Breaking News
Home / मराठी तडका / मुलगी झाली हो मालिकेत नकारात्मक भूमिका निभावणारी दिव्या खऱ्या आयुष्यात आहे खूपच वेगळी

मुलगी झाली हो मालिकेत नकारात्मक भूमिका निभावणारी दिव्या खऱ्या आयुष्यात आहे खूपच वेगळी

मराठी मालिकाविश्वात अनेक मालिका दरवर्षी दाखल होत असतात. त्यात काही मालिका या त्यांच्यातल्या कथानकामुळे आणि व्यक्तिरेखांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. सध्या अशीच एक मालिका आपल्या भेटीस आली आहे. तिचं नाव आहे मुलगी झाली हो. या मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा म्हणजे माऊ हिला बोलता येत नसतं. तिच्या आईने तिला आणि तिच्या बहिणीला लहानपणापासून एकटीने वाढवलेलं असतं. त्यांचा संघर्ष कसा असतो हे दाखवणारी हि मालिका. या मालिकेतील दोन व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दोन अभिनेत्री म्हणजे दिव्या पुंगावकर आणि शर्वाणी पिल्लई. या दोघींच्या अभिनय प्रवासाविषयी आपण याआधी मराठी गप्पाच्या माध्यमांतून जाणून घेतलेलं आहेच. आज या मालिकेतील अजून एका अभिनेत्रीविषयी आपण जाणून घेणार आहोत. तिच्या मालिकेतील व्यक्तिरेखेचं नाव आहे दिव्या सरदेशमुख, तर खरं नाव आहे प्रतीक्षा मुणगेकर. नुकताच तिचं एक गाणंहि प्रसिद्ध झालंय आणि फार कमी काळात हजारोंनी या गाण्याला पाहिलं आहे. या तिच्या नवीन गाण्याच्यानिमित्ताने तिच्या अभिनय प्रवासाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न.

प्रतीक्षाचं बालपण गेलं ते कोकणात. शाळेतून महाविद्यालयात दाखल होई पर्यंत अभिनयाविषयी जास्त अशी माहिती तिला नव्हती. पण महाविद्यालयीन जीवनात मात्र अभिनय आणि कलाक्षेत्राशी संपर्क आला. यथावकाश हा काळ तिच्या अभिनय कारकीर्दीच्या प्रवासातला एका महत्वाचा टप्पा झाला. पुढे तिने मालिकांतून कामे करण्यास सुरुवात केली ती आजतागायत. या तिच्या प्रवासात काही मालिका या खूप महत्वाच्या ठरल्या. जसे कि क्राईम पेट्रोल. या मालिकेतील विविध भूमिका तिने केल्या आहेत. तिच्या या भूमिकांसाठी तिचं कौतुक झालं, तिला ओळख मिळाली. पुढे अजून एका मालिकेने तिच्या अभिनय प्रवासात महत्वाची भूमिका बजावली. हि मालिका म्हणजे घाडगे अँड सून. या मालिकेतील नकारात्मक पात्राने खलनायिका म्हणून तिला ओळख मिळवून दिली. या मालिकांसोबतच दोन मालिकांची नावे आवर्जून घ्यावी लागतील. एक म्हणजे छत्रीवाली आणि अग्निहोत्र २. या दोन्ही मालिकांतील तिच्या भूमिकेचं आधीच्या भूमिकांप्रमाणेच कौतुक झालं.

प्रतीक्षा हिच्या कारकिर्दीवरून एक गुण सदैव लक्षात राहतो. तो म्हणजे सदैव काम करण्यात मग्न असणं. कारण तिने उत्तम अभिनय केलेला आहेच सोबत ती सातत्याने विविध कलाकृतींतून आपल्याला भेटत आलेली आहे. जसे मालिकांसोबत तिने सिनेमा क्षेत्रातही अनेक सिनेमे केले आहेत. विडा एक संघर्ष, मातृदेवो भवं, लँड १८५७ , बाबो असे अनेक सिनेमे तिने अभिनेत्री म्हणून केलेले आहेत. येत्या काळात तिची भूमिका असलेला द डार्क फॉरेस्ट हा नवीन सिनेमा आपल्या भेटीस येईल. मालिका आणि सिनेमांसोबत तिने प्रथितयश ब्रँड्सच्या जाहिरातीत अभिनय केलेला आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या गणेशोत्सवात जेमिनी ऑईल च्या जाहिरातीत ती झळकली होती. त्याआधी एकदा तिने कोटक महिंद्र बँकेच्या जाहिरातीतही काम केलेले आहे. या प्रथितयश माध्यमांसोबत तिने वेब सिरीज या त्यामानाने नव्या माध्यमांतूनही अभिनय केलेला आहे. तिच्या वेब सिरीजचं नाव कोर्टयार्ड असं आहे. तसेच नुकतंच तिचं एक नवीन गाणंही प्रसिद्ध झालं. बोटीने येशील का असं त्या गाण्याचं नाव आहे. आत्तापर्यंत काही दिवसांतच हजारोंच्यावर व्युज या गाण्याला मिळालेले आहेत.

अशी हि विविध माध्यमांतून कलामुशाफिरी करणारी अभिनेत्री सदैव कामात व्यस्त असली, तरीही तिचा स्वभाव रुक्ष झालेला नाही. ती सदैव प्रसन्न असते आणि प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळेस सहकलाकारांसोबत तिचं उत्तम ट्युनिंग जमलेलं दिसतं. मोकळ्या वेळेत ती उत्तम जेवण बनवते तसंच, अधनंमधनं चित्र काढण्यातही ती स्वतःला रमवते. घरातून कलाक्षेत्राची पार्श्वभूमी नसतानाहि, या गुणी अभिनेत्रीने अतिशय कमी कालावधीत स्वतःचं असं स्थान निर्माण केलंय. याचं श्रेय जातं ते सातत्याने काम करत राहत, तिने काळानुसार विविध माध्यमांतून स्वतःला प्रेक्षकांसमोर आणलंय या गोष्टीला. वर उल्लेखल्याप्रमाणे येत्या काळात, तिचा एक सिनेमा प्रदर्शित होईल. तसेच इतरही कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस येत राहतील अशी आशा करायला हरकत नाही. तिच्या पुढील काळातील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून शुभेच्छा !

आपण हा लेख वाचलात या बद्दल धन्यवाद. वर उल्लेख केल्याप्रमाणे ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील शर्वाणी पिल्लई आणि दिव्या पुगांवकर यांच्या अभिनय कारकीर्दीचा आढावा आपण मराठी गप्पावर घेतलेला आहेच. सोबत छत्रीवाली या मालिकेतील नम्रता प्रधान आणि सायली साळुंखे यांच्या अभिनय कारकीर्दीचाहि धांडोळा आपण मराठी गप्पावर घेतला होता. आपल्यापैकी अनेकांनी ते लेख वाचले असतील. जर वाचले नसल्यास आपण वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शन मध्ये जाऊन ‘मुलगी झाली हो’ किंवा ‘छत्रीवाली’ असं टाईप केल्यास तुम्हाला ते लेख मिळू शकतील. मराठी गप्पाचे नियमित वाचक असल्याबद्दल धन्यवाद !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.