सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत असलेल्या काही निवडक मालिकांमध्ये नाव येतं ते ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचं. या मालिकेमध्ये अरुंधती आणि अनिरुद्ध हे नवरा-बायको आणि संजना हि अनिरुद्ध ची सहकारी आणि प्रेमिका अशी मध्यवर्ती पात्र आहेत. मिलिंद यांनी अनिरुद्ध हि ग्रे शेड असणारी व्यक्तिरेखा उत्तमरीतीने वठवली आहे. त्यांच्या या भूमिकेची फारच प्रशंसा होताना दिसते आहे. मराठी मनोरंजन विश्वात वैविध्यपूर्ण रोल करण्यासाठी आपण ओळखतो मिलिंद गवळी यांना. बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केलं होतं. पुढे हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्यांनी कामं केली. पण आपल्याला माहिती आहे का कि त्यांनी आपल्या करियर मध्ये काही काळ गॅप घेतला होता. त्याचं महत्वाचं आणि गोड कारण म्हणजे त्यांचा प्रेमविवाह.
मिलिंद मुळचे मुंबईचे. एकदा एका विवाहाला उपस्थित राहण्यासाठी म्हणून ते जळगाव येथे गेले होते. तिथे त्यांना एक मुलगी दिसली. पाहता पाहता ते तिच्या प्रेमात पडले. पुढे तिच्याशी लग्नही केलं. त्यावेळेची ती मुलगी म्हणजे त्यांची पत्नी सौ. दीपा गवळी. त्यांच्या लग्नाला घरच्यांकडून होकार तर होता, पण मुलाला ठोस अशी नोकरी असावी, अशी अपेक्षा दीपाजींच्या घरच्यांकडून होती. मिलिंद यांनी हे त्याचं म्हणणं मान्य केलं. त्यांनी मुंबई युनिवर्सिटी मधून एम.कॉम चे पदव्युत्तर शिक्षण घेतले होतेच. पुढे त्यांनी ऑल इंडिया रेडियो साठी रीतसर परीक्षा देऊन त्यात काम करायला सुरुवात केली. त्यामुळे अभिनयाच्या करियरमध्ये थोडा गॅप झाला खरा, पण मिलिंदजी यांनी पुन्हा कमबॅक केलं आणि मग मागे वळून पाहिलं नाही. आयुष्यात अनेक चढउतार आले. पण मिलिंद आणि दीपा यांनी एकत्र त्यांना तोंड दिलं आहे.
आज त्यांना एक मुलगी आहे. मिथिला असे त्यांच्या मुलीचे नाव. ती उत्तम नृत्यांगना आहे आणि नृत्य शिकवते सुद्धा. तिचा विवाह २०१८ मध्ये संपन्न झाला आहे. मिलिंद यांनी आज पर्यंत अनेक भूमिका केल्या. चित्रपट, मालिकांमधून कामे केली. त्यांनी हिंदी मालिका क्षेत्रात कॅम्पस या मालिकेतून पदार्पण केले. पुढे सी. आय. डी., आहट यांसारख्या लोकप्रिय मालिकांचाही ते भाग होते. मराठीतही उल्लेखनीय अशा भूमिका केल्या. प्रत्येक वेळी प्रोजेक्ट कोणताही असो त्यांनी आपली कामे चोख पणे पार पाडली. अशा या सदाबहार अभिनेत्याच्या वाट्याला अनेक लोकप्रिय भूमिका येवोत हीच इच्छा. त्यांना त्यांच्या येत्या वाटचालीसाठी मराठीगप्पा कडून खूप खूप शुभेच्छा. (Author : Vighnesh Khale)