क’रोना आला काय अन आपल्या जीवनात अनेक गोष्टी दुरापास्त झाल्या. त्यात थिएटर मध्ये जाऊन सिनेमा बघणं ही आलंच. तसेच नवीन सिनेमा आपल्या भेटीस न येणं सुद्धा आलंच. त्यात पावनखिंड या बहुप्रतिक्षित सिनेमाची तर खूप चर्चा होती आणि आहे. आधी जंगजौहर असं नाव असलेला हा सिनेमा येत्या काळात ‘पावनखिंड’ या नावाने प्रदर्शित होईल. सिद्धहस्त लेखक आणि दिग्दर्शक दिगपाल लांजकेर यांनी या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे. यात अजय पूरकर यांनी नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकार केली असल्याचं बोललं जातं होतं. खुद्द अजय पुरकर यांनी या सिनेमात आपण एका महत्वपूर्ण भुमिकेत असू असं मध्ये एका मुलाखतीत म्हंटलं होतं. त्यामुळे येत्या काळात जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित होईल तेव्हा त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण असेल. नुकतच या सिनेमाचं पोस्टर प्रसिद्ध झालं. अजय पुरकर यांनी ही या सिनेमाचं पोस्टर आपल्या सोशल मीडियावर शेअर केलं होतं. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये औत्सुक्याचं वातावरण पसरलं आहे. ते सध्या ‘मुलगी झाली हो’ ह्या मालिकेतही काम करत आहेत.
पण तत्पूर्वी अजय पुरकर यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने त्यांचे चाहते हळहळले होते. ही पोस्ट होती त्यांच्या आई विषयी. ५ जुलै २०२१ रोजी अजय यांच्या आईंना देवाज्ञा झाली. एरवी केवळ आपल्या कामाशी निगडित अशा पोस्ट टाकणारे अजय यांनी काही काळापूर्वी आपल्या आईविषयी एक पोस्ट केली होती. त्यात त्यांचे आईसोबत असलेले काही जुने फोटोज आणि त्यांच्या विषयी असणाऱ्या भावनांना वाट मोकळ करून देणारं लिखाण केलेलं दिसून येतं. या पोस्ट मधून असं जाणवतं की अजय यांच्या आई या अतिशय खंबीर आणि दृढनिश्चयी स्वभावाच्या होत्या. त्यांच्या या गुणांमुळेच अजय यांनी त्यांचं नामकरण फिनिक्स असं केलं होतं. फिनिक्स पक्षाप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अजय यांच्या आईंनी नेहमीच भरारी घेतली होती हे या लिखाणातून कळून येतं. त्यांनी आयुष्यभरात जवळपास १४ शस्त्रक्रियांना सामोरं जाण्याची आणि त्यांच्यावर मात करण्याची जबर इच्छाशक्ती दाखवली होती हे कळून येतं. केवळ एक शस्त्रक्रियेस तोंड देताना एखादी व्यक्ती गर्भगळीत होऊ शकते तिथे इतक्या शस्त्रक्रिया झाल्यावरही त्यांनी जे आयुष्य जगलं त्यास झुंज म्हंटली पाहिजे. त्यांच्या या झुंजीतही त्यांनी स्वतःच्या आयुष्यात कटूपणा येऊन दिलेला दिसत नाही.
अजय यांनी नमूद केल्याप्रमाणे त्यांनी त्यांचा मिश्किल स्वभाव जपला होता, तसेच पाककला, प्रत्येक सणातील सहभाग यांतून त्या सतत कार्यरत राहिल्या आणि सतत आनंदी राहिल्या. गेल्या जागतिक महिला दिनानिमित्त अजय यांनी अभिनय केलेल्या एका जाहिरातीबद्दल अजय यांनी पोस्ट केली होती. त्यावेळीही त्यांनी आपल्या आईंना ही जाहिरात अर्पण करत त्यांच्या विषयीचं आपलं प्रेम व्यक्त केलं होतं.
आजच्या या त्यांच्या पोस्टमधून त्यांनी त्यांच्या चाहत्यांना एक आव्हान केलं आहे. सध्या आपण सगळेच कठीण काळातून जात आहोत तेव्हा या पोस्टमार्फत जे आयुष्य त्यांच्या आई जगल्या त्याच्यातून प्रेरणा घेत, सकारात्मक राहत, संकटांना तोंड देत एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे सगळ्यांनी भरारी घेत आयुष्य जगावं असं त्यांना अभिप्रेत आहे. आपली टीम त्यांच्या या भावनेचा आदर करते. त्यांच्या आईंनी ज्या खंबीर पद्धतीने परिस्थितीशी लढा देत आनंदात आयुष्य जगलं त्यांच्या या लढाऊ वृत्तीला आमच्या टीमचा मानाचा मुजरा. तसेच त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच इच्छा.