Breaking News
Home / मराठी तडका / मालिकेत नकारात्मक भूमिका निभावणाऱ्या सौंदर्या इनामदार खऱ्या आयुष्यात कश्या आहेत बघा

मालिकेत नकारात्मक भूमिका निभावणाऱ्या सौंदर्या इनामदार खऱ्या आयुष्यात कश्या आहेत बघा

मनोरंजन विश्वातील काही मोजके कलाकार असे असतात ज्यांचा ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन असा दोन्ही कडे दरारा असतो. पण ते तेवढेच मनमोकळे आणि मनमिळाऊ असतात. त्यामुळे, त्यांच्या दाराऱ्याचा त्रास न होता, त्यांच्याविषयी आदरच वाटतो. अशाच मोजक्या कलाकारांपैकी एक असलेल्या, अभिनेत्रीच्या कलाप्रवासाचा आजच्या लेखातून धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ‘कळळलं ?’ हा एक हुकुमी शब्द अगदी दमदारपणे उच्चारात ज्यांनी गेली अनेक वर्ष, अक्कासाहेब म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय त्या हर्षदा खानविलकर यांच्या कलाप्रवासाविषयी आज आपण या लेखात वाचणार आहोत.

हर्षदाजींची ‘रंग माझा वेगळा’ हि मालिका सध्या घराघरात लोकप्रिय होते आहे. या मालिकेतील, सौंदर्या इनामदार हि व्यक्तिरेखा सुद्धा अक्कासाहेबांच्या व्यक्तिरेखेजवळ जाणारी आहे, असं म्हणू शकतो. खंबीर, नेतृत्वगुण असलेली, खलनायकी अंगाने जाणारी, कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही अशी मुख्य व्यक्तिरेखा. या भूमिका साकारताना आणि त्यांही अनेक वर्षे, खरतरं कोणत्याही कलाकारांचा कस लागेल. हर्षदाजींनीहि या भूमिका साकारताना प्रचंड मेहनत घेतली आहेच. मात्र या भूमिका साकारताना त्या अगदी सहजपणे वावरतात. पण या सहज वावरण्यापाठी त्यांचा मालिका, नाटक, निर्मिती या क्षेत्रांतील कित्येक वर्षांचा अनुभव कारणीभूत आहे.

हर्षदाजींनी कालाप्रवासाची सुरुवात केली ते नाटकांमधून. त्यांची सुरुवात होत असताना, मालिका क्षेत्र विकसित व्हायला लागलं होतं. दरम्यान त्यांच्या ‘खेळ थोडावेळ’ या नाटकातील कामामुळे त्यांना एक मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. बरं हि मालिकाही पहिली मराठी मालिका. या मालिकेत त्यांनी जुई हि व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेचं नाव, ‘दामिनी’. या मालिकेच्या प्रसारणावेळी, घराघरातल्या ताई, माई, अक्का आणि बाकीची मंडळी हातात चहाचा कप घेऊन हि मालिका अगदी आवडीने बघत असत, एवढी हि मालिका खूप गाजली. पुढे अजून एक मालिका, सॅटेलाईट मालिका म्हणून पहिल्यांदा दाखल झाली. या मालिकेतही, हर्षदाजी यांची महत्वपूर्ण व्यक्तिरेखा होती. हि मालिका म्हणजे ‘आभाळमाया’. दामिनी आणि आभाळमाया यांनी मराठी मनोरंजन क्षेत्रात क्रांती घडवली. पुढे अनेक मालिका आल्या आणि त्यातल्या अनेक लोकप्रिय झाल्या. हर्षदाजी यातील अनेक मालिकांमध्ये महत्वाची व्यक्तिरेखा साकार केल्या आहेत.

