Breaking News
Home / मनोरंजन / मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांनी केलेला गरबा पाहिलात का, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांनी केलेला गरबा पाहिलात का, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

नुकताच शारदीय नवरात्रोत्सव संपन्न झाला. गणेशोत्सव आणि नवरात्री या दोन्ही सणांमुळे आपल्या आजूबाजूला असलेलं तणावाचं वातावरण जरा निवळायला सुरवात झाली आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. त्याआधी फक्त करोना एके करोना आणि करोना दाहे करोना हे आपलं जीवन झालं होतं. पण असो. वेळ हळूहळू का होईना बदलते आहे हे स्वागतर्ग आहेच. या बदलत्या वेळेमुळे वर उल्लेख केलेले सण, यंदा अनेक ठिकाणी जल्लोषात आणि आनंदात साजरे झाले आणि लक्षात राहतील असे क्षण आपल्याला अनुभवता आले.

असेच काही क्षण या काळात दरवर्षी आपल्याला अनुभवायला मिळतात ते मुंबईच्या जीवनवाहिनीत म्हणजे आपल्या लोकल ट्रेन मध्ये. दर वर्षी नवरात्रोत्सव आणि दसऱ्याला अनेक लोकल ट्रेन्स मध्ये हे सण साजरे केले जातात. अनेक प्रवासी ग्रुप्स एकत्र येत या सणांची मौज आपल्या लाडक्या लोकल मध्ये लुटत असतात. यावर्षी ही यातील काही ग्रुप्सच्या धमाल मस्तीचे व्हिडियोज आपल्याला पाहायला मिळाले. त्यातील एक व्हिडियो तर खासकरून लक्षात राहिला.

हा होता लोकल मध्ये आपल्या सगळ्या ताई माईंनी मिळून सादर केलेला दांडिया. अर्थात दांडिया सादर केला असला तरी त्याचा उद्देश स्वतः आनंद घेणं हा असावा. त्यामुळे यात सहभागी झालेली प्रत्येक स्त्री ही त्या क्षणांची मजा घेत होती. कोणाचंही लक्ष सेल्फी, व्हिडियो यांच्याकडे नव्हतं. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला नटून साऱ्या जणी ट्रेनच्या लेडीज स्पेशल डब्यात दिसून येतात. सुरुवातीला चिंचोळ्या जागेत गरबा करणाऱ्या या सर्व जणी मग लोकलच्या दोन्ही दरवाजांमधील जागेकडे सरकतात. त्यातल्या एका ताईंकडे असतो माईक. त्या पुढे जातात आणि मग हा माईक दुसऱ्या ताईंकडे जातो. मग त्या गायला लागतात. कोरस द्यायला बाकीच्या सगळ्या असतातच. पहिलं गाणं ‘मैं छोड चली बाबूल का देस, पिया का घर प्यारा लगे’. पण नेमक्या याचवेळी सगळ्याजणी त्या मोकळ्या जागेत यायचा प्रयत्न करत असल्याने गाणं थोडंसं विरून जातं. पण दुसरं गाणं मात्र अगदी पूर्णपणे ऐकू येतं. नवरात्रीचा सण आहे आणि गरबा होत असताना देवीचं गाणं तर असणारच ना. हे दुसरं गाणं असतं – शेरोवाली. या गाण्यावर मस्त फेर धरत या ताई माई गरबा करत असतात. त्यांचं एकसुरात गायलेलं गोड गाणं, व्हिडियो संपल्यावरही कानात घुमत असतं. पण म्हणून हा व्हिडियो संपला अस समजू नका.

आता गरबा म्हंटलं की आपला लाडक्या कान्हाची आणि राधेची आठवण होणारच. त्यामुळेच तिसरं गाणं असतं – ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी’. या गाण्यावरही अगदी प्रसन्न असा सूर लागलेला असतो या सगळ्या जणींचा. अगदी उत्साहाचं वातावरण असतं. त्यात एक ताई तर उत्साहात येऊन थेट बर्थ वर उभ्या राहत व्हिडियो रेकॉर्ड करत असतात. त्या क्षणी त्यांचं कौतुक आणि त्या पडतील म्हणून भीती अशा संमिश्र भावना आपल्या मनात दाटून येतात. पण एकंदर माहोल इतका सुंदर तयार झालेला असतो की व्हिडियो संपल्यावरही आपण पुन्हा पुन्हा हा व्हिडियो पाहतो. ज्यांनी ज्यांनी ट्रेनने प्रवास केला आहे किंवा करत असतील त्यांना या ग्रुप्सच्या गाण्याची, डान्सची मजा माहिती असेलच. अनेक वेळेस तर सकाळी जेव्हा हे ग्रुप देवाची गाणी म्हणत प्रवास करत असतात तेव्हा मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि दिवस ही छान जातो. अशा या असंख्य ग्रुप्स मधला हा एक ग्रुप. आपल्या टीमला त्यांची नवरात्र साजरं करण आवडलं.

आपणही हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्याला ही आवडला असेलच. जर नसेल पाहिला, तर जरूर पहा आणि आनंद घ्या. तसेच मंडळी आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असणार हे नक्की. आपली टीम नेहमीच आपल्या वाचकांसाठी विविध विषयांवर लिहीत असते. आपणही आमचं मनापासून कौतुक करत असता. यापुढेही आपण आम्हाला प्रोत्साहन देत राहाल ही खात्री आहे. आम्हीही आपलं नेहमीच उत्तमोत्तम लेख लिहून मनोरंजन करत राहु याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे तुम्ही न वाचलेले लेख वाचा. आठवणीने सगळे लेख शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *