गेल्या काही काळात मराठी मालिकविश्वात अनेक नवनवीन मालिकांची भर पडते आहे यानिमित्ताने अनेक जुने नवे चेहरे एकत्र काम करताना दिसताहेत. कौतुकाची बाब अशी की अनेक नवोदित कलाकारांनाही यात संधी मिळते आहे. सोबत कलाविश्वातील काही कलाकृतींचा अनुभव असलेले कलाकारही आहेत. यातील एक नाव फार प्रसिद्ध होते आहे. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत या अभिनेत्रीने सिद्धी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. माऊ या मुख्य व्यक्तिरेखेची जिवाभावाची मैत्रीण म्हणजे ही सिद्धी. प्राजक्ता नवनाळे हीने तिच्या इतर भुमिकांप्रमाणेच ही भूमिकाही उत्तमरीतीने साकारली आहे. आज या लेखाच्या निमित्ताने प्राजक्ताच्या अभिनय प्रवासाचा धांडोळा घेण्याचा मराठी गप्पाचा प्रयत्न.
प्राजक्ता ही मूळची इचलकरंजीची. तिचं बालपण आणि शिक्षण इथेच झालं. पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना तिने बी.सी.ए. ही पदवी संपादन केली. याचकाळात तिने महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधून अभिनय करण्यास सुरुवात केली होती. तसेच लहानपणापासून सांस्कृतिक कार्यक्रमातून काम करण्याचा अनुभव तिच्या गाठीशी होताच. पुढे या अनुभवाचा फायदा तिला मालिकांमधून आणि वेब सिरीज करताना झाला. तिने सुरुवातीला ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून पदार्पण केलं. या मालिकेतील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. पुढे तिने ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ या मालिकेत ‘रंजू’ ही व्यक्तिरेखा निभावली होती. कालांतराने तिची ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत निवड झाली. आज या मालिकेच्या निमित्ताने सिद्धी या व्यक्तिरेखेतुन प्राजक्ता प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.
मालिकांतुन अभिनय करत असताना तिने दोन गाजलेल्या वेब सीरिज केल्या आहेत. यातील एक म्हणजे लोकप्रिय वेब सिरीज ‘गावाकडच्या गोष्टी’ ही होय. तसेच ‘कबुतरं’ या वेबसिरीज अंतर्गत येणाऱ्या ‘तमाशा’ या कथेचा ती महत्वपूर्ण भाग होती. या कथेत तमाशात काम करणारी एक तरुण मुलगी आणि तिचा प्रियकर यांची प्रेमकहाणी आणि त्याला समाजाकडून होणारा विरोध अशा आशयाची कथा होती. तिचा अभिनय असलेल्या या दोन्ही वेब सिरीजना प्रथितयश वृत्तपत्रे आणि अन्य माध्यमांतून कौतुकाची थाप मिळाली आहेच. तिने वेब सिरीज सोबतच एका गाण्यातही अभिनय केला आहे.
अभिनयासोबतच सामाजिक प्रश्नांबाबतही प्राजक्ता जागरूक असते. तसेच मोकळ्या वेळेत कुटुंबीय आणि मित्र परिवार यांच्यासोबत तिला वेळ घालवायला आवडतो. तसेच तिला भटकंती करण्याचीही आवड आहे. सध्या तिचे नवीन लूक मधले फोटोशूट्स प्रसिद्ध झाले आहेत. तिच्या चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. येत्या काळातही तिच्या भूमिकांवर प्रेक्षक प्रेम करतीलच आणि तीसुद्धा तेवढ्याच आत्मियतेने तिच्या भूमिका सादर करेल हे नक्की. प्राजक्ताला येत्या काळातील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा ! आपण हा लेख वाचलात याबद्दल धन्यवाद. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील शर्वाणी पिल्लई आणि दिव्या पुंगांवकर यांच्या अभिनय कारकिर्दीचा आढावा मराठी गप्पाच्या टीमने घेतला होता. आपण ते लेख वाचले नसल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करू शकता. सर्च ऑप्शनमध्ये जाऊन मुलगी झाली हो या नावाने सर्च केल्यास आपल्याला उपलब्ध लेख मिळतील. मराठी गप्पाचे नियमित वाचक असल्याबद्दल धन्यवाद !
(Author : Vighnesh Khale)