अगदी उदाहरण द्यायचं झालं तर, घरकुल, कळत नकळत, उन पाउस, किमयागार, उचापती, बेधुंद मनाच्या लहरी, माझिया प्रियाला प्रीत कळेना या आणि अशा अनेक. यातील उचापती हि छोटीशी, कमीवेळ चालणारी विनोदी मालिका होती. यात प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर यांच्या हर्षदाजीं सोबत प्रमुख भूमिका होत्या. इतर मालिकांत काहीशा गंभीर व्यक्तिरेखा असताना, यात हर्षदाजींनी एका भुताची गंमतीशीर भूमिका केली होती. या तीनही कलाकारांच्या जोडीने, धमाल उडवून दिली होती. त्यांनी मराठी मालिकांसोबतच काही हिंदी मालिकाही केलेल्या आहेत. मालिकांमध्ये विविध व्यक्तिरेखा सकारात असताना, सूत्रसंचालनही केलं आहे. ‘नवरा असावा तर असा’ या रियालिटी शोच्या सूत्रसंचालन त्यांच्या खेळीमेळीच्या शैलीत केले. तसेच वेळप्रसंगी या शो मधील सहभागी व्यक्तींना त्या धीरही देत, त्यांच्यात आणि प्रेक्षकांमधील उत्तम दुवा होतं. त्यामुळे अभिनयासोबतच, सूत्रसंचालक म्हणूनही त्यांनी स्वतःची छाप पाडली आहे.

मालिका क्षेत्रात सतत व्यस्त असताना, त्यांनी नाटकातही आपला वावर कायम ठेवला. तीच सांगू शकेल, काचेचा चंद्र, पिंजरा, नाथ हा माझा, खेळ थोडावेळ हि त्यांची गाजलेली नाटकं. या नाटकांच्या निमित्ताने त्यांनी प्रभाकर पणशीकर, कुलदीप पवार यांसारख्या ऋषीतुल्य कलाकारांसोबत रंगमंचावर काम केलंय. मालिका आणि नाटक यांत वावरत असताना त्यांच्या अभिनयामुळे आणि वेशभूषेमुळे त्यांच्या व्यक्तिरेखा सतत लक्षात राहिल्या आहेत. त्यांनाही विविध वेशभूषा करण्याची आवड. त्यांनी तुही रे, प्यारवाली लव स्टोरी, झकास या कलाकृतींसाठी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली होती. त्या जशा स्वतः वेशभूषा साकारतात, तसेच इतर स्टायलिश यांनी केलेल्या वेशभूषाही त्या उत्तम रीतीने निभावतात. त्यांच्या सध्याच्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील भूमिकेसाठी त्यांची मैत्रीण आणि उत्तम अभिनेत्री शाल्मली टोळ्ये यांनी वेशभूषा साकारली आहे.

मालिका, नाटक यांतून अभिनय आणि वेशभूषा करताना हर्षदाजी यांच्या गाठीशी जो अनुभव जमा झाला, त्याचा वापर त्यांनी निर्मिती क्षेत्रात उतरून आणि उत्तम कलाकृती सादर करून केला आहे. त्यांचा मालिका क्षेत्रातील वावर हा अगदी पहिला वहिल्या मालिकांपासून आहे हे पाहिलंच. त्यामुळे आज त्या अनेक कलाकारांच्या, आदर्शस्थानी आहेत. काही जवळचे कलाकार त्यांनी आदराने ‘मम्मी’ म्हणतात असं त्यांनी काही मुलाखतीत सांगितलं होतं. त्यांचा प्रवास हा खरंच अद्भुत म्हणावा असा आहे, कारण इतकी वर्ष विविध भूमिका करणं आणि त्या लोकप्रिय होणं, यामागे कलाकारांची मेहनत, सातत्य कारणीभूत असतं. हर्षदाजी याचं, चालतं बोलतं उदाहरण आहेत. त्यांची कारकीर्द जशी बहरली आहे, तशीच ती यापुढेही बहरत राहो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !

आपण हा लेख वाचलात त्याबद्दल धन्यवाद. वर उल्लेख झाला तो शाल्मली टोळ्ये यांचा. अभिनेत्री, वेशभूषाकार म्हणून त्या प्रसिद्ध आहे. त्यांच्या कलाक्षेत्रातील वाटचालीचा आढावा आपण मराठी गप्पावर काही दिवसांपूर्वी घेतला होता. आपण तो लेख वाचला नसल्यास जरूर वाचावा.

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *