नवीन कथानक, नवीन आणि जुन्या कलाकारांचा मेळ असलेला संच घेऊन अनेक मालिका गेल्या काही काळात आपल्या भेटीस आल्या आहेत. या मालिकांमध्ये एक मालिका प्रामुख्याने आपल्याला, प्रेक्षकांच्या चर्चेतून सतत डोकावताना दिसते. या मालिकेचं नाव आहे, ‘मुलगी झाली हो’. या मालिकेतील, ‘माऊ’ हि व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ‘दिव्या पुगांवकर’ या नवोदित अभिनेत्रीच्या, अभिनयप्रवासाचा आढावा घेणारा लेख आपण मराठी गप्पावर वाचला आहेच. आज याच मालिकेतील, माऊ ची आई साकारणाऱ्या, अनुभवी अभिनेत्री, शर्वाणी पिल्लई यांच्या अभिनयप्रवासाचा आपण धांडोळा घेण्याचा प्रयत्न करू.
शर्वाणी यांचा जन्म, बालपण आणि अभिनयाची कारकीर्द मुंबईमधली. लहानपणापासून अभिनयाची आवड. लहान नाटूकल्या करत करत, एकांकिका केल्या. मग व्यावसायिक नाटक सुरु झालं. त्यांनी मराठीसोबतच, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील नाटकांमध्येही कामे केली आहेत. व्यावसायिक नाटकांत काम करताना त्यांनी सुरुवातीपासून विजयाजी मेहता, नसुरुद्दिन शहा, संजय कपूर, अरुण नलावडे, मोहन जोशी, विजय गोखले यांसारख्या दिग्गजांसोबत विविध नाटकांत अभिनय केला. कारकिर्दीची सुरुवात इतकी उत्तम झाली होती, चांगला अनुभव गाठीशी येत होता. दर नवीन प्रयोगागणिक आणि नाट्यकृतीगणिक, शर्वाणी यांच्यातील अभिनेत्री फुलत गेली. आजतागायत त्यांनी अनेक नाटकांचे कित्येक प्रयोग केले आहेत. त्यांची खूप व्यावसायिक नाटके गाजली. काळोखाच्या सावल्या हे त्याचं पहिलं मराठी व्यावसायिक नाटक. हे नाटक गाजलंच. सोबत त्यांची नागमंडल, विक्रम मोहिनी राजवाडे, गोपाळा रे गोपाळा, माकडाच्या हाती शँम्पेन, लख लख चंदेरी हि नाटकेसुद्धा गाजली. यातील, गोपाळा रे गोपाळा मधील त्यांचं अंकुश चौधरीयांच्या सोबतची विनोदी भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
त्या नाटकात ज्या तन्मयतेने रमतात तशाच त्या, मालिकांच्या आणि चित्रपटांच्या दुनियेतही एकरूप होतात. त्यांची सध्या, ‘मुलगी झाली हो’ हि मालिका सुरु आहेच. त्याआधी त्यांनी अतिशय लोकप्रिय ठरलेल्या, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत एक महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या, गं सहाजणी, आंबट गोड, अवंतिका या मालिकातील भूमिकाही गाजल्या. मालिकांसोबतच त्यांनी ‘तू तिथे मी’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘पेईंग घोस्ट’, ‘पटलं तर घ्या’, ‘देऊळ’, ‘सौ. शशी देवधर’ हे चित्रपटही अभिनित केलेले आहेत. यातील पेइंग घोस्ट या चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिका साकारली होती. तर सौ. शशी देवधर हा चित्रपट त्यांच्या साठी फार महत्वाचा होता. कारण यात त्यांनी स्क्रीन प्ले लिहिला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती लाभली आहे. अभिनयासोबतच त्यांनी लेखनकलेतही जसं उत्तम योगदान दिलं आहे, तसच सहाय्यक दिग्दर्शक, वेशभूषाकार म्हणूनही काम पाहिलं आहे.
शर्वाणी ह्यांचे लग्न झाले असून त्यांच्या पतीचे नाव उन्नी कृष्णन पिल्लाई असे आहे. दोघांनाही एक मुलगा असून मुलाचे नाव अथर्व असे आहे. लॉकडाऊनमध्ये शर्वाणी कधी जुन्या सहकाऱ्यांशी मुलाखतीतून गप्पा मारताना दिसल्या, तर कधी कथा वाचन करताना दिसल्या. त्यांची ‘मुलगी झाली हो’ मधील भूमिका त्यांच्या इतर भूमिकांसारखीच गाजते आहे. एका आईची, मुलींना एकट्याने वाढवताना होत असलेली घालमेल त्यांनी अगदी कसलेल्या अभिनेत्रीप्रमाणे दाखवली आहे. याच परिणामकाराकातेमुळे त्यांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. इतर कलाकारही उत्तम काम करताहेतच. शर्वाणीजी येत्या काळात या मालिकेसोबतच, इतर प्रोजेक्ट्समधून आपल्या भेटीस येत राहतील आणि त्यांच्या चाहत्यांना अभिनय, लेखन यातून आनंद देत राहतील हे नक्की. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)