सोशल मीडियावर सदैव काही ना काही घडत असतं वा घडलेलं दाखवलं जात असत. त्यातील बराचसा भाग हा काही वेळा मनोरंजन म्हणून आपण बघतो आणि सोडून देतो. पण काही भाग मात्र मनोरंजन म्हणून बघावा किंवा बातमी म्हणून बघितला तरीही लक्षात राहतो. काही वेळा अगदी साधीशी वाटणारी घटना का असेना पण लक्षात राहते. यात बऱ्याच वेळा दिसणाऱ्या व्हिडियोजचा वाटा हा मोठा आहे हे नक्की.
यातही एखादा व्हिडियो कोणी कोणाला मदत केल्याचा असेल तर विशेष लक्षात राहतो. यात अगदी मग माणसांनी इतर माणसांना किंवा प्राणी , (पंख असलेल्या) पक्ष्यांना मदत केल्याचे व्हिडियो तर लक्षात राहतात. पण यात काही व्हिडियोज हे असेही असतात ज्यात एक प्राणी वा पक्षी दुसऱ्या प्राण्याला वा पक्ष्याला मदत करताना आपण पाहतो. काही वर्षांपूर्वी एक व्हिडियो आणि डॉक्युमेंटरी खूप वायरल झाली होती. ज्यात एक वाघीण, एका पाडसाला न मारता काही दिवस कसं संगोपन करते हे दाखवलं गेलं होतं. तो व्हिडियो बघून खरंच विश्वास बसत नव्हता. बरं हे अगदीच जंगलातील उदाहरण झालं. एरवी ही पाळीव कुत्रे,मांजरी, कोंबड्या, बदकं यांचे व्हिडियोज ही आपण पाहतोच. याच व्हिडियोज मध्ये अजून एका व्हिडियोची भर पडली आहे.
हा व्हिडियो खरं तर सोशल मीडियावर होता. पण एका प्रथितयश वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार एका वनसंरक्षक अधिकाऱ्याला हा व्हिडियो दिसला. त्यातील कंटेंट त्यांना आवडला आणि त्यांनी तो शेअर केला आणि म्हणता म्हणता वायरल झाला. आमच्या टीमने ही हा व्हिडियो आज बघितला. बघून थोडं आश्चर्य आणि झाल्या घटनेचं बरं ही वाटलं. पण काय होती ही घटना ? ही होती एका प्राणी संग्रहालयातील घटना. अर्थात हा व्हिडियो बघून यातील जागा ही प्राणिसंग्रहालय असावा असा आमच्या टीमने कयास बांधला आहे याची नोंद घ्यावी. कारण व्हिडियोच्या सुरुवातीसच आपल्याला एका कोपऱ्यात चरत उभे असलेले झेब्रे बघायला मिळतात. पण त्यांचा या व्हिडियोत काही हस्तक्षेप नसतो. एखाद्या कलाकाराने हळूच पाहुणा कलाकार म्हणून एखाद्या कलाकृतीत काम करावं आणि सांगितल्याशिवाय कोणाला कळू ही नये तसं त्यांचं या व्हिडियोतलं स्थान असतं. असो. पण मुख्य पात्र मात्र दोन असतात. एक असते म्हैस आणि दुसरं असतं कासव. आता ती तिथे कशी येतात माहिती नाही. पण त्यातलं कासव नेमकं उलट्या अवस्थेत पाठीवर पडलेलं असतं. आता या अशा अवस्थेत कासव निष्प्रभ ठरतं हे आपण जाणतोच. पण या म्हशीला पण त्याची बहुधा जाणीव होते. त्यामुळे ती त्याच्या जवळ जाते.
एव्हाना बाहेर उभ्या असलेल्या माणूस प्राण्यांना आतमध्ये काय चाललं आहे याची कल्पना आलेली असते. त्यातीलच एकाने या व्हिडियोचं चित्रीकरण केलं आहे. खरं तर त्याचे धन्यवादच मानायला हवेत. कारण त्यांच्यामुळे पुढे घडणारा प्रसंग आपल्याला दिसून येतो. ती म्हैस त्या कासवाला तिच्या शिंगांनी उपडी पाडायला बघत असते. बाहेर सगळ्यांची उत्कंठा ताणलेली असते. इतकी की बाहेर उभ्या असलेल्या मुलींचे चित्कार ऐकायला येत असतात. ओह माय गॉड म्हणत सगळ्यांचे डोळे पुढे काय होतं याकडे लागलेले असतात. कारण म्हैस त्याला नुसतं उलटवेल की अजून काय करेल याची सगळ्यांना उत्सुकता असते. तिचा ही प्रयत्न चालू असतो. अगदी ढोपरं मातीत घालून ती प्रयत्न करत राहते. शेवटी त्या कासवाला सरळ करण्यात यशस्वी होते आणि बाहेर आनंद भावना उफाळून आलेल्या असतात. एक मुलगा तर त्या म्हशीला प्रोत्साहन देत असतो. तिला त्यातलं किती कळतं माहिती नाही, पण आपण जणू काही केलंच नाही या थाटात रवंथ करत ती म्हैस पुढे येत राहते आणि व्हिडियो संपतो. खरं तर हा लेख लिहिताना ही या व्हिडियोतील प्रत्येक क्षण डोळ्यासमोर उभा राहतो. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्या बाबतीत ही हे झालं असेल. कारण दोन मुक्या जनावरांच्या मधील वागणं वेगळं पण मनाला समाधान देऊन जाणारं असतं. असो. आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर बघा. जास्त वेळ जाणार नाही पण आवडून जाईल हे नक्की.
चला मंडळी, आता आवरतं घेतो आम्ही. आपण या व्हिडियो ची मजा घ्या. त्याचप्रमाणे आपल्याला हा लेखही आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या टीमने आपल्यासाठी अनेक उत्तम लेख लिहिले आहेतच. आपणही प्रत्येक वेळी त्यास उत्तम प्रतिसाद दिला आहेतच. यापुढेही आपला हा प्रतिसाद आम्हाला मिळत रहावा. आमची टीमही आपल्या मनोरंजनासाठी उत्तम लेख लिहीत राहील, सोबत जमले तर व्हिडियोज ही घेऊन येत राहील याची खात्री बाळगावी. लवकरच नवीन लेखासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य न वाचलेले लेख वाचा. ते आठवणीने शेअर करा आणि आपल्याला झालेला आनंद सगळ्यांना वाटा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :