Breaking News
Home / मराठी तडका / यशची खऱ्या आयुष्यातील बहीण आहे प्रसिद्ध अभिनेत्री, चित्रपटात केले आहे काम

यशची खऱ्या आयुष्यातील बहीण आहे प्रसिद्ध अभिनेत्री, चित्रपटात केले आहे काम

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते हि मालिका जवळजवळ वर्षभरापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ह्या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत अरुंधतीच्या मुलांच्या भूमिकेत असलेले यश आणि इशा हि बहीणभावाची जोडी पण खूप लोकप्रिय ठरत आहे. प्रत्येक गोष्टीत यश काही ना काही कारणाने ईशाच्या खोड्या काढत असतो. मग ईशाचं त्यावर चिडणं, हे प्रेक्षकांना खूप भावून जातं. ह्या दोघांची बहीणभावाची जोडी मालिकेत एक वेगळीच रंगत आणत आहे. ज्याप्रमाणे मालिकेत दोघांची मस्ती चालू असते ते पाहून हे दोघेही पडद्यावरच नाही तर खरोखरंच भाऊबहीण असल्याचे वाटते. हि जोडी प्रेक्षकांनाही खूप पसंतीस उतरत आहे. मालिकेतील हि बहीण भावाची जोडी तर सर्वांनाच माहिती आहे. परंतु आजच्या लेखात आपण यश म्हणजेच अभिषेक देशमुख ह्याच्या खऱ्या आयुष्यातील बहिणीबद्दल जाणून घेणार आहोत.

अभिषेकच्या खऱ्या आयुष्यातील बहिणीचे नाव अमृता देशमुख असे आहे. अमृतासुद्धा प्रसिद्ध मराठी अभिनेत्री असून तिने अनेक नाटकं, चित्रपट आणि मालिकांमध्ये कामे केली आहेत. अमृताचा जन्म ३१ जानेवारी १९९२ रोजी जळगाव येथे झाला. तिचं बारावीपर्यंत शिक्षण जळगावमध्ये झाले. त्यानंतर ती पुढचं शिक्षण घेण्याकरिता पुण्यात आली. तिचे आईवडील अगोदरपासूनच रंगभूमीवर काम करत असल्यामुळे अमृताला देखील बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिला ह्या क्षेत्रात काम करायचे आहे, असं तिने सहावीत असतानाच ठरवलं होतं. कॉलेजमध्ये असल्यापासूनच तिने नाटकांत सहभाग घ्यायला सुरुवात केली होती. परंतु तिला तिचे शिक्षण पूर्ण करायचे होते म्हणून तिने तिचे ग्रॅज्युएशन पुण्याच्या ‘एस पी’ कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर तिने मास कम्युनिकेशन आणि जर्नालिशमचे पोस्ट ग्रॅज्युएशन रानडे इन्स्टिट्यूटमधून पूर्ण केले. तिने तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टीव्ही९ ह्या न्यूज चॅनेलमध्ये पत्रकारिता म्हणून अप्रेंटीशीपसाठी काम केले. आणि नंतर व्यवसायिकदृष्ट्या अभिनय क्षेत्रात उतरली. तिची मुख्य अभिनेत्री म्हणून पहिली मालिका होती स्टार प्रवाहावरील ‘तुमचं आमचं जमलं’. तिला तिचं पहिलं मानधन १५०० रु. प्रति दिन असे मिळाले होते. अमृताला महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत ‘एक रिकामी बाजू’ ह्या नाटकातील अभिनयासाठी सिल्व्हर मेडल मिळालं आहे.

अमृताने ‘पुढचं पाऊल’ ह्या मालिकेत गौरीची भूमिका, ‘देवाशप्पथ’ मालिकेत लक्ष्मी, तर ‘फ्रेशर्स’ ह्या मालिकेत परी देशमुख हि भूमिका निभावली होती. ‘मी तुझीच रे’ मालिकेत ती रियाच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता संग्राम साळवीसोबत दिसली. त्याचप्रमाणे अमृताने चित्रपटात सुद्धा काम केलेले आहे. ‘स्वीटी सातारकर’ ह्या चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारली होती. अमृताला जी भूमिका चांगली आणि इंटरेस्टिंग असेल, अश्याप्रकारच्या भूमिका करायला आवडतात. अमृता सोशिअल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असून ती तिचे फोटोज आणि व्हिडीओज नियमित शेअर करत असते. अमृताचा आवडते अभिनेते आमिर खान आणि ह्रितिक रोशन असून तिची आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित आहे. ह्यापुढील येणाऱ्या काळात अमृता उत्तम भूमिका साकारून ती तिच्या यशाचा आलेख अजून उंच नेईल, इतकं मात्र नक्की. अमृताला तिच्या चित्रपट कारकिर्दीतील पुढील प्रवासासाठी मराठी गप्पा तर्फे खूप खूप शुभेच्छा. वरील लेखामध्ये अभिनेता अभिषेक देशमुख ह्याचा उल्लेख झाला आहे. जर तुम्हाला अभिनेता अभिषेक देशमुख विषयी लेख वाचायचा असेल तर आपल्या मराठी गप्पावर हा लेख उपलब्ध आहे. तुम्ही सर्चचे ऑप्शन वापरून ‘अभिषेक देशमुख’ असे सर्च केल्यास, हा लेख वाचू शकता. आपल्या वेबसाईटला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हां सर्वांचे मनापासून धन्यवाद.

(Author : Rahul Ranjan Arekar)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *