‘आई कुठे काय करते’ हि मालिका गेले अनेक दिवस चर्चेत आहे. यातील कथेचं रंजक वळण असो, कलाकारांची झालेली अदलाबदल असो, नावाजलेल्या अभिनेते -अभिनेत्रींचा सहभाग असो अशी अनेक कारणं. यात एक व्यक्तिरेखा विशेष गाजते आहे आणि ती म्हणजे यश. अरुंधती या मुख्य व्यक्तिरेखेचा मुलगा. हि व्यक्तिरेखा साकारतो आहे अभिषेक देशमुख हा अभिनेता. आपण अभिषेकला याधीही ‘पसंत आहे मुलगी’, नेटफ्लिक्स वरची माधुरी दीक्षित निर्मित ‘१५ ऑगस्ट’, ‘होम स्वीट होम’, काही वेबसिरीजच सूत्रसंचालन अशा विविध माध्यमांतून भेटलो आहे. त्यातही उल्लेखनीय भूमिका म्हणजे पसंत आहे मुलगी या मालिकेतील पुनर्वसू हि भूमिका. अभिषेकचा अभिनय, लेखन, दिग्दर्शन या क्षेत्राशी संबंध तसा जुना.
अगदी शाळेतल्या वक्तृत्व स्पर्धेपासून ते आजतागायत, त्याने अनेक कलाकृतीमध्ये या तीनही भूमिकांतून कामं केली आहेत. त्याच्या या वाटचालीत गेली काही वर्ष त्याला सतत साथ मिळाली आहे ते त्याच्या बायकोची, म्हणजे कृतिका हिची. कृतिका स्वतः उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. तिने बकेट लिस्ट, पानिपत या गाजलेल्या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. तसेच मुगल-ए-आझम या नृत्याला वाहिलेल्या कार्यक्रमातून तिची नृत्याची आवड ती जोपासत असते. तर अशी हि कलाकार जोडी भेटली एका नाटकाच्या निमित्ताने. अभिषेकला लहानपणापासून लिखाणाची आवड. त्याने काही एकपात्री नाट्यप्रयोग लिहिले होते. त्यातील २०१४ मध्ये प्रयोग झालेल्या ‘कर्वे… बाय द वे’ मध्ये त्याने लेखन, दिग्दर्शन, अभिनय या तीनही आघाड्या सांभाळल्या होत्या. त्याची पुढील नाट्यकृती होती ती ‘ओ ! फ्रिडा’. हि नाट्यकृती आधारित आहे जगप्रसिद्ध चित्रकार असणाऱ्या फ्रिडा कहलो हिच्यावर. तिचं सेल्फ पोर्टेट काढणं हा या नाट्यकृती मागची प्रेरणा.
त्याने यात लेखन केलं आणि दिग्दर्शनाची धुराही स्वतःकडे घेतली. पण फ्रिडाची व्यक्तिरेखा साकारायला प्रगल्भ अशा अभिनेत्रीचा शोध चालू होता. कृतिका देव हिची यात अभिनेत्री म्हणून निवड झाली आणि तीने हे काम उत्तमरीतीने बजावलं. या नाट्यप्रयोगाची, त्यातल्या लेखन, दिग्दर्शन, अभिनय यांची दखल आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्ये घेतली गेली. नाटक काही काळाने थांबलं पण अभिषेक आणि कृतिकाची मैत्री घट्ट झाली. पुढे दोघांनी २०१८ साली ६ जानेवारीला लग्न केलं. सोबतीने दोघांचं अभिनयाचं करियर चालूच होतं. दोघांनीही मराठी सिनेमातूनही काम केलं आहे. कृतिका हि, ‘राजवाडे आणि सन्स’ या प्रसिद्ध सिनेमामध्ये होती तर, ‘होम स्वीट होम’ मध्ये अभिषेक याने रीमा लागू, हृषिकेश जोशी यांच्या सोबत काम केलं आहे. मूलतः रंगमंचावर काम करण्याची आवड असलेली हि जोडी बदलत्या काळानुसार वेबसिरीज आणि शॉर्ट फिल्म्सच्या माध्यमातूनही आपली अभिनय कला सादर करते आहे.
गॉड ऑफ लव, फोमो या वेबसिरीज अभिषेक यांनी केल्या आहेत. तर डिलिवरी गर्ल हि शॉर्ट फिल्म, डेट गॉन व्रॉंग हि वेब सिरीज कृतिका हिने केली आहे. अभिषेक प्रमाणेच टेलीविजनवरही कृतिका ने काम केलं आहे. ‘प्रेम हे’ या मालिकेत प्रथमेश परब सोबत तिने काम केलेलं आहे. सध्या अभिषेकने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अभिनयासोबतच स्वतःचं एक युट्युब चॅनेल सुरु केलं आहे. ‘Abhi ke abhi’ असं त्याचं नाव असून त्यावर ‘My Pawsome Friend’ अशी सिरीज चालू केली आहे. सिरीजची सुरुवात डॉ. प्रकाश आमटे यांच्या मुलाखतीने झाली होती. फार तरुण वयात आणि कमी काळात, या जोडीने अभिनय क्षेत्रात स्वतःची दखल घेण्याजोग काम केलं आहे. स्वतःचा अभिनय प्रवास चालू असतानाच ते एकमेकांना आपापल्या करियर मध्ये सदैव प्रोत्साहन देत आलेच आहेत व पुढेही प्रोत्साहन देत राहतीलच. त्यांच्या पुढील प्रवासातही त्यांनी उत्तमोत्तम कलाकृती सादर कराव्यात आणि त्यांना सदैव यश मिळत रहावे या मराठी गप्पाकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)