Breaking News
Home / मराठी तडका / मालिकेत नकारात्मक भूमिका निभावणारी मालविका खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा मालविकाची जीवनकहाणी

मालिकेत नकारात्मक भूमिका निभावणारी मालविका खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा मालविकाची जीवनकहाणी

मराठी गप्पाच्या माध्यमातून आपण वाचकांनी अनेक कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे लेख वाचले असतीलच. यात काही कलाकार आपल्याला असे आढळून येतील की ज्यांनी गेली कित्येक वर्षे विविधांगी भूमिकांतून आपलं मनोरंजन केलेलं आहे. यात कधी नायक नायिका म्हणून तर कधी खल भूमिकांतून. ते ही अगदी सातत्याने उत्तम अभिनय करत आणि प्रत्येक व्यक्तिरेखेस स्वतःचं असं वेगळेपण देऊन. याच मांदियाळीतील एका उत्तम अभिनेत्रीच्या कलाकारकीर्दीचा आपण आढावा आज घेणार आहोत. या अभिनेत्रीचं नाव आहे आदिती सारंगधर. लक्ष्य या मालिकेतील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असो वा आत्ताच्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील खलनायिका मालविका असो, प्रत्येक भूमिकेतून आदिती आपल्या लक्षात राहतात.

प्रत्येक भूमिका वठवण्यासाठी त्यांनी केलेला सखोल विचार, त्यासाठी घेतलेली मेहनत ती व्यक्तिरेखा पाहताना दिसून येते. गेल्या काही काळात त्यांनी अनेक मालिकांतून काम केलेलं आहे, यांमुळे त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिकांचा आपल्याला आनंद घेता आला आहे. मग ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मधील खल व्यक्तिरेखा असो वा ‘ह.म.बने तू.म.बने’ मधील विनोदी अंगाने जाणारी सकारात्मक व्यक्तिरेखा. या नजीकच्या काळातील त्यांच्या मालिका. या मालिकांआधी आदिती यांच्या दामिनी, लक्ष्य, अभिलाषा, वादळवाट, माझे मन तुझे झाले, भेटी लागी जिवा या मालिकाही गाजल्या. तसेच ‘फु बाई फु’ या विनोदी कार्यक्रमातून त्यांनी प्रहसनं सादर करून विनोदाचं उत्तम टायमिंग ही दाखवून दिलं. आदिती यांनी मालिका क्षेत्रात जसे भरघोस काम केले आहे तसेच रंगमंच आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी भरीव असे योगदान दिलेले आहे. त्यांच्या या कलाप्रवासाची सुरुवात झाली ती बालपणापासून. त्यांना नृत्याची खूप आवड. ही केवळ आवड म्हणून न ठेवता त्यांनी नृत्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले.

चाईल्ड सायकॉ’लॉजिस्ट होण्याच्या त्यांनी निर्णय घेतला होता. महाविद्यालयात अंतिम वर्षात असताना त्यांनी एका नाटकासाठी सहज म्हणून ऑडिशन दिलं आणि पुढे कामही केलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हंटल होतं कि या नाटकामुळे कलाक्षेत्रातच कारकीर्द करावी, असं त्यांना मनापासून वाटलं. तसेच घरुनही कलेचा वारसा होताच. त्यांनी कालाक्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तेव्हापासून आजतागायत अनेक कलाकृतींमधून अभिनय केलेला आहे. वर त्यांनी अभिनित केलेल्या मालिकांचा उल्लेख आलेला आहेच. सोबत त्यांनी मोहर, आकांत, ऐक, ती रात्र, पाच नार एक बेजार, नाथा पुरे आता अशा विविध सिनेमांतूनही अभिनय केलेला आहे. या सिनेमांतूनही त्यांनी विविध व्यक्तिरेखा साकार करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. तसेच लिटमस, मंजुळा, ऑल द बेस्ट, प्रपोजल, इंद्राक्षी, ग्रेसफुल या नाटकांतून त्यांनी रंगमंचावरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. यातील अनेक कलाकृतींसाठी त्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे.

(वरील फोटोत अभिनेत्री आदिती सारंगधर आपल्या पती आणि मुलासोबत)

उत्तम अभिनेत्री, उत्तम नृत्यांगना असणाऱ्या आदिती या उत्तम धावपटूही आहेत. काम, घरसंसार सांभाळताना आरोग्य उत्तम राहावं यासाठी त्या सदैव जागरूक असतात. आरोग्य उत्तम राहावे म्हणून त्यांनी धावणे हा व्यायाम प्रकार निवडला आहे. आदिती यांच्या सोशल मीडिया पोस्ट मधून त्यांनी पूर्ण केलेल्या मॅरेथॉन विषयीच्या पोस्ट्सही दिसतात. तसेच हा व्यायामप्रकार त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला दिसून येतो. सध्या आदिती या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. गेल्या काही काळात त्यांनी अनेक मालिकांतून विविध भूमिका साकार केलेल्या आहेतच. येत्या काळातही त्या विविध माध्यमं आणि वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखांतून आपलं मनोरंजन करतील हे नक्की. आदिती यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *