्धा अगदी आत्मियतेने हि भूमिका रंगवली आहे. प्रेक्षकांची पसंती तिला मिळाली आहेच आणि ती दिसली सुद्धा जेव्हा तिला या मालिकेच्या अगदी पहिल्याच वर्षी सर्वोत्कृष्ट खलभूमिका असा पुरस्कार मिळाला होता. याचमुळे कि काय रसिकाने जेव्हा परदेशी जाऊन अभिनयाचं प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिला मालिका सोडणार असल्याचं अतीव दुःख झालं होतं. तसचं तिच्या चाह्त्यांसाठीही ते क्षण दुःखाचे होते. पण तिने मालिकेचा निरोप घेतला आणि अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी अमेरिकेत गेली. तिथे रीतसर प्रशिक्षण पूर्ण केलं. एवढंच काय तर तिथल्या काही शॉर्ट फिल्म्स मध्ये काम सुद्धा केलंय तिने. तसेच तेथील काही जाहिरातींसाठी अगदी ऑडिशन्स हि दिल्या आहेत. अशाच एका ऑडिशन मध्ये तिला जाणवलं कि ती दिसायला छान आहेच पण त्यासोबत स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
मग काय, कोणत्याही कामात झोकून देऊन आणि सगळं लक्ष एकवटून काम करण्याच्या स्वभावानुसार तिने व्यायाम करण्याकडे लक्ष दिलं. स्वतःला फिट तर केलंच सोबत नवीन फोटोशुटहि केलं. बि किनीमध्ये केलेलं तिचे हे फोटोज तिच्या चाहत्यांमध्ये गाजले आहेत. तिच्या एका मुलाखतीत तिने म्हंटलं आहे कि तिच्यावर काही जणांनी टीका केली आहे तर बऱ्याच जणांनी तिचं कौतुकसुद्धा केलं आहे. पण एक मात्र खरं कि फिटनेससोबतच तिच्या बि किनी मधील फोटोज मुळे ती गेल्या काही काळात चर्चेत होती. “माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेतील शनाया या व्यक्तिरेखेसाठी म्हणून तिला जास्त ओळखत असलो तरीही तिने मालिकांसोबतच सिनेमे, शॉर्टफिल्म्स, म्युजिक विडीयोज या माध्यमांतून अभिनय केलेला आहे. पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, गॅटमॅट, बस स्टॉप, गर्लफ्रेंड हे तिचा अभिनय असलेले सिनेमे. पोश्टर गर्ल मधली तिची लावणी जशी गाजली होती तशीच, बघतोस काय मुजरा कर या सिनेमातील सहायक भूमिकासुद्धा. या भूमिकेसाठी तिला सहायक अभिनेत्रीसाठीचा पुरस्कारही मिळाला आहे.
तिने रंगमंचावरही काम केलं आहे. सुबोध भावे यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेला “अवघा रंग एकची झाला’ या कार्यक्रमात ती होती. तसेच वैभव महाराष्ट्राचा या महाराष्ट्र दिनी झालेल्या आणि मराठी कलाकारांची मांदियाळी असलेल्या म्युझिक विडियोमध्ये तिचा सहभाग होता. इतर म्युझिक विडीयोत तिने गायनही केलं आहे. यु अँड मी यात ती गाताना आणि पावलं थिरकवताना दिसली होती. तिने पहिल्यांदा “शतजन्म शोधताना” या वेबसिरीजसाठी “तू असता तर” हे गाणं गायलं आहे. अभिनय, गायन, नृत्य या कलांव्यतिरिक्त तिला साहसी गोष्टी करायला खूप आवडतात. ती कधी स्कुबा डायवर म्हणून समुद्रात पोहताना दिसते तर कधी आकाशात पॅरा ग्लायडिंग करत विहरताना दिसते. तिला तिचं आयुष्य उत्तमरीतीने आणि मनमोकळेपणाने जगायला आवडतं आणि तसं तिच्या व्यक्तिमत्वातूनही जाणवतं. तसचं ते तिच्या भूमिकांमधून आणि मतांमधुनही जाणवतं. अशा या मोकळ्या विचारांच्या आणि ते ठामपणे मांडणाऱ्या रसिकाला येत्या काळात अनेक भूमिकांमध्ये आपण बघू यात शंका नाही. तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून तिला खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)