गेल्या सप्टेंबर मध्ये “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेने १२०० भागांचा टप्पा पार केला. हि मालिका सुरु झाल्यापासून ते आजतागायत या मालिकेतील गोष्ट जसजशी गुंतागुंतीची होत गेली तसतश्या प्रकारे मालिकेविषयीची मतंही बदलत गेली आहेत. पण या मालिकेतील एका व्यक्तिरेखेविषयी मात्र प्रेक्षकांच्या भावना कायम तशाच राहिल्या. हि व्यक्तिरेखा म्हणजे गुरुनाथ सुभेदार. सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी काहीही करू शकणारा अशी हि खलनायकी भूमिका. या भूमिकेच्या यशाचं श्रेय जसं लेखकांना जातं तसचं ते जातं अभिजित खांडकेकर यांच्या अभिनयाला.
याचं महत्वाचं कारण म्हणजे हि भूमिका स्वीकारण्याअगोदर अभिजित यांची “माझिया प्रियाला प्रीत कळेना” मधली भूमिका हि रोमँटीक नायकाची होती. जी सगळ्या प्रेक्षकांना भावली. एका मुलाखतीत अभिजित म्हणाले कि त्या भूमिकेपासून प्रेरणा घेऊन अनेकांनी स्वतःच्या जोड्या जमवल्या होत्या आणि सदर प्रेक्षकांनी काही वेळेस तसं त्यांना सांगितलं हि होतं. अशा वेळेस, गुरुनाथ हि पूर्णतः विरुद्ध भूमिका अभिजित यांनी स्वीकारली, हे त्यांचं धाडसचं. पण हा धाडसी स्वभाव काही आजचा नाही. कारण अभिजित यांचा प्रवास हा जसा नाशिक ते पुणे, मुंबई असा झाला तसाच तो निवेदक ते रेडियो जॉकी ते यशस्वी अभिनेता असा झाला आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले होते कि त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी निवेदक होणं स्वीकारलं कारण आपणही हे काम उत्तम करू शकतो असं त्यांना ठामपणे वाटलं. पुढे त्यांच्या या कामामुळे सुमारे पाच वर्ष खासगी रेडियो वाहिन्यांवरती ते रेडियो जॉकी होते.
पुढे महाराष्ट्राचा सुपरस्टार या रियालिटी शो मध्ये त्यांनी स्पर्धक म्हणून भाग घेतला. त्यांच्यातली क्षमता या वेळी पूर्ण महाराष्ट्राने पहिली आणि पुढे त्यांची अभिनयात वाटचाल सुरु झाली. माझिया प्रियाला प्रीत कळेना ते माझ्या नवऱ्याची बायको हा प्रवास मोठा आहे. या प्रवासात, अभिजित यांनी काही सिनेमेही केले. २०१३ साली आलेला जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा हा त्यांचा पहिला चित्रपट. पुढे ध्यानीमनी, भय, मी पण सचिन असे काही सिनेमेही केले. त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा म्हणजे “बाबा”. यात ते स्पृहा जोशी बरोबर काम करताना दिसले आहेत. सिनेमा, मालिका यांच्या सोबतच त्यांनी पती गेले गं काठेवाडी, येरे येरे पैसा सारखी नाटकांतूनही कामे केली आहेत. यातील एका नाटकांत त्यांच्या पत्नीने म्हणजे अभिनेत्री आणि नृत्यांगना सुखदा खांडकेकर यांनी कोरिओग्राफ केलं होतं.
स्थानिक निवेदक ते अभिनय क्षेत्रातील आघाडीचं नाव या प्रवासात अभिजित यांनी मोजक्या पण उत्तम भूमिका आणि त्याही दीर्घकाळ निभावल्या आहेत. त्यामुळे अभिनयासोबत येणारी स्थिरता त्यांच्यात दिसून येते. त्याचमुळे गुरुनाथ या व्यक्तिरेखेविषयी प्रेक्षकांचा व्यक्त होणारा रोष ते समजवून घेऊ शकतात आणि तरीही उत्तम अभिनय सतत करू शकतात. अभिनयाबरोबरच त्यांनी निवेदन करणं चालूच ठेवलं आहे. आम्ही दुनियेचे राजे या मराठी चित्रपट संगीत आणि संगीतकारांवरील कार्यक्रमाचे ते सादरकर्ते ते आहेत. येत्या काळातहि त्यांचा अभिनयाचा प्रवास चालू राहील आणि त्यांच्या भूमिका या मालिकांप्रमाणेच इतर माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीस येतील हे नक्की. त्यांच्या निवेदक आणि अभिनेता म्हणून होणाऱ्या येत्या काळातील वाटचालीसाठी टीम मराठी गप्पाकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)