Breaking News
Home / मनोरंजन / मास्तरांनी जर आम्हांला अश्याप्रकारे पाढे शिकवले असते तर पाठ करायची गरज लागली नसती

मास्तरांनी जर आम्हांला अश्याप्रकारे पाढे शिकवले असते तर पाठ करायची गरज लागली नसती

नुकताच एक व्हिडियो वायरल झाला होता. या व्हिडियोत आपल्याला एक मास्तर आणि त्यांचे विद्यार्थी दिसून येतात. या विद्यार्थ्यांपैकी तीन मुली आपल्याला डान्स करत करत भारतातील जिल्हे, राज्य, केंद्रशासित प्रदेशांची नावे सांगताना दिसतात. या व्हिडियोविषयी भारी चर्चा रंगली होती. आपल्याही टीमने यावर एक लेख लिहिला होता. आज काही दिवसांनी पुन्हा या व्हिडियोची आठवण व्हावी असा एक व्हिडियो आमच्या टीमने पाहिला आहे. तसा जुना व्हिडियो आहे पण या वायरल व्हिडियोशी काहीसा साधर्म्य असणारा व्हिडियो आहे. म्हंटलं आपल्या वाचकांना याविषयी वाचायला आवडेल म्हणून हा लेखप्रपंच. चला तर मग जाणून घेऊयात. या व्हिडियो मध्ये आपल्याला एका वर्गातील काही मुलं अर्धगोलाकार आकारात उभी असलेली दिसून येतात. त्यांच्या आजूबाजूला बघितलं असता शाळेची परिस्थिती फारशी चांगली नसावी असा निष्कर्ष काढता येतो. पण असं असलं तरी या मुलांची आणि त्यांच्या शिक्षकांची कलात्मकता मात्र पूर्णपणे काम करत असते हे या व्हिडियोवरून कळून येतं.

व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा आपल्याला दोन मुलं मध्यभागी बागडताना दिसतात. त्याचवेळी बाकीची मुलं काही तरी म्हणत असतात. एखादं गाणं असावं असं वाटतं. पण नीट लक्ष देऊन ऐकलं की कळतं की हा तर दोन अंकाचा पाढा आहे. आणि आपल्याला जी मुलं बागडताना दिसत होती ती खरं तर डान्स करत असतात. मग येतो तीन अंकाचा पाढा. हा पाढा पूर्ण करण्यासाठी म्हणून तीन मुली मध्यभागी येतात. मस्त अस नृत्य करत त्या त्यांचा सहभाग नोंदवतात. तारपा नृत्य केल्यासारख्या त्यांच्या स्टेप्स असतात. छान वाटत बघताना. त्यात हे सुद्धा जाणवतं की पाढे लयीत म्हंटल्याने मुलांच्या लगेच लक्षात राहत असणार आणि त्यात डान्स असल्याने गंमत ही वाटत असणार. हे वाटेपर्यंत चारच्या पाढ्याची वेळ येते. मग पुन्हा दोन मुलं येतात. लंगडी घातल्या सारख्या स्टेप्स करत ते त्यांचा कार्यभाग पूर्ण करतात. मग पाचच्या पाढ्यासाठी ३ मुली येऊन काही डान्स स्टेप्स करतात. हे पूढेही असच चालू राहतं. सहाच्या पाढ्यासाठी चार मुलं येऊन रिंगण घालत आपलं काम अगदी चोख करून निघून जातात.

मग सात च्या पाढ्यासाठी काही मुली पुढे सरसावतात. हे सगळं करत असताना उपस्थित प्रत्येक विद्यार्थी तोंडाने पाढे म्हणत असतो. असं करता करता आपण आठ पर्यंत येतो. यावेळी अजून मजा येते. कदाचित या मुलांच्या स्टेप्स ठरलेल्या नसतात. त्यामुळे जागच्या जागी उड्या मारत ते हा पाढा पूर्ण करतात. मग नऊ आणि दहाच्या पाढ्यांसाठी मुलींचे दोन ग्रुप येऊन जातात. त्यातील नऊच्या पाढ्यासाठी आलेला ग्रुप सगळ्यांत मोठा म्हणजे पाच जणींचा असतो. अस करता करता दहाच्या पाढ्यातील शेवटचा अंक म्हणजे शंभर म्हणून होतो आणि हा व्हिडियो संपतो. अर्थातच या व्हिडियोत जी संकल्पना आपल्याला दिसून येते ती नक्कीच कौतुकास्पद आहे. कारण पाढे असोत वा गणिताशी निगडित काहीही असो, ते जर मनोरंजक केले तर चट्कन मुलांच्या लक्षात राहते. केवळ निरसपणे अंकांची आकडेमोड शिकवली तरीही काही फायदा नसतो. आपल्यातले अनेक शिक्षक या मताशी सहमत असतील. त्यामुळे हा व्हिडियो बघून आनंद खूप होतो.

पण त्यात अजून भर पडली असती जर ही संकल्पना ज्यांनी शोधून काढली आणि मुलांकडून करवून घेतली त्या शिक्षकांबद्दल जर काही माहिती कळली असती तर ती सुद्धा आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवता आली असती. पण असो. हरकत नाही. तूर्तास आपण हा व्हिडियो पहिला नसेल तर आवर्जून पहा.

तुम्हाला तो आवडेल हे नक्की. तसेच या लेखाशी निगडित आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळू द्या. आपल्या प्रतिक्रियांतून आम्हाला नेहमीच प्रोत्साहन मिळतं आणि नवनव्या गोष्टी शिकता येत असतात. या दोहोंमुळे नवीन लेख लिहीत असताना ऊर्जा मिळते आणि अनेक चांगले बदल करता येतात. त्यातून तुम्हाला आवडणारे लेख तयार होतात. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यात खंड पडू देऊ नका आणि सदैव आमच्याशी आपले स्नेहबंध दृढ राहू देत ही सदिच्छा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *