मराठी गप्पावर आपण नेहमीच नवनवीन मालिका आणि त्यातील कलाकरांविषयी जाणून घेत असतो. खासकरून नवीन कलाकारांची ओळख आमच्या वाचकांना व्हावी ह्यासाठी आमची धडपड असते. आज अशाच एका नवीन मालिकेतील, मालिका क्षेत्रातील एका नवोदित अभिनेत्रीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या अभिनेत्रीचं नाव आहे दिव्या सुभाष पुगावकर. दिव्या सध्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचते आहे ते ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या माध्यमातून. या मालिकेत तिने साजिरी म्हणजेच माऊ हि मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. साजिरी ह्या व्यक्तिरेखेस बोलता येत नाही, त्यामुळे आपल्या हातवाऱ्यांनी तिला आपलं म्हणणं समजवावं लागतं. कोणत्याही कलाकारासाठी आणि त्यातही नवोदित कलाकारांसाठी अशा प्रकारची भूमिका आव्हानात्मक. हे आव्हान सध्या दिव्या पेलताना दिसते आहे.
तिने याआधी केलेल्या भूमिकांचा तिला फायदा यात झाला असणार हे नक्की. दिव्याने या आधी प्रेमा तुझा रंग कसा, विठूमाऊली या मालिकांतून भूमिका केल्या होत्या. तसेच मालिकाविश्वात दाखल होण्याआधी तिने, शॉर्ट फिल्म्स, म्युझिक विडीयोज यातून आपल्यातल्या अभिनेत्रीला वाव दिला होता. शॉर्ट फिल्म्स मध्ये तिने दोन शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत, ज्या अगदी नक्की पाहाव्या अशा आहेत. त्यातली एक आहे ‘इट्स माय ड्युटी’ हि शॉर्ट फिल्म. या शॉर्ट फिल्म चा विषय हा मुलींकडे वळणाऱ्या वाईट नजरा आपण कशा रोखू शकतो आणि त्यासाठी आपली इच्छाशक्ती वापरली कि कसा फरक पडतो हे दाखवलं होतं. तसेच ‘दृष्टी’ हि तिची अजून एक शॉर्ट फिल्म जी नेत्रदान या विषयावर भाष्य करते.
तिचे दोन भाग प्रसिद्ध झाले होते. एक मुलगी, जिचं लग्न ठरलंय, तिची होळी खेळताना दृष्टी जाते आणि तिच्या आयुष्यात कसे नकारात्मक बदल होतात हे पहिल्या भागात पहायला मिळतं. तर दुसऱ्या भागात हीच मुलगी जिद्दीने तिला आवडणारी चित्रकला कशी जपते आणि येणाऱ्या आव्हानांना सकारात्मकतेने कशी दूर सारते हि दुसऱ्या भागातील कथा. या दोन्ही भागातील तिच्या अभिनयाचं कौतुक आहेच. सोबत यातील पहिल्या भागात तिने एका गाण्यावर नृत्य हि केलेलं आहे. हे गाणं त्या शॉर्ट फिल्मचा एक भाग होतं, पण या व्यतिरिक्त हि तिने दोन म्युझिक विडीयोज केले आहेत. एकाचं नाव आहे ‘नखरा तुझा’. विडीओ पॅलेस या अग्रगण्य संस्थेने हे गाणं प्रसिद्ध केलं आहे. युट्युबवर अडीच लाखांहून अधिक व्युज या गाण्याला मिळाले आहेत. तसेच ‘आय लव्ह यु’ या पंजाबी गाण्यावरही तिने आपले पाय थीरकवले आहेत.
अभिनयासोबतच तिला मॉडेलिंगची आवड आहे. मी मराठी वाहिनी आयोजित मुंबईची सुकन्या या स्पर्धेत लोकप्रिय चेहरा हा किताब तिने पटकावला आहे. तसेच प्रतिथयश वृत्तपत्र असा नावलौकिक असणाऱ्या महाराष्ट्र टाईम्सच्या ‘श्रावण क्वीन’ या स्पर्धेत, मिस टॅलेंटेड हा किताबही तिने मिळवला आहे. एकूणच काय, तर दिव्याने मनोरंजन क्षेत्रात जिथे जिथे काम केलंय, तिथे तिथे तिने स्वतःची छाप सोडली आहे. सध्या ती साकारत असलेली साजिरी म्हणजे माऊ हि व्यक्तिरेखा आव्हानात्मक आहे. पण नेहमीच उत्तम काम करणाऱ्या दिव्याने आत्तापर्यंत प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली आहेच. यापुढेही तिच्या अभिनयाचं कौतुक होत राहीलच. तसेच येत्या काळात तिच्या नवनवीन भूमिका आणि विविध माध्यमांतील अभिनय प्रेक्षकांना पहायला मिळेल हे नक्की. तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)