गेले काही दिवस युट्युबवर एक शॉर्ट फिल्म खूप प्रसिद्ध होते आहे. नाव आहे, ‘साखरेपेक्षा गोड’. के.इ.एम. पुणे रुग्णालयातील एक कर्मचारी आपल्या गरोदर बायकोला, बाळाचे भविष्यात डायबिटीजपासून संरक्षण कसे करावे हे शिकवतो, हा या कथेचा पाया. जवळपास साडे आठ लाखांहून अधिक लोकांनी या शॉर्ट फिल्मला पाहिलं आहे. या कथेची संकल्पना डॉ. मोहन आगाशे यांची असून सुमित्रा भावे यांनी याचे दिग्दर्शन केलेले आहे. यात ओम भूतकर या प्रसिद्ध अभिनेत्याची मुख्य भूमिका आहे. डॉ. मोहन आगाशे आणि ओम भूतकर यांनी काही वर्षांपूर्वी एका सिनेमात एकत्र काम केलं होतं. ‘छोटा सिपाही’ हे त्या सिनेमाचं नाव. इंग्रजांविरुद्ध महत्वपूर्ण माहिती देणाऱ्या, जोझे या गोवन मुलाची भूमिका यात ओमने निभावली होती. या सिनेमातील अभिनयासाठी, त्यावेळी ओमला ‘५२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात’ सर्वोत्तम बालकलाकार म्हणून पुरस्कार मिळाला होता.
आज या दोन्ही कलाकृतींमध्ये जवळपास दीड दशकाहून अधिकचा काळ लोटला आहे. या काळात ओमनेही स्वतःला अभिनेता म्हणून उत्तम रीतीने घडवलं आहे. अनेक उत्तमोत्तम कलाकृतीत काम केलं आहे. विनोदी, गंभीर, ऐतिहासिक अशा वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या या प्रवासाचा आज थोडक्यात धांडोळा घेण्याचा टीम मराठी गप्पाचा प्रयत्न. आधी सांगितल्याप्रमाणे लहानपणी ओमने ‘छोटा सिपाही’ मध्ये काम केलं होतं. पुढे सांस्कृतिक कार्यक्रम, एकांकिका आणि नाटकांतून तो रंगमंचावरही अभिनय करत राहिला. सोबत लोकप्रिय सिनेमेही त्याने केले. यशवंतरावजी चव्हाण यांच्या आयुष्यावरील चित्रपटात, म्हणजेच ‘यशवंतराव चव्हाण : बखर एका वादळाची’ या चित्रपटात त्याने काम केलं. त्याने यशवंतरावजी चव्हाणांच्या तरुण वयातील भूमिका अगदी मनापासून निभावली. या ऐतिहासिक व्यक्तिरेखेच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण कालखंड त्याने आपल्या अभिनयाने जिवंत केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांनी केलं होतं.
या ऐतिहासिक भूमिकेसोबत अजून एका भूमिकेसाठी त्याला प्रेक्षक ओळखतात. ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमातील राहुल पाटील उर्फ राहुल्या या भूमिकेचं प्रेक्षक आणि समीक्षकांकडून खूप कौतुक झालं. त्याच्या नैसर्गिक अभिनयाने आजही हि भूमिका आणि मुळशी पॅटर्न लोकप्रिय आहे. त्याने यासोबतच झिंदगी विराट सारखा विनोदी सिनेमाही अभिनय केला आहे. यात अतुल परचुरे, भाऊ कदम, किशोर कदम यांच्या मुख्य भूमिका होत्या. याचसोबत त्याने रवी जाधव यांच्या बहुचर्चित न्यू-ड मध्येही काम केलं आहे. तसेच आजोबा, लेथ जोशी, बारायण यांसारख्या वैविध्यपूर्ण लोकप्रिय सिनेमांमध्ये त्याने काम केलंय. नाटक, व्यावसायिक सिनेमा करत असताना, त्याने अनेक शॉर्ट फिल्म्सहि केल्या आहेत. ‘साखरेपेक्षा गोड’ हे त्यातलं एक उदाहरण, नुकतचं घडलेलं. त्याचप्रमाणे अजून एक शॉर्ट फिल्म जी गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रसिद्ध झाली होती त्यात ओम भूतकरची प्रमुख भूमिका होती. सोबत होते सचिन खेडेकर, श्रुती मराठे हे कलाकार. प्रतिबिंब हि त्याची अजून एक गाजलेली शॉर्ट फिल्म. हिंदीतही त्याने ‘Lost and Found’ हि शॉर्ट फिल्म केली आहे. या शॉर्ट फिल्मची कथा म्हणजे एक थरारपट आहे.
नाटक, सिनेमा, शॉर्ट फिल्म्स मध्ये काम करत असताना त्याने स्वतःची उर्दू भाषेची, उर्दू शायरीची, हिंदुस्थानी आणि सुफी संगीताची आवडही जपली आहे. त्याचा ‘सुखन’ हा कार्यक्रम तो सादर करतो ज्याची संकल्पना आणि दिग्दर्शन त्याने केलंय. यात उर्दू साहित्य आणि त्याचे सौंदर्य, सुफी आणि हिंदुस्थानी संगीताचे सुंदर पैलू तो आपल्या या कार्यक्रमात तो उलगडताना दिसतो. दर्दी रसिकांसाठी त्याचं, सुखनचं एक युट्युब चॅनेलहि आहे. असा हा अष्टपैलू कलाकार ओम भूतकर आणि त्याच्या या अभिनय प्रवासाचा धांडोळा घेण्याचा टीम मराठी गप्पाचा प्रयत्न. येत्या काळातही ओम आपल्याला वैविध्यपूर्ण कलाकृतींमधून आनंद देत राहील आणि भाषा आणि संगीतावरील प्रेमाने सुखनच्या मैफिलत सदैव रंग भरत राहील, हे नक्की. त्याच्या पुढील कलाप्रवासासाठी मराठी गप्पाच्या टीमकडून आणि वाचकांकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)