Breaking News
Home / मराठी तडका / मुलगी झाली हो मालिकेतील शौनक खऱ्या आयुष्यात कसा आहे, बघा शौनकचं खरं आयुष्य

मुलगी झाली हो मालिकेतील शौनक खऱ्या आयुष्यात कसा आहे, बघा शौनकचं खरं आयुष्य

‘मुलगी झाली हो’ ही मालिका गेल्या काही काळापासून प्रेक्षकप्रिय मालिकांच्या पंगतीत अगदी वरच्या क्रमांकावर दाखल झाली आहे. बार्क या संस्थेच्या आकड्यांनुसार २१ ते २७ नोव्हेंबर दरम्यान या मालिकेने मराठी मालिका विभागात प्रेक्षक संख्येची तुलना केली असता, दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आधीच्या आठवड्यात ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर होती. यावरून या मालिकेची वाढती लोकप्रियता कळून येते. या मालिकेतील विविध अभिनेत्रींच्या कारकिर्दीचा आढावा मराठी गप्पाने याआधी घेतला आहेच. आज या लेखाच्या निमित्ताने आपण या मालिकेतील नायकाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराच्या अभिनय प्रवासाची ओळख करून घेणार आहोत. या मालिकेचा नायक म्हणजे शौनक जहागीरदार आणि ही व्यक्तिरेखा साकारली आहे योगेश सोहोनी या गुणी अभिनेत्याने.

योगेश याला आपण उत्तम अभिनेता, डबिंग आर्टिस्ट, सूत्रसंचालक म्हणून ओळखतो. योगेश च्या कलाप्रवासाचा श्रीगणेशा झाला तो शाळेतील सांस्कृतिक स्पर्धांमधून. पुढे त्याने कलाक्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. कलाक्षेत्रात त्याने विविध माध्यमांतून काम केलं आहे. मग त्या मालिका असोत, वेब सिरीज असो किंवा सूत्रसंचालन. जे करायचं ते उत्तम करायचं, असे त्याचे विचार दिसतात. त्यामुळे त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गजांसोबत काम केलेलं आहे. सूत्रसंचालन करतानाही त्याने सांगीतिक कार्यक्रम, नवीन मालिका-सिनेमा यांसाठीच्या मुलाखती असं वैविध्यपूर्ण काम केलेलं आहे. अगदी लोकप्रिय तबला वादक झाकीर हुसेन, प्रसिद्ध वादक एहसान कुरेशी यांच्यासोबत काम केलेलं आहे. मालिका क्षेत्रातही त्याने स्वतःची छाप सोडली आहे. ‘मुलगी झाली हो’ प्रमाणेच त्याच्या ‘दोन किनारे, दोघी आपण’, ‘अस्मिता’, ‘गुलमोहर’ या मालिकांमधील भूमिका गाजल्या आहेत. अस्मिता मालिकेतील सिद ही व्यक्तिरेखा तर विशेष गाजली. मालिकांसोबत त्याने चित्रपटातूनही अभिनय केलेला आहे. मंडळ आपलं आभारी आहे, ड्राय डे हे त्याचे गाजलेले चित्रपट.

तसेच १५ ऑगस्ट या नेटफ्लिक्स ओरिजिनल वेब सिरीज मध्येही तो झळकला होता. या वेब सिरीजची निर्मिती लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांनी केलेली होती. ‘बिलिव्ह इन’ ही त्याची अजून एक प्रसिद्ध वेब सिरीज. एकूणच काय तर कलाक्षेत्रात पाऊल ठेवल्यापासून योगेश याने विविध माध्यमांतून आणि कलाप्रकारांतून स्वतःतील कलांना वाव दिला आहे. अभिनय वगळता, त्याला व्यायामाची आवडही भरपूर आहे. गेल्या काही दिवसांत त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटना भेट दिली असता, हे प्रामुख्याने जाणवतं. तसेच अभिनेता म्हणून तो जसा प्रसन्न व्यक्तिमत्वाचा आहे, तसाच व्यक्ती म्हणूनही तो मैत्रीपूर्ण आहे. त्याच्या कामाच्या ठिकाणी सहसा त्याची अनेकांशी चटकन मैत्री झालेली दिसते. अगदी सध्याच्या मालिकेतही तो शूट चालू नसताना सहकलाकारांसोबत धमाल मस्ती करत असतो. या धमाल मस्तीचे काही व्हिडियोज या मालिकेच्या चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध झाले होते. त्यानेही काही व्हिडियोज स्वतः च्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केले आहेत. तसेच अनेक नाटकांना त्याची नाट्यरसिक म्हणून आवर्जून हजेरी असते. तसेच वेळोवेळी उत्तम कलाकृतींचं कौतुक करण्यातही तो सदैव आघाडीवर असतो.

असा हा दिलखुलास कलाकार मुलगी झाली हो च्या निमित्ताने लोकप्रियतेची एकेक शिखरे पादाक्रांत करतो आहे. नुकतेच त्याचे इन्स्टाग्रामवर १५,००० फॉलोवर्स पूर्ण झाले. त्याच्या चाहत्यांकडून यासाठी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. तसेच शौनक आणि माऊ यांची प्रेमकथा सध्या एका अनोख्या वळणावर येऊन ठेपली आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्येही नवनवीन भाग पाहण्याची उत्सुकता लागून राहिलेली असते. असेच प्रेम योगेशला त्याच्या कामासाठी सतत मिळत राहो आणि त्याची कलाक्षेत्रातील घोडदौड अखंड चालू राहो, या मराठी गप्पाच्या टीमकडून योगेश याला मनापासून शुभेच्छा!

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